world advertising day

world advertising day : अनेक स्थित्यंतरातून विकसित झालेले जाहिरात क्षेत्र

६५ वी कला म्हणून मान मिळालेले जाहिरात क्षेत्र. १४ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय जाहिरात दिन world advertising day म्हणून ओळखला जातो. या दिवशी वर्ष १९०२ मध्ये भारतातील पहिल्या जाहिरात एजन्सी बी . दत्ताराम अँड कंपनी ची सुरुवात मुंबईमध्ये झाली होती. अत्यंत पुरातन अशा या कलेमध्ये अनेक बदल, स्थित्यंतरे होत आहेत. टांगा वा हातात लाऊडस्पीकर घेऊन ओरडून जाहिरात करण्यापासून ते मोबाईलवरील सोशलमिडीयावरील जाहिरातीपर्यंतचा प्रवास अत्यंत मनोरंजक आहे.

जाहिरातीचा जन्म

फ्रेंच राज्यक्रांती व औद्यागिक क्रांतीने राजकीय, सामाजिक, वाङ्ममय व कला क्षेत्रावर जसा परिणाम केला, तसा या क्रांतीचा व्यापार क्षेत्रावर फार मोठा परिणाम झाला. औद्योगिक क्रांतीमुळे व्यापार व उत्पादनाच्या क्षेत्रात फार मोठे बदल झाले. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात व १९व्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक यांत्रिक शोध लागले. त्यामुळे अनेक जाणिवांमध्ये बदल घडले. जीवन गतिमय झाले. उत्पादनासाठी यंत्राचे साह्य घेतले गेले. मागणीपूर्व उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. उत्पादित वस्तू/सेवा यांची माहिती संभाव्य ग्राहकांना देण्याची गरज निर्माण झाली. यातूनच जाहिरातीचा जन्म झाला. world advertising day

जाहिरात क्षेत्रातील स्थित्यंतरे

जाहिरात एजन्सीमध्येही हाताने रेखाटलेली जाहिरात नंतर ब्लॉकने तयार केलेली जाहिरात व आता संगणकावर आधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केलेली जाहिरात ही स्थित्यंतरे गेल्या अनेक शतकांत होत गेली व आगामी काळातही होतीलच यात शंका नाही. जोपर्यंत सेवा किंवा उत्पादनांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता राहील, तोपर्यंत जाहिरातीचे अस्तित्व व गरज राहणारच आहे.
म्हणूनच की काय जाहिरात ही आजच्या काळातील जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली आहे. जितक्या नव्या वस्तू बाजारात येतात, तितक्याच जाहिराती वाढतात आणि जाहिरातींची माध्यमेसुद्धा. विविध माध्यमांद्वारे वस्तू व सेवांविषयी हेतूपुरस्सर प्रस्तुत केलेल्या संदेशांचा जाहिरातींमध्ये समावेश होतो. ह्या जाहिराती उद्योग संस्था, विक्रय संस्था, कंपनी, सेवा देणारे उद्योग यांनी आपल्या स्वतःच्या खर्चाने दिलेल्या असतात. ग्राहकाचे आपल्या वस्तू विकत घेण्याकरिता मन वळविण्यासाठी दिलेल्या संदेशाचादेखील जाहिरातीत समावेश होतो

पुरातन काळातील जाहिरात

इजिप्तमध्ये पुरातन काळात जाड कागद वापरून हाताने तर अरब देशात तसेच आफ्रिका व दक्षिण अमेरिका या देशात भिंती किंवा दगड रंगवून जाहिरात होत असे प्रामुख्याने हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी जाहिरात त्याकाळी करण्यात येत असे. भारतामध्ये देखील इसवी सन पूर्व ४००० मध्ये पाषाण वापरून जाहिरात केल्याचा उल्लेख आढळतो. चीनमध्येही कवितेच्या व गीतांच्या स्वरूपात जाहिरात करत असत. जसजशी तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली तसतशी जाहिरातींची माध्यमेही बदलत गेली.

छापील जाहिरात

१९व्या शतकात इंग्लंडमधील एका साप्ताहिकामध्ये जाहिरातीची सुरुवात झाली. प्रामुख्याने विविध पुस्तकांचा प्रचार करण्याकरिता या जाहिराती देण्यात येत असत. यानंतर विविध प्रकारच्या जाहिराती साप्ताहिकात देण्याचे चलन झाले, जेणेकरून योग्य वाचकांपर्यंत उत्पादन सेवा याबाबतचा संदेश पोहोचविता येईल. जून १८३६ मध्ये एका फ्रेंच दैनिकाने पैसे घेऊन अधिकृतरित्या जाहिरात छापली. यानंतर जसजशी उत्पादनाची सेवेची लोकप्रियता व व्याप्ती वाढली तसेतसे हे काम करण्यासाठी व्यावसायिकांची गरज वाढली व त्यातूनच जाहिरात एजन्सी या संकल्पनेचा उगम झाला. १८६९मध्ये जगातील पहिली पूर्ण जाहिरात एजन्सी एन. डब्लू. आयेर अॅण्ड सन्स या जाहिरात एजन्सीची स्थापना करण्यात आली.

भारतात पहिली छापील जाहिरात

बेंगाल गॅझेट या साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर टाटा पब्लिसिटी नोर्विकसंन ॲडव्हर्टायझिंग , ओअँड एम , युनिव्हर्सल पब्लिसटी अशा अनेक नामांकित जाहिरात एजन्सींनी देशात आपले काम सुरु केले. भारतातील पहिली जाहिरात एजन्सी बी. दत्ताराम अॅण्ड कंपनी ची सुरुवात १९०२ मध्ये झाली. ही एजन्सी मुंबईमध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर बरेच वर्ष फक्त नियतकालिके किंवा दैनिके यामध्ये जाहिराती होत होत्या. ऑलिव्ही अॅण्ड माथर व हिंदुस्तान थॉमसन असोसिएटसची सुरुवात भारतात १९२० मध्ये झाली. जसजसे माध्यमांमध्ये तांत्रिक बदल होत गेले तसतसे जाहिरातींचे स्वरूपही बदलत गेले.

दूरचित्रवाणीवरील जाहिरात

परदेशात १९२० च्या सुमारास रेडिओ स्टेशनचा व १९४० ते १९५० यादरम्यान दूरचित्रवाणीचा उगम झाला. त्यावरील कार्यक्रमांना प्रायोजक मिळू लागले. या माध्यमांमुळे जाहिरात क्षेत्राला एक नवी उभारी मिळाली. १९९२मध्ये भारतातील तत्कालीन सरकारने आपल्या आर्थिक नीतीमध्ये बदल केल्यामुळे माहितीचे नवे युग अवतरले. अनेक नव्या वाहिन्या आधुनिक तंत्रज्ञानासोबत भारतात आल्या. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतामध्ये आपली सेवा देण्यास प्रारंभ केल्याने त्यांना त्यांची उत्पादने सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याकरिता प्रिंट, टेलिव्हिजन, रेडिओ, आऊटडोअर अशा विविध माध्यमांची गरज वाटू लागली. त्यातच इंटरनेटचे जाळे वेगाने पसरल्यामुळे इंटरनेट हेदेखील जाहिरातीचे नवे माध्यम झाले. जाहिराती करत असताना अजून एक महत्वाचा मुद्दा विचारात घ्यावा लागतो. तो म्हणजे प्रोडक्ट आणि जाहिरात यांची बरोबरी. जितकी चांगली जाहिरात होईल तितकचं प्रोडक्टला क्रिटिसाईज करण्यात येतं. आणि प्रोडक्ट वाईट असेल तर कालांतराने ही जाहिरात पुर्णपणे फेल म्हणून गणली जाते.

जाहिरातीचे परिणाम

जाहिरातीमुळे दूरगामी परिणाम होतात. जाहिरातींपासून मिळणाऱ्या आर्थिक बळकटीमुळे वर्तमानपत्रांना स्वतंत्र बाण्याने वार्तांकन करता यावे हे अपेक्षित आहे. वृत्तपत्रांना निम्म्याहून अधिक उत्पन्न जाहिरातीमुळे मिळते. त्यामुळे वाचकांना वृत्तपत्रे स्वस्त दरात मिळतात. वाचकात वाढ होते व साक्षरता होते. जाहिरातींमुळे राहणीमान उंचावते. परस्परसंबंध वाढतात. माणसा-माणसांमधील, समाज-समाजांमधील राष्ट्रीय एकात्मता घडते. जाहिरातींचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दूरगामी परिणाम पहायचे असतील तर २०१४ च्या निवडणुकींच्या वेळेस पियुष पांडे यांनी केलेल्या जाहिरात कॅम्पेनचे उदाहरण अभ्यासले तर जाहिरात काय करु शकते हे लक्षात येते. त्यांच्या यशस्वी कॅम्पेनमुळे देशातील सत्ताच बदलली नाही तर काही प्रमाणात देशभरातील नागरिकांची विचारधाराच बदलली.

निवडणूक जिंकून देणारी जाहिरात

७ सप्टेंबर २०१३ रोजी भाजपने नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे जाहिर केलं. हे नाव जाहिर करत असताना ते भाजपप्रणित आघाडी सरकारचे नाही तर फक्त भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील व भाजपच्या सर्व जाहिरातींवर फक्त मोदींचा चेहरा दिसेल अशी मांडणी करण्यात आली. त्यानंतरच्या टप्यामध्ये मोदींची जाहिरात नेमकं कोण करणार याची चर्चा करण्यात आली व एकमताने पियूष पांडे “ऑगिल्वी” कंपनीचा विचार करण्यात आला. पियूष पांडे यांनी याअगोदर कॅडबरी, फेविकोल, राजस्थान टुरिझम, वोडाफोन ,झूझू अशा अनेक लोकप्रिय जाहिराती केल्यानं त्यांना जनतेची नस बरोबर लक्षात येईल यावर अनेकांच एकमत होतं. पियूष पांडे यांच्या एक्झुकिटिव्ह चेअरमन आणि क्रियेटिव्ह डायरेक्टर असणाऱ्या कंपनीसोबतच साम बलसारा यांच्या मॅडिसन कंपनीला या जाहिरातींची जबाबदारी देण्यात आली होती. पियूष पांडे हे जाहिरात क्षेत्रातलं मातब्बर नाव असल्यानं त्यांनी मोदींच्या जाहिरातींची दिशा स्पष्ट केली. ही जाहिरात तीन टप्यांमध्ये राबवण्याचं नियोजन त्यांनी केलं.
पहिल्या टप्प्यात जनता माफ नहीं करेंगी या वाक्याचा वापर पुरेपुर करण्यात आला. कशाप्रकारे देशातील वातावरण योग्य नाही हे ठासवण्याचा प्रयत्न या जाहिरातीतून करण्यात आला. भ्रष्टाचार, महागाई यांच्यासारख्या मुद्यांमुळे जनता नाराज आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्व जाहिराती या ब्लॅक अॅण्ड व्हाईट रुपात मांडल्या गेल्या जेणेकरून सर्वत्र अंधकार आहे ही भावना लोकांच्या मनात तयार होईल.
दुसऱ्या टप्प्यात लोकांच्या या नाराजीला काहीतरी चांगल होईल अशी आशा दाखवणारं कॅम्पेन उभा करण्यात आलं. त्याची टॅगलाईन अच्छे दिन आनेवाले हैं ठरवण्यात आली. काहीतरी चांगल होईल हा विश्वास दाखवत असताना जास्तित जास्त कलरफुल जाहिराती करण्यावर भर देण्यात आला. तर तिसऱ्या टप्प्यात अबकी बार मोदी सरकार हे वाक्य तिसऱ्या टप्यामध्ये लोकांच्या मनावर ठासवण्यात आला. पहिल्या टप्यात लोकांची नाराजी मांडण्यात आल्यानंतर दूसऱ्या टप्यात आशा जागवण्यात आल्या आणि तिसऱ्या टप्यात लोकांना प्रत्यक्ष मत देण्यासाठी कृती करण्याचं ठासवण्यात आले. जाहिरात करत असताना अनेक लोकांचा समूह आणि गर्दीचा पुरेपुर वापर करत आला लोकं संघटित होतं आहे हे बिंबवण्यात आलं.अवघ्या ७५ दिवसात २०० जाहिराती, १५० रेडिओ जाहिराती आणि १००० मुद्रित आणि जाहिरातीफलकांद्वारे प्रचंड मोठ्ठे कॅम्पेन उभे करण्याचं कामं पियूष पांडे यांना केलं होतं. अर्थात यानंतर जे घडलं ते सर्वांसमोर आहेच.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *