स्वराज्याचे तोरण उभारले
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला Torana Fort जिंकून छत्रपतींनी स्वराज्याचे तोरण उभारले. गडावर सापडलेल्या धनाचा वापर करून किल्ल्याची डागडुजी छत्रपतींनी केली. हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला Torana Fort निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्ऱ्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला. विशेष म्हणजे खुद्द औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.
गड स्वराज्यात आला
इसवी सन १६४७चा तो प्रसंग! स्वराज्य स्थापनेचे स्वप्न घेऊन शिवराय इथे तोरण्याच्या पायी अवतरले होते. गड विजापूरच्या बादशाहकडे, पण किल्लेदार मराठा! त्याला बोलावणे पाठवले गेले. त्या रात्री राजांनी त्याला काय सांगितले हे त्या काळ आणि काळोखालाच ठाऊक . पण दुसऱ्या दिवशी सकाळी गडावरचे बादशाही निशाण खाली उतरले आणि मराठी जरीपटका फडकू लागला. राजे विजयी मुद्रेने गडावर आले. गड स्वराज्यात आला. दुरुस्तीचे आदेश सुटले आणि त्या दुरुस्तीतच एकाजागी मोहरांनी भरलेले २२ हंडे मिळाले. स्वराज्यासाठी हा दुसरा शुभसंकेत! मग त्याच जागी या तोरणजाईची स्थापना झाली आणि या संपत्तीतून शेजारच्याच मुरुंबदेवाच्या डोंगरावर स्वराज्याची राजधानी राजगड आकारास आली. तोरण्याच्या या आभाळातील उंच जागीच्या घराबद्दल जेम्स डग्लस हा इंग्रजी लेखकही कौतुकाने म्हणतो, ‘सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरण्यास Torana Fort गरुडाचे घरटेच म्हणावे लागेल!’
फुतूहुल्घैब
इसवी सन १८८०मध्ये हा डग्लस तोरणा भेटीवर आला होता. तो पुढे लिहितो, ‘शिवाजीने जिंकलेला हा पहिला मोठा किल्ला. या किल्ल्याभोवती त्याने मराठी राज्याचा पसारा वाढवला. ज्या मराठी राज्याने मुघल बादशाहचे आसन हलविले, त्याचे हे उगमस्थान आहे. या ठिकाणी एकेकाळी कितीतरी लढाया झाल्या. पण आज इथे काय दिसत आहे? जिकडेतिकडे दगडांचे ढीगच्या ढीग पडले आहेत. पडक्या इमारतींवर उंच गवत वाढले आहे.’ काळाच्या ओघात थकलेला तोरणा Torana Fort पाहून या विदेशी डग्लसचेही मन हेलावले.
तोरण्याची ही दुर्गमता-उंचीबद्दल मुघलांच्या नोंदीतूनही काही माहिती मिळते. १० मार्च १७०४ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव ठेवले- ‘फुतूहुल्घैब’! म्हणजे ‘दैवी विजय’! मग हा ‘दैवी विजय’ घेत हातमखान नावाचा किल्लेदार इथे काम करू लागला, पण काही दिवसांतच त्याला या ‘फुतूहुल्घैब’मधील भयाणता टोचू लागली. एका पत्रात तो लिहितो, ‘दैवाच्या विलक्षण तडाख्यामुळे मी तोरण्यात येऊन पडलो आहे. हे स्थळ तिटकारा करण्यासारखे आहे. भुतांचे आणि राक्षसांचे निवासस्थान आहे. किल्ल्याभोवतीच्या दऱ्या सप्तपातळातील नरकासारख्या दिसतात.’ हातमखानला सतावणारी ही सारी भयाणता आजही या उंच जागी आले, की जाणवते. भोवतीचा तळ पाताळाप्रमाणे खोल वाटू लागतो.
पावसाळ्यात किल्ल्याचे रूप खूपच खुलून दिसते.गडाची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत आहे.गडावर पाषाणातील मेंगाई मातेची मूर्ती आहे.मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारमाही पाण्याचे टाके आहे.मंदिराच्या पूर्वेकडे चिलखती बुरूज आहे. चिलखती बुरूजावरून समोरच्या विर्स्तीण अशा प्रदेशावर लक्ष ठेवता येते.गडाचा प्रचंड असा विस्तार पाहून छत्रपतींनी याला प्रचंडगड असेही नाव दिले.गडाच्या पश्चिमेला बुधलामाची आहे.बुधलामाचीच्या टोकाला चित्ता दरवाजा आहे.गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत,तर दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे.
तोरणा किल्ला वर कसे जायचे
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या किंवा खाजगी वाहनाने वेल्हे गावाला जाता येते. पुण्याहून नसरापूर मार्गे वेल्हे ६८ किलोमीटर. स्वत:चे वाहन असेल तर आता पुण्याहून पानशेत रस्त्यावरून पाबे घाटमार्गेही वेल्हय़ाला जवळच्या रस्त्याने जाता येते. पूण्याहून साधारणता अडीच तासात वेल्हे गावात पोहचता येते.वेल्हे गावातून गडाची चढण सोपी आहे.या वेल्हय़ापर्यंत पोहोचलो, की तोरणा त्याचा हा प्रचंड आकार, उंची घेऊन समोर उभा ठाकतो. त्याच्या या दुर्गमतेकडे पाहताच कचदिलांचे पाय इथेच गळतात, तर जातीच्या मावळय़ांचे रक्त सळसळू लागते. या ऊर्मीतूनच वेल्हय़ातून निघणाऱ्या या वाटेवर स्वार व्हायचे. खरेतर तोरण्याच्या उभ्या पर्वताला भिडण्यापूर्वीच काही टेकडय़ांचा खेळ अगोदर पार पाडावा लागतो. एक चढली की दुसरी, मग तिसरी असे हे टेकडय़ांचे कंटाळवाणे खाली-वर होते. मग यानंतर आपण मुख्य डोंगराला भिडतो. तोरण्याची उंची ४६०६ फूट आणि सारी वाट उभ्या धारेवरची. यामुळे थोडय़ाच वेळात घाम गळायला सुरुवात होते. एक-दोन ठिकाणी उभ्या कडय़ात कठडय़ांचा आधार घेत वाट वर सरकते.
इतिहासात अशा दुर्दम्य चढाईबरोबर गडाभोवतीच्या संरक्षक मेटांचाही सामना करावा लागे. कुठल्याही डोंगराच्या उताराच्या दिशेने काही शिरा खाली उतरतात. या डोंगरशिरांवरूनच गिरिदुर्गावर जाणाऱ्या वाटा धावतात. गडांवर चढणाऱ्या या वाटा रोखण्यासाठी या डोंगरशिरांच्या सपाटीवरच काही लढाऊ जमातींची वस्ती वसवली जायची. यांना ‘मेट’ म्हटले जाई. ही अशी मेटे विशिष्ट गाव, जात किंवा आडनावांच्या लोकांच्या प्रतिष्ठेची असत. जेव्हा शत्रूचा हल्ला होई त्या वेळी ही मेटेच अगोदर प्राणपणाने लढत. तोरण्याभोवतीही अशी सात मेटे होती. यातील वरली पेठ, वाघदरा, भट्टी, बार्शी माळ, पिलवरे ही मेटे आणि त्यावरील अनुक्रमे भुरूक, देवगिरीकर, कोकाटे, भुरूक, पिलवरे ही घराणी आजही या भागात प्रचलित आहेत.
तोरण्याची ही चढाई आपला कस लावते आणि मगच बिनी दरवाजातून गडप्रवेशास अनुमती देते.या गडावर पूर्वी तोरण जातीची झाडे जास्त होती म्हणून याला तोरणा असे नाव मिळाले असे म्हटले जाते. झुंजार माची, बुधला माची आणि दोन्हीच्या मधोमध उंचीवरचा बालेकिल्ला हे तोरण्याचे स्वरूप! बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आपण बालेकिल्ल्यात शिरतो. किल्ल्यावर जाताना थेट बालेकिल्ल्यातील प्रवेश हेही तोरण्याचे वैशिष्टय़ आहे. गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारमाही पाण्याचे टाके आहे.
Leave a Reply