Talegad Fort

Talegad Fort – शिवशाहीचा एक्का तळेगड

शिवरायांनी तळे-घोसाळे हे दोन्ही गड इ.स. १६४८ मध्ये स्वाधीन करून घेतले. तळेगड Talegad Fort ताब्यात घेतल्यामुळे शहाजीराजांच्या ताब्यात असलेल्या जहागिरीत वनराईने व्यापलेला, गनिमीकाव्यात सोयीचा असा कोकण, शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी निवडला. हे मजबूत व नैसर्गिक संरक्षण असलेले गड शिवरायांच्या ताब्यात आल्यामुळे त्यांनी पुढील सात वर्षात कोकणच्या आरमारासाठी पायाभूत जमवाजमव केली.

इतिहास
निजाम मलिक अहमदने १५८५मध्ये तळेगड Talegad Fort पुनर्वापरात आणला (रिओपन केला असा कुलाबा गॅझेटिअरमधील उल्लेख आहे) हा उल्लेख असं दर्शवतो की, हा गड शिवपूर्व काळापासूनचा आहे. भु-या डोंगरावर तटबंदी निर्माण करून या डोंगराची निर्मिती केली आहे. सातवाहन काळात मंदगोर व वाशी या प्रमुख बंदरामुळे कुडा लेणी तयार झाली. बंदरात आलेला आयात माल, इंदापूरजवळील अमरोलीवरून, उंबरठा ओलांडून पैठणकडे जात असे. त्या घाटमार्गावर ठाणाळे, खडसांबळे, लोणावळे संकुलातील लेणी तयार झाली आहेत. येथील मंदगोर बंदराला ऊर्जितावस्था आल्यावर अमिर राजाच्या काळात उत्तर कोकणची राजधानी सोपाऱ्याहून मध्यवर्ती असलेल्या पुरी येथे आणली. त्यावेळी तटबंदी असलेला तळेगड बांधून येथे राजधानी स्थापली. खाडीत शिरलेल्या सहय़ाद्रीच्या भूशिरावर ही राजधानी वसवल्यामुळे तिला मांदाड, रहाटाड व मालाठे खाडीचे तीनही बाजूंनी नैसर्गिक संरक्षण मिळाले. शत्रूपक्षाला खाडी ओलांडल्याशिवाय कसब्यामध्ये येता येत नव्हते. हा कसबा गडावरच असून समुद्रसपाटीपासून ५०० फूट उंच आहे आणि तटबंदी येथून ४०० फूट उंच आहे. माथ्यावरील कातळाचा उपयोग तटबंदी उभारण्यासाठी केल्यामुळे दक्षिण व उत्तरेच्या तटबंदीला ४०० फूट उंचीची नैसर्गिक अभेद्यता आहे.
महमद गवान या बहमनीच्या सेनापतीने कोकणातील यादवांचे व विजयनगरचे साम्राज्य धुळीला मिळविले त्यावेळी या कसब्याचा व गडाचा पूर्ण विध्वंस केला होता. परंतु त्यावेळी विजयनगरचे अस्तित्व दाखविणारा कोकणातील एकमेव तामिळी शिलालेख येथील मंदिरात आहे. त्यात तामीळनाडूमधील राजमहेंद्री या जिल्ह्याचा उल्लेख आहे.

गड स्वराज्यात सामील
सोडवलेकर व कोडवलेकर या दोघांची आदिलशहाने तळे व घोसाळे गडाचे गडकरी म्हणून नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस कळविले की, आम्हास हबशांच्या ताबेदारीचा वीट आला आहे. आपण इकडे आल्यास आम्ही तळे व घोसाळे गडांचा ताबा देतो. अशी अनुकूलता पाहून शिवरायाने हे दोन्ही गड इ.स. १६४८मध्ये स्वाधीन करून घेतले. तळे व घोसाळे परगण्याच्या देशमुखांनी खूप मदत केली. तळेगड Talegad Fort ताब्यात घेतल्यामुळे शहाजीराजांच्या ताब्यात असलेल्या जहागिरीत वनराईने व्यापलेला, गनिमीकाव्यात सोयीचा असा कोकण, शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी निवडला. तेथे जीवाला जीव देणारी निष्ठावान माणसे मिळविली. तळे-घोसाळे गड हे मजबूत व नैसर्गिक संरक्षण असलेले गड शिवरायांच्या ताब्यात आल्यामुळे त्यांनी पुढील सात वर्षात कोकणच्या आरमारासाठी पायाभूत जमवाजमव केली आणि कल्याण सुभा ताब्यात आल्यानंतर तेथे आरमार स्थापन केले. भवानी या कुलदेवतेचे एक स्थान तळेगडावर असल्यामुळे त्यांनी या देवळास सुरू केलेल्या सनदा अजूनही चालू आहेत.

गडाच्या पूर्व उतारावर कसब, शेजारी रहाटाड, खांबोली, मालाठे, गिरणे, धनगरवाडी, वैतागवाडी, अंबेळी आणि तारणे या वाडय़ा येतात. मंदानदी व बामणघर नदी यांच्या संगमाजवळ बामणघर हे गाव आहे, तो ब्राह्मणघरचा अपभ्रंश आहे. मंदा नदीमुळे सुपीक जमीन व पाण्याची उपलब्धता होती. सातवाहन काळात बाण हेच मोठे शस्त्र असल्यामुळे तटबंदीत बाण मारण्यासाठी शेकडो जंग्या आहेत. आपत्काली शत्रूपक्षाच्या वाटेवर तेल ओतण्यासाठी तटबंदीत तेलासाठी खोबण खोदली आहे. हे सातवाहन काळातील गडाचे वैशिष्टय़ होते. खजिना ठेवण्यासाठी लक्ष्मीची कोठी आहे. सैन्याबरोबर असणाऱ्या बैल, घोडे व इतर प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जो तलाव गडाच्या पायथ्याशी बांधत त्याला सातवाहन काळात ‘पुसाटी’ म्हणत. या नावाचा तलाव येथे अजूनही आहे. या सर्व वैशिष्टय़ामुळे व बालेकिल्ल्याच्या बांधणीने असे लक्षात येते की, हा गड सातवाहनकालीन आहे. तळेगडाच्या पार्श्वभूमीला वसलेल्या गावांचे प्राचीनत्व येथे असलेल्या तीन वेशींवरून लक्षात येते. प्रत्येक ठिकाणी ५ ते ६ फुटी वेशीवरील मारुती आहे. तळेगडावरून घोसाळेगड, कुडालेणी येथून जंजिरा मुरूडपर्यंत किंवा आगीमार्फत संदेश देता येत असे. ते संदेश साईच्या डोंगरावरून रायगडापर्यंत पोहोचत असत. म्हणून त्यांना काहींनी टेहळणी बुरुज म्हटले आहे. हा शिवरायांच्या किल्ल्यांमधील एक महत्त्वाचा गड.शत्रूसैन्याने कब्जा केलाच तर जाताना त्यांची धुळधाण व्हावी म्हणून खोबणीतील तेल वाटेवर टाकत असल्यामुळे परत जाणारे सैन्य घसरून पडून ताब्यात येत असे.

घोसाळेगडाची मजबूती

३१ जुलै १६५७ रोजी शिवरायांनी रघुनाथ बल्लाळ कोरडे यास जंजि-यावर स्वारी करण्यास पाठविल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात शिवाजी राजांनी तळेगडावर येऊन सुरगड, भौरप (सुधागड), कांगोरी हे किल्ले ताब्यात घेऊन राजपुरी सुभ्यांतील पूर्वेकडील भूभाग ताब्यात घेतला. रायरीवरील जावळीच्या मो-यांचा प्रचंड खजिना मिळाल्यामुळे शिवरायांनी तळेगड व घोसाळेगड मजबूत करण्याची व्यवस्था केली.
कसब्यापासून १५० फुटाच्या सुलभ चढावानंतर पहिल्या तटबंदीचा उद्ध्वस्त चित्दरवाजा आहे. पहिल्या तटबंदीपासून दुस-या तटबंदीपर्यंत चढ अवघड आहे. दुसरी तटबंदी दक्षिणोत्तर ११० फुटी आहे. तिच्या प्रवेशद्वाराजवळ कातळात हनुमान मूर्ती कोरलेली असल्यामुळे तिला हनुमान दरवाजा म्हणतात. दरवाजाच्या दगडी स्तंभाला मध्य भागात अडसर लावण्यासाठी दोन भोके आहेत. किल्ल्याचे प्रवेशद्वार बंद झाल्यावर किल्ल्यात प्रवेश करणे शक्य नव्हते. येथे मिळणा-या झाडांच्या मुळ्या अर्धागवायू झालेल्या अवयवास चोळल्यास ते झटकन बरे होतात, अशी येथील आदिवासी लोकांची समजूत असल्यामुळे तळेगड त्यासाठीही प्रसिद्ध होत आहे. दुसरी तटबंदी संपून बालेकिल्ल्याची तिसरी तटबंदी केव्हा सुरू होते ते बालेकिल्ल्याच्या दरवाजात आल्यानंतरच कळते.

बालेकिल्ला
बालेकिल्ल्याची पूर्व-पश्चिम लांबी १२०० फूट आहे. पूर्वेकडील रुंदी ९० फूट आहे. बालेकिल्ला पश्चिमेस अरुंद होत गेल्यामुळे तेथे रुंदी फक्त १५ फूट आहे. तेथून कडेलोटाची शिक्षा करीत. तो मुख्य डोंगरापासून तासून काढल्यामुळे, गडाचे रूपांतर अवघड किल्ल्यात झालेले आहे. कडेलोटाच्या अलीकडे गडावरून आपत्काली खाली उतरण्यासाठी एक भुयार आहे. ४० वर्षापूर्वी त्याचे तोंड साफ करून त्यात उतरण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी तेथे दोर बांधण्यासाठी कडी दिसली परंतु त्यानंतर दुसरे प्रयत्न झाले नाहीत. आणीबाणीच्या प्रसंगी गडावरून दोरीने बाहेर पडण्याचा तो एकतर्फी मार्ग होता.
१२ महिने पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही योजना आणण्यासाठी तटबंदी ही डोंगरमाथ्याच्या कडेला बांधली असल्यामुळे तटबंदी व डोंगरामध्ये पूर्व-पश्चिम खंदक निर्माण झाले आहेत. त्यांत पावसाचे पाणी साठून तेच पाणी साठवणीच्या टाकीत झिरपून आल्यामुळे पिण्यासाठी १२ महिने पुरत असे. त्यांत कोठूनही सांडपाणी शिरणार नाही, अशी व्यवस्था आहे. कातळांतर्गत पाण्याच्या टाकीची लांबी व रुंदी ४ मीटर आहे. या टाकीत नेहमी पाणी असल्यामुळे त्यांची निश्चित खोली समजलेली नाही; परंतु खोदताना आधारासाठी काही ठरावीक अंतराने दगडी खांब आहेत.

भौगोलिक सलगता
रायरी, पुरी (तळेगड), जंजिरा व कुडा लेणं हे १8 उत्तर अक्षांश व ७3 पूर्व रेखांशावर जवळपास असल्यामुळे त्यांच्यात भौगोलिक सलगता आहे. त्याचा उपयोग संदेश देण्यासाठी करत असत. आपत्काळी संदेश पाठविण्यासाठी आगळी पद्धती होती. काही झाडे जाळल्यावर पांढरा धूर निघत असल्यामुळे दिवसा संदेश देण्यासाठी लाकडाचे वर्गीकरण करून चांगल्या बातमीच्या वेळी पांढरा धूर केला जाई आणि आक्रमण असेल तर काळा धूर करून सभोवतालच्या गडांवर योग्य संदेश पोहोचविला जात असे. आजूबाजूचे किल्लेदार संदेशानंतर आपल्या किल्ल्यावर तसाच धुराचा लोट तयार करून शेजारच्या किल्ल्यांना इशारा देत. या पद्धतीने शत्रूच्या आक्रमणाची खबरबात काही वेळातच संपूर्ण कोकणात जात असे.
पुरंदर तहात शिवाजी राजेंनी दूरदृष्टी ठेवून जे १२ गड आपल्या ताब्यात ठेवले त्यात तळेगड व घोसाळेगड होते. या गडांच्या आधारे साम्राज्य पुन्हा निर्माण करता येईल, अशी महाराजांची धारणा होती. या १२ गडांच्या स्थलसीमा मुख्यत: कोकण व कोणघाटमाथापर्यंत मर्यादित होत्या. तहाद्वारे खालील किल्ले शिवरायांकडे राहिले. १) राजगड, २) रायरू, ३) तळे, ४) घोसाळे, ५) भोरप (पाली), ६) तोरणा, ७) अलवारी, ८) पाल, ९) लिंगणगड, १०) महाडगड, ११) उदयदुर्ग. पेशव्यांनी नारो त्र्यंबक सोमण यांना राजपुरी सुभ्याच्या मामलतदाराची सनद १७४०मध्ये दिली. त्यांना वसुली व्यवस्थेबरोबरच लष्कर अधिकारीही मिळाले. वार्षिक वेतन, पालखी, दिवटय़ा यांचा मोबदला असे. सोमणांच्या ताब्यात तळेगड, मानगड, घोसाळगड व विश्रामगड हे चार किल्ले होते. तळेगडाच्या भोवतालची १०४ गावे मिळून तळे महाल बनविला होता.

गड इंग्रजांच्या ताब्यात
दुसरा बाजीराव येथे साडेसहा महिने राहिल्याचा संदर्भ आहे. त्या काळात १३ तोफा येथे आणल्या होत्या. त्यातील ५ तोफा गावांत आहेत व ८ तोफा निरनिराळ्या पोलीस स्टेशनची प्रवेशद्वारे सुशोभित करीत आहेत. तळेगडावर मोठा शस्त्रसाठा आहे, असे समजल्यामुळे लेप्टनंट कर्नल प्रॉथर इंद्रापूर मार्गे १७ एप्रिल १८१८ या दिवशी आला. १८व्या रेजिमेंटने तळ्यापासून पाच मैलावर असलेल्या बोरघर माळावर तळ ठोकला. प्रचंड सैनिक दल बघून तळेगडाचे किल्लेदार कृष्णाजी जयराम सोमण यांनी शरणागती स्वीकारली. तेथील दोन रॉकेट्स, तेरा तोफा व इतर शस्त्रे ताब्यात घेतली. पुन्हा उठाव करू नये म्हणून गडाच्या चित्दरवाजाची नासधूस केली. लेप्टनंट बेलासीसच्या नेतृत्वाखाली एक तुकडी घोसाळगडाकडे पाठविली. ते बंदुकीचे आवाज करीत गेल्यामुळे घोसाळे गडावर प्रतिकार झाला नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र युद्धात कारावास सोसलेल्या प्रभाकर रामकृष्ण देशमुख यांनी रात्री १२ वाजता गडावर जाऊन तिरंगा फडकाविला. हल्ली गडाची निगा पुरातत्व खाते ठेवीत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *