shivtej din

Surgical Strike :छत्रपती शिवरायांचा सर्जिकल स्ट्राइक

छत्रपती शिवरायांचा सर्जिकल स्ट्राइक Surgical Strike ५ एप्रिल १६६३ (चैत्र शुद्ध अष्टमी : शिवतेज दिन)

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील लालमहालामध्ये काही मावळ्यांच्या साथीने लाखभर सैन्य सोबत असलेल्या शाहिस्तेखानावर गनिमी काव्याने केलेला हल्ला म्हणजे जगाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक Surgical Strike होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो. तिथीनुसार चैत्र शुद्ध अष्टमीला घडलेली ही घटना. त्यादिवशी तारीख होती ५ एप्रिल १६६३.

लालमहाल

राजमाता जिजाऊंनी सिंदखेड राजा येथील राजवाड्यापेक्षा मोठा महाल पुण्यात बांधून त्याला लालमहाल नाव दिले. लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले, असे सांगितले जाते. स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन शिवाजी महाराजांनी अनेक पराक्रम गाजवले. अनेक शत्रूंना पळता भूई थोडी केली. शिवरायांच्या पराक्रमाने औरंगजेब पुरता हैराण झाला होता. अफजलखान वधानंतर औरंगजेबाची पाचावर धारण बसली. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान याला एक लाख सैन्य मंजूर करून स्वराज्यावर धाडले.

शाहिस्तेखान

हा मोगलाईतील एक मातबर सरदार. तो पुण्याला प्रत्यक्ष राजांच्या लालमहालात तळ देऊन बसला होता. एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल तीन वर्षे. खानाने चाकण, सासवड, इंदापूर काबीज करून सुप्यास वेढा घालून पुण्यावर हल्ला केला. शाहिस्तेखान स्वराज्यात आला, तेव्हा शिवराय पन्हाळगडावर पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान पुण्यातील लालमहालात येईपर्यंत शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेढ्यातून सुखरूप सुटून रायगडावर पोहचले. शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत आहे, अशी बातमी शिवाजी महाराजांना समजली. दरम्यानच्या काळात शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली. त्याने अनेक गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले. तब्बल तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन शिवाजी महाराजांना आव्हान देत होता. शिवाजी महाराजांचे प्राण हे त्याच्या प्रजेत असून, प्रजेला त्रास दिल्याशिवाय शिवाजी महाराज हाती लागणार नाहीत, हे शाहिस्तेखानने ओळखले होते. शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली.

धाडसी योजना

लालमहालावर रात्रीच्या अंधारात मोजक्या लोकांनिशी हल्ला करण्याची. सव्वा लाख फौजेच्या गराड्यात असलेला लालमहाल पूर्ण बंदोबस्तात होता. महाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं. त्यात एकूण किती माणसं काम करीत होती हे तपशीलवार माहिती मिळत नाही.पण गुप्तरितीनं वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसे असली पाहिजेत असे वाटते. या योजनेची कल्पनाच अफाट होती. सव्वा लाखाची छावणी. त्यात बंदिस्त लाल महाल. त्यात एका बंदिस्त दालनात खान. अन् त्याला गाठून छापा घालायचा. हे केवळ कल्पनेतच शक्य होते. पण असं अचाट धाडस महाराजांनी आखले. Surgical Strike ही संपूर्ण मोहिम मुख्यत: हेरांच्या करामतीवर अवलंबून होती. लाल महालावरच्या छाप्यासाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली.याच महिन्यात मोगलांचे पवित्र रोज्याचे उपवास सुरू झाले होते. छाप्याच्या रात्री सहावा रोजा होता. आकाशातला चंद छाप्याच्या सुमारास पूर्ण मावळणार होता. रमजानच्या रोजाच्या उपवासामुळे मोगली सैन्य रात्र झाल्यावर भरपूर जेवण करून सुस्तावणार आणि चंद्र मावळल्यावर होणाऱ्या अंधारात योजनेची सफल होण्याची शक्यता अधिक होती.

शिवतेज दिन Surgical Strike

राजगडावरून महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले. (दि ५ एप्रिल १६६३, चैत्र , शुद्ध अष्टमी , रात्री) ते कात्रजचे घाटात आले.शाहिस्तेखानाने आपल्या पुण्यातल्या छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्याकरता आवश्यक तेवढे आपले सैनिक रोजी ठेवले होते. यात काही मराठी सरदार आणि सैनिकही होते. गस्त घालायला जाणारे लोक छावणीभोवतीच्या मोगली चौकीदारांना माहित झालेले होते. महाराजांनी याचा फायदा घेतला. आपल्या बरोबरच्या सुमारे पाचशे सैनिकांपर्यंत एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना , ठरविल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठविली. हे बिलंदर सैनिक , जणू काही आपणच मोगली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचेच लोक आहोत अशा आविर्भावात छावणीत प्रवेशू लागले. चौकीदारांनी त्यांना हटकलेही. पण ‘ आम्ही रोजचेच गस्त घालणारे. आम्हाला ओळखलं नाही ? गस्तीहून परत आलो! ‘ असा जवाब धिटाईनं करून आत प्रवेशले. चौकीदारांना वाटलं की होय , ही रोजचीच गस्तीची मंडळी. परत आली आहेत.महाराजांना आपलाच लाल महाल चांगला परिचयाचा होता. महाराजांनी आत प्रवेश केला.मुदपाकखान्याच्या दाराच्या आतल्या बाजूला जो पहारेकरी होता त्याच्यावर पहिला घाव पडला. तो ठार झाला. आणि त्याच्या ओरडण्याच्या आवाजानं माडीवर असलेला शाहिस्तेखान एकदम खडबडून उठला. तो धनुष्यबाण घेऊन माडीवरून खाली अंगणात धावत आला. शाहिस्तेखानाचा एक मुलगा , अबुल फतहखान जवळच्याच दालनांत झोपलेला होता. तो खडबडून बाहेर आला. अंगणात , आपल्या वडिलांवर कोणीतरी घाव घालू पाहतोय हे त्याच्या लक्षात आलं. तो वडिलांना वाचविण्यासाठी पुढं आडवा आला अन् महाराजांच्या तलवारीखाली ठार झाला.

योजना सफल

योजनेप्रमाणे काही मावळ्यांनी लाल महालाच्या मुख्य दरवाज्याच्या माथ्यावर असणाऱ्या नगारखान्यात घुसायचे ,तेथे झोपलेल्या वाद्य वादकांना असेच एकदम उठवायचं आणि तेथील नगारे , कर्णे, तुताऱ्या, ताशे इत्यादी वाद्ये वाजवायला लावायचे आणि आणखी एक गोंधळ उडवून देण्याचा प्रकार ठरविलेला होता. तो अगदी तसाच घडला. जिवाच्या आकांताने खान जिन्याने धावत होता. महाराज त्याचा पाठलाग करीत होते. गोंधळलेला खान केवळ जीव वाचविण्याकरताच पळत होता. स्त्रियांच्या त्या दालनात खान शिरला.खान घाबरून धावत आल्याचे तेथील बायकांनी पाहिले. पडद्याला पडलेल्या भगदाडातून महाराजांची आकृती आत येताना स्त्रियांनी पाहिली. तिथं असलेली शमादाने कोणा शहाण्या स्त्रीने फुंकून विझविली. अधिकच अंधार झाला. महाराज आता अंदाजाने खानावर धावून गेले होते. महाराजांना वाटले खान येथेच आहे. म्हणून त्यांनी आपल्या तलवारीचा खाडकन घाव घातला. घाव लागल्याचे त्यांना जाणवले. त्यांना वाटले घाव वर्मी लागून खान मेला अन् महाराज तेथून तडक आल्यावाटेने परत परतले.संपूर्ण लाल महालाची वास्तू भयंकर कल्लोळाने दणाणत होती. त्यातच नगारखान्यातील वाद्यांचा कल्लोळ सुरुच होता. महाराजांचा मुख्य उद्देश मात्र अंधारात अधांतरीच राहीला. खान बचावला. त्याची फक्त तीन बोटे , उजव्या हाताची तलवारीखाली तुटली.आपले छाप्याचे काम फत्ते झाले असे समजून पूर्वयोजनेप्रमाणे महाराज आणि मावळे लाल महालातून निसटले. त्यानंतर अवघ्या एका दिवसात आपले चंबूगबाळे आवरुन खानाची सेना पुणे सोडून गेली. ह्या आकस्मित हल्ल्यात मराठ्यांचे फक्त सहा सैनिक मारले गेले तर ४० जखमी झाले. याउलट शायिस्तेखानाचा एक मुलगा आणि एक सेनापती, त्याच्या सहा बायका, त्याचे ४० नोकर आणि दासी ठार मारल्या गेल्या. ह्याशिवाय खानाची दोन मुले, आठ इतर स्त्रिया आणि खुद्द शाहिस्तेखान इतकेजण जखमी झाले.

Shivaji-Maharaj-Killing-Shaista-Khan

महाराजांचा दबदबा वाढला

या हल्ल्यामुळे शाहिस्तेखानाला पराभवापेक्षा आयुष्यभर सोसावी लागली भयंकर अन् कायमची होत राहणारी थट्टा , कुचेष्टा. त्याच्या प्रत्येक घासाला त्याला शिवाजीमहाराजांची आठवण होत असे. उजव्या हाताची तीन बोटेच तुटली ना! प्रचंड सैन्य , खजिना आणि प्रचंड युद्धसाहित्य हाताशी असूनही त्याला मराठ्यांवर तीन वर्षाच्या दीर्घकाळात एकही मोठा विजय मिळवता आला नाही.मोगल साम्राज्यासारख्या एका प्रचंड सत्तेचा तो सरसेनापती म्हणून महाराष्ट्रावर चालून आला. पण त्याच्या पारड्यात अंगुलीमात्रही यश पडले नाही.
मराठ्यांच्या या धाडसामुळे आणि पराक्रमामुळे महाराजांचा दबदबा कमालीचा वाढला. महाराज प्रत्यक्ष सैतानाचाच अवतार आहे असे मानले जाऊ लागले. महाराजांना प्रवेश करता येणार नाही अशी कोणतीही सुरक्षित जागा नाही आणि कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य नाही असेच समजले जाऊ लागले. औरंगजेबच्या कानावर ज्यावेळी ही अकल्पित संकटाची वार्ता आली. तेव्हा त्याने त्याचा ठपका सुभेदाराच्या निष्काळजीपणावर व असमर्थतेवर ठेवला. शाहिस्तेखानाला शिक्षा म्हणून बंगालमध्ये पाठवण्यात आले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *