Sinhgad Fort | पुण्यनगरीचे दोन मानबिंदू एक म्हणजे शनवारवाडा व दुसरा किल्ले सिंहगड. पुण्यातून नैऋत्य दिशेला उंच आकाशात दिसणारा व आकाशवाणी केंद्राचे दोन टॉवर असलेला किल्ला म्हणजे सिंहगड. सिंहगडाबाबत काहीजणांना लहानपणी शाळेतील शिकलेला ‘गड आला पण सिंह गेला’ या धड्यातील यशवंती घोरपड व ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचं’ असे म्हणणारा तानाजी मालुसरे आठवतो. पण या शिवाय जास्त काही सिंहगडाविषयी सांगता येत नाही. पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) मुछ्म्द तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख इ.१४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सीडी अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला.शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे. दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला. शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता. शिवरायांच्या निधनानंतर हा गड कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे राहिला. यामध्येच एक जुलै १६९३ मध्ये नावजी बलकवडे आणि विठोजी कारके या मराठावीरांनी तानाजींच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करत गड जिंकला. छत्रपती राजाराममहाराजांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांनी औरंगजेबाने सिंहगड पुन्हा जिंकला आणि त्याचे नाव ठेवले ‘बक्षी-दा-बक्ष’! याचा अर्थ दैवी देणगी. पण औरंगजेबाची ही देणगी त्याच्याकडे दोनच वर्षे राहिली. मराठ्यांनी पुन्हा हा गड जिंकला आणि तो १८१८च्या पेशवाईच्या अखेर मराठे-इंग्रज लढाईपर्यंत त्यांच्याकडेच राहिला. शेवटच्या लढाईनंतर इंग्रजांनी हा गड घेतला. त्या वेळी इंग्रजांना गडावर ६७ तोफा, त्यांना पुरेल एवढा दारूगोळा, जडजवाहीर, दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा मोठा खजिना मिळाला. पुढे अनेक दिवस हे इंग्रज गडावरील ही लूट टोप्यांमध्ये भरभरून आणून पुण्याच्या बाजारात विकत होते.या गडावर दूरदर्शनचा एक उतुंग असा टॉवर आहे.
पुणे दरवाजा :- गड चढून वर गेलानंतर आपण या भव्य प्रवेशद्वाराजवळ पोचतो हा दरवाजा बुलंद व बळकट वाटतो. दरवाजातून आत आल्यावर आपणाला दारूचे कोठार ,घोड्याच्या पागा , प्राचीन टाके पहावयास मिळेल.
कल्याण दरवाजा :- कल्याण दरवाजा हा गडाच्या पश्चिमेला म्हणजेच राजगड,तोरणा या किल्याच्या दिशेला आहे . कल्याण गावातू वर आल्यावर ह्या दरवाजाच्या दोन्ही बुरजावर हत्ती व माहूत याची कोरीव शिल्पे आहे .
देवटाके:– अमृतेश्वराच्या मंदिराजवळ ह्या देवटाके आहेत. यामध्ये पिण्याच्या पाणी उपलब्ध आहे. महात्मा गांधी ज्यावेळी पुण्यात येत तेव्हा याच देवटाकेतील पाणी आवर्जून मागवत.
कोंढाणेश्वर मंदिर :- हे मंदिर महादेवाचे असून ते यादवकालीन आहे . हे यादवचे कुलदेवत होते. तसेच पुढे गेल्यावर अमृतेश्वर भैरव मंदिर पाहवयास मिळेल या मंदिरात आपला भैरव व भैरवी ह्या दोन मूर्त्या पहावयास मिळतील.
तानाजी मालुसुरे स्मारक :- ह्या गडावर तानाजी मालुसरेची या पराक्रमी योद्याचे स्मारक पहावयास मिळेल. इथे त्यांची एक मूर्ती जी तानाजी स्मारक समितीचावतीने बांधण्यात आली आहे.
डोणागिरी कडा :- यालाच तानाजीचा कडा असेही म्हणतात.याच कड्यावरून आपल्या घोरपडीच्या साह्याने दोरखंड टाकून गडावर आपल्या मावळ्यांना बरोबर आक्रमण केले.
दारूचे कोठार – दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वसत होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
टिळक बंगला – रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
सिंहगडाची लढाई ही शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील महत्वाच्या घटनांपैकी एक आहे. मुघलांशी तहात गमावलेले किल्ले परत घेण्यात शिवाजींनी मोहिमा आखल्या होत्या. त्या योजनेतच सिंहगड परत मिळवणे अतिशय महत्त्वाचे होते.सिंहगडावर झालेली ही लढाई तानाजी मालुसरेच्या बलिदानासाठी ओळखली जाते.
पुरंदराच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यात कोंडाणा हा किल्ला प्रमुख होता. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला. सिंहगड हा मुघलांना लष्करी दृष्टीने महत्वाचे ठिकाण होते. शिवाजींच्या राज्याची राजधानी राजगड केवळ काही मैलांवर होती. तसेच या ठिकाणावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण मिळवता होते. म्हणून मुघलांनी या किल्यावर जास्त शिबंदी व सैन्य तैनात केले होते. या किल्याचे नेतृत्व राजपुतांकडे देण्यात आले होते.उदयभान राठोड हा मोघल सरदार किल्लेदार होता. शिवाजींना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते. म्हणून हा किल्ला परत घेणे अत्यंत गरजेचे होते.
सिंहगड किल्याला चहुबाजूने खड्या उताराची नैसर्गिक तटबंदी आहे. सरळसरळ युद्ध करून हा किल्ला घ्यायचे असते तर मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असते. म्हणून तानाजीने किल्या चढायची सर्वात कठीण बाजू निवडली. ही कड्याची बाजू असल्याने ह्या जागेवर फारसे सैनिक तैनात केले नव्हते. आज ही जागा तानाजी कडा म्हणून ओळखली जाते. तानाजी व काही मावळे हा ९० अंशाचा कडा चढून गेले. वर पोहोचल्यावर तानाजीचे मावळे व मुघल सेनेत जोरदार लढाई चालू झाली. तानाजी व उदयभानमध्ये द्वंद्व झाले. लढता लढता तानाजीची ढाल तुटली. तरीही डोक्यावरील शेला हाताला गुंडाळून तानाजी लढत होता. काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती तेवढ्यात जखमी तानाजी उदयभान कडून ठार झाला. परंतु जखमी उदयभानही फार काळ वाचू शकला नाही. तानाजी पडलेला पाहून लढाईचे उपसेनानी सूर्याजींनी सुत्रे ताब्यात घेतली. तानाजी पडल्याने मावळ्यांचा धीर सुटला व पळू काढू लागले. परंतु सुर्याजीने परतीचे मार्ग बंद केले व कड्याचे दोर कापून टाकले व मावळ्यांना जिंका किवा मरा असा आदेश दिला. प्रेरित झालेल्या मावळ्यांनी किल्ला सर केला. या लढाईनंतर शिवाजी महाराजांचे मावळ प्रांतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १९९९ च्या भारत पाक मधील कारगील युद्धात या लढाईपासून प्रेरणा घेत, अत्यंत अवघड कड्यांवर छुप्यारितीने चढून शत्रूवर आक्रमण केले व भारतीय सेनेने कारगीलची शिखरे पादाक्रांत केली व पाकिस्तानच्या ताब्यातील भाग परत मिळवला.
या युद्धाबाबत सभासद बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, ‘कोंडाणा आपण घेतो’, असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, ‘गड आला, पण सिंह गेला’. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले होते.
गडावर राहण्यची सोय नाही. गडावर छोटॆ हॉटेल्स यामध्ये जेवणाची सोय होते. देवटाक्यांमधील पाणी पिण्यासाठी बारामहिने पुरते. गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.
Leave a Reply