मर्हाठी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो शिवनेरी. Shivneri Fort हा पुरातन किल्ला. या किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीला मॉसाहेब जिजाऊंनी नवस केला होता की, पुत्र जन्माला आला तर त्यास तुझे नाव देईल. आज किल्ल्यांची माहिती देण्याची सुरुवात किल्ले शिवनेरीपासून करीत आहे.
शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा Shivneri Fort हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे Shivneri Fort दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.
सातवाहनांनंतर शिवनेरी Shivneri Fort चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.
यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाईस जिजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न शिवाजीने केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.
शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.
साखळीची वाट :
या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवाजीच्या पुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणार्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.
सात दरवाज्यांची वाट :
शिवाजीच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्यार्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाटसोडून उजव्या पूढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे’ मंदिर लागते मंदीराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे.
दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा; मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलॊत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाके’ आहे येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. गड फिरण्यास २ तास पुरतात. वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.
Leave a Reply