आज ३१ ऑक्टोबर
आजच्याच दिवशी ३१ ऑक्टोबर १८८० ला ‘#संगीत_शाकुंतल’ sangeet shakuntal या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला.
ज्याला अस्सल मराठी संगीत नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. १८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला. किर्लोस्करांनी कवी कुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले. आणि त्या मराठी `शाकुंतला’चा पहिला प्रयोग म्हणजे संगीत नाटकाची गंगोत्री होय. या प्रयोगात जवळपास शंभर पदे होती. आणि या पदांची रचना ओवी, लावणी, साकी, दिंडी इ. रूढ छंदांना अनुसरणारी होती.
रंगीत तालीम
१३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘शाकुंतल’च्या sangeet shakuntal पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. पुढे पाच वर्षांनी म्हणजे १८८० मध्ये आणखी एका अंकाची भर घालून अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी याच ठिकाणी पाच अंकी ‘संगीत शाकुंतल’ सादर केले होते. याने व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.
भारतीय नाटयशास्त्र
भारतीय नाटयशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं. भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत – ती वाद्यांवर वाजवली जात. त्यांत दोन प्रकार होते – निःशब्द धृवागीत आणि सशब्द धृवागीत. प्रथम निःशब्द धृवागीत वाजवले जात असे, जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. निःशब्द धृवागीताने एकप्रकारे सुरांचे गूढ असे वातावरण निर्माण होत असे. पण नाटक म्हणजे शेवटी शब्दसृष्टी. त्यामुळे निःशब्द धृवागीतानंतर सशब्द धृवागीत होत असे. त्यालाच आपण आज नांदी म्हणून ओळखतो.
नांदीची नवी प्रथा
नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार ‘संगीत शाकुंतल’ नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. ‘पंचतुंड नररुंडमालधर’ ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणाऱ्यास तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत असा अचानकपणे बदलून गेला.
Leave a Reply