s-ka-patil

यावश्चंद्रदिवाकरौ महाराष्ट्राला मुंबई Mumbai मिळू देणार नाही ही प्रतिज्ञा करणारा नेता

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, स्वातंत्र्यसैनिक, धुरंधर राजकारणी, कोकणचे तेजस्वी सुपुत्र व मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून भारतीय राजकारणात साठ वर्षे अधिराज्य गाजवलेल्या, भारतात अमेरिकेतील गहू आणून त्याबरोबर गाजर गवत वाढविणारे तसेच या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई Mumbai महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशी वल्गना करणारे स. का. पाटील यांच्या २४ जून स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.

स. का. पाटील यांचा जन्म १४ ऑगस्ट १९०० रोजी कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले या गावातील कुडाळ देशकर ब्राह्मण ज्ञातीतील कान्होजी व कृष्णाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांच्या पाच अपत्यांतील सदाशिव हे थोरले पुत्र जन्मत:च हुशार व बुद्धिमान होते. शालेय शिक्षण केळूस, साळगांव, कुडाळ व मालवण येथे झाले. शालेय जीवनात भगवद् गीता, महाभारत यांसह संस्कृत व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे वक्तृत्व कलेत पारंगत झाले. त्यांना लाभलेल्या पहाडी आवाजामुळे ते उत्तम वक्ता बनू शकले. टोपीवाला हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला.

आपले इंटरनंतरचे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी महात्मा गांधीजींनी पुकारलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात झोकून दिले. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर लढय़ाचे नेतृत्व महात्मा गांधींच्या हाती आल्याने त्यांच्या विचारांनी प्रभावित होत त्यांनी सभा, सत्याग्रह व मोर्चा यांसारख्या अहिंसात्कम मार्गाने इंग्रजांवर प्रहार करायला सुरुवात केली. परिणामी इंग्रज सरकारने त्यांना १०-१२ वेळा तुरुंगात टाकले; पण ‘कोकणी बाण्याचे’ आप्पासाहेब डगमगले नाहीत. त्यांनी लंडनला जाऊन पत्रकारितेचे दर्जेदार शिक्षण घेत स्वत:ची प्रेस काढून ‘प्रकाश’ हे साप्ताहिक चालवले.

दरम्यान, काही काळ शिक्षकाची नोकरी केली. कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण भाषण करण्यात हातखंडा असल्याने ते उत्तम वक्ता बनले. पुढे काँग्रेसचे मुलुखमैदान तोफ असा त्यांचा लौकिक झाला. शेवटपर्यंत आपल्या मतांशी ठाम राहिले ते केवळ स्वत:च्या आंतरिक बळावरच! माणसे जोडण्याची कला अवगत असल्याने मुंबईतील बहुजन समाजाचा प्रचंड पाठिंबा त्यांना लाभला. खादीची पांढरी शुभ्र टोपी, सदरा व धोतर असा त्यांचा पेहराव असे. कधी गळाबंद लांब कोट व पँट असाही वेष असायचा. १९३१मध्ये कराचीला जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट घेतल्यावर काँग्रेसचे सदस्य म्हणून पक्षकार्याला वाहून घेताना पटेलांना गुरुस्थानी मानले. कालांतराने आपल्या धुरंधर राजनीतीच्या जोरावर नेहरूंच्या खास मर्जीतील एक बडे नेते बनले.

द्विभाषिक राज्यातील मुंबई शहराच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनावर त्यांचा प्रचंड पगडा होता. १९३७ साली प्रथमच ते मुंबई प्रांतिक विधानसभेत निवडून गेले तर १९४२च्या आंदोलनात त्यांना कारावास भोगावा लागला. १९४५मध्ये मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व १९५६पर्यंत अध्यक्षस्थानही भूषवले. १९४९ ते १९५१ अशी सलग तीन वर्षे ते महानगरपालिकेत ‘मुंबईचे महापौर’ म्हणून कार्यरत राहण्याचा त्यांचा विक्रम आजपर्यंत अबाधित आहे. या बहुरंगी नगरीला प्रतिपॅरिस बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. म्हणूनच ‘पाटील बोले आणि महानगरपालिका चाले’ अशी स्थिती असल्यानेच त्यांना ‘मुंबईचे अनभिषिक्त सम्राट’ म्हणून ओळखले जायचे. त्यांचा दांडगा लोकसंग्रह, पक्षनिष्ठा, भांडवलदारांशी असलेले घनिष्ट संबंध यामुळे पक्षासाठी फंडिंग करण्याचे काम ते अत्यंत निष्ठेने करीत. १९५२, १९५७ दक्षिण मुंबईतून व १९६२ गुजरातमधून लोकसभेवर निवडून गेले आणि १९५७ ते १९६७पर्यंत सुमारे दहा वर्षे ते केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न, दळणवळण व रेल्वेमंत्री म्हणून काम करीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

1968 हे वर्ष महाराष्ट्रासाठी, विशेषतः मुंबईसाठी राजकीयदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे आहे. कारण त्यावर्षी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने केवळ मुंबई वा महाराष्ट्राच्याच नाही, तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला एक कलाटणी दिली. यात सर्वाधिक भाजून निघाले ते मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि सदोबा कान्होबा पाटील ऊर्फ स.का. पाटील! त्यांच्यावर तोफा डागण्यात आघाडीवर होते, आचार्य अत्रे आणि त्यांच्या मागोमाग व्यंगचित्रकार बाळ ठाकरे.

`मुंबई हे `कॉस्मोपॉलिटन’ अर्थात, बहुसांस्कृतिक शहर आहे,’ अशी भूमिका घेत स.का. पाटलांनी मुंबई महाराष्ट्राला जोडण्यास विरोध केला होता. त्यावेळी ते मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. त्यांना `मुंबईचे अनभिषिक्त सम्राट’ असं संबोधलं जाई. त्यामुळे तेच पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्रवाद्यांच्या टार्गेटवर आले. अत्र्यांनी तर 1948 पासूनच `नवयुग’मधून पाटलांवर नेम धरला होता. 1950 पासून बाळासाहेबही अत्र्यांच्या जोडीला आले. `नवयुग’चे कव्हर्स `बी.के. ठाकरें’च्या धमाल व्यंगचित्रांनी सजले. या चित्रांमध्ये मुख्य पात्र असे मोरारजी किंवा स. का. पाटील.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अत्र्यांनी पाटलांची केलेली जाहीर हजामत तर प्रसिद्धच आहे. एका सभेत स.का. पाटील म्हणाले, `यावश्चंद्रदिवाकरौ (म्हणजे आकाशात सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत) ही मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही.’ त्यावर अत्र्यांनी `सूर्य आणि चंद्र’नावाचा तिखटजाळ अग्रलेख लिहिला. त्यात ते म्हणाले, `जसे काही चंद्र सूर्य याच्या बापाचे नोकर. जणू सूर्य आणि चंद्र यांची थुंकी झेलणारे आणि जोडे पुसणारे केशव बोरकर आणि रामा हर्डीकर.’

सदोबा कोळसे पाटील, द्विभाषिकवादी सदोबा, अशा विशेषणांनी अत्र्यांनी स. का. पाटलांना या काळात हिणवलं. अत्र्यांचीच री पुढे बाळासाहेबांनी ओढली. `मार्मिक’मधून त्यांनी स.का. पाटलांना यथेच्छ ओरबाडलं. पुढे याच पाटलांनी बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवली. निवडणूक होती 1967 ची. माजी संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी केली. दाक्षिणात्य म्हणून त्यांना विरोध करत शिवसेनेने काँग्रेसचे मराठी उमेदवार स.गो. बर्वे यांना पाठिंबा दिला. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, आचार्य अत्रे तसंच इतर तीन काँग्रेसविरोधी उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेने `पंचमहाभूतांना गाडा’ असं आवाहन करत प्रचार केला. परिणामी मेनन, अत्रे पडले. तसंच सूत्रधार स.का. पाटलांना पाडून जॉर्ज मुंबईचे अनभिषिक्त सम्राट बनले. तेथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आहोटी लागली, तोपर्यंत ते ‘निवडणुकीचे जादूगार’ म्हणून प्रसिद्ध होते. केरळात कम्युनिस्टांचा पराभव करून काँग्रेसची सत्ता आणणा-या या बलाढय़ नेत्याने तोपर्यंत मात्र पराभव कधीच अनुभवला नव्हता.

फिरोजशा मेहता यांच्यानंतर राष्ट्रीय स्थान प्राप्त करणारे दुसरे नेते म्हणजे स. का. पाटील. भारतीय महापौरपदाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणारे ते एकमेव महापौर अशी इतिहासात नोंद आहे. मुंबई नगरीवर त्यांचे विशेष प्रेम तर होतच; परंतु त्यांच्या कार्यकुशलतेवर प्रभावित होऊन न्यूयॉर्कच्या महापौरांनी एकाच आठवडय़ात तीन वेळा त्यांना आमंत्रित केले होते. अशा धूर्त राजकारणी, कार्यक्षम प्रशासक, प्रभावी संघटक आणि उत्तम वक्ता असलेल्या महापौरांचे योगदान लक्षात घेऊन आजच्या मुंबईच्या महापौरांनी अवश्य बोध घ्यावा तरच गेलेली प्रतिष्ठा राखण्यात यश येईल.

वास्तविक पाटलांची मानहानी होण्यास कारण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा. पंडित नेहरूंच्या भाषावार प्रांत रचनेला असलेल्या विरोधाची धार लक्षात घेऊनच, त्यांनी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत ‘मुंबई कदापि महाराष्ट्राला मिळणार नाही’, असे उद्गार काढले. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतल्याने जनप्रक्षोभ त्यांच्या विरोधात गेला व ते महाराष्ट्रद्वेष्टे असा प्रसार झाला. यशवंतराव चव्हाण हेसुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीविरोधात असतानाही पुढे त्यांना मराठी जनतेने माफ केले; परंतु पाटलांना मात्र किंमत मोजावी लागली. दोघेही नेहरूंच्या मर्जीतले तर होतच; परंतु दोघांचे गणित मात्र कधीच जुळले नाही. त्यात मोरारजींचे मत चव्हाणांच्या बाजूने झुकल्याने ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकले.

१९६९मध्ये काँग्रेस फुटली. त्यावेळी ते इंदिराजींच्या विरोधात गेले. परळच्या पोटनिवडणुकीत (१९६९) महाडिक यांना पाठिंबा जाहीर करून त्यांनी सर्वानाच आचंबित केले. पुढे राजकारणापासून अलिप्त राहून ते आपल्या कुटुंबात रमले. २४ जून १९८१ रोजी त्यांचे निधन झाले.