मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांच्या इतिहासात ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन लग्नाच्या बंधनात अडकलेली बऱ्याचदा पहायला मिळते पण प्रेम, समर्पण आणि चिरस्थायी आठवण स्वरुपात अशीच लक्षात राहणारी जोडी म्हणजे लक्ष्मीकांत व रुही बेर्डे. आज दि. ५ एप्रिल #रुही_बेर्डे Ruhi Berde यांचा स्मृतिदिन.
‘प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा’ या अत्यंत लोकप्रिय गाण्यातून प्रेक्षकांसमोर नायिकेच्या रूपात अवतरलेल्या रुही बेर्डे Ruhi Berde या एक अतिशय देखण्या अभिनेत्री होत्या. कमलाकर तोरणे यांनी ‘आराम हराम आहे’ या चित्रपटातून रुही बेर्डे यांना नायिकेची भूमिका करण्याची संधी दिली. रुही बेर्डे यांच्यावर चित्रित झालेले ‘प्रेमवेडी राधा’ हे गीत आणि ‘आराम हराम आहे’ हा चित्रपट, दोन्हीही लोकप्रिय झाले.
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत परिचीत
मराठी चित्रतारका म्हणून रुही सर्वपरिचित आहेत हे जरी खरे असले, तरी मनमोहन देसाई यांचा ‘आ गले लग जा’ हा रुही Ruhi Berde यांचा पहिला हिंदी चित्रपट होय. या चित्रपटात त्यांनी छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकातल्या भूमिकेमुळे रुही खर्या अर्थाने प्रसिद्धीच्या प्रकाशात सर्वप्रथम चमकल्या. अत्यंत सुंदर असल्यामुळे आणि अर्थातच जोडीला असलेल्या अभिनयक्षमतेमुळे रुही यांना या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. हे नाटक फार गाजले आणि अर्थातच रुही यांनीही आपले नाव प्रेक्षकांच्या मनावर पक्क कोरले गेले. ‘डार्लिंग डार्लिंग’ नाटक लिहिणाऱ्या मधुसूदन कालेलकर यांनी राजा ठाकूर यांना रुही यांचे नाव सुचवले आणि राजा ठाकूर यांनी त्यांना ‘जावई विकत घेणे आहे’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली.
रुपेरी पडद्यावर पदार्पण
रुही यांचे ‘डार्लिंग डार्लिंग’ नाटक पाहूनच दादा कोंडके यांनी ‘पांडू हवालदार’ या चित्रपटासाठी त्यांची निवड केली होती. ‘आराम हराम आहे’ या चित्रपटामध्ये साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणीची भूमिका लक्षवेधी करणाऱ्या रुही बेर्डे यांनी ‘पांडू हवालदार’ या चित्रपटामध्ये घरातून पळून जाऊन मुकी असल्याचे नाटक करणाऱ्या तरुणीची भूमिका अतिशय सुंदर वठवली आहे.
‘वेडी माणसं’ या नाटकाच्या दरम्यान त्यांची ओळख लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी झाली. ते या नाटकात वेडसर म्हाताऱ्याचा रोल करत होते. लक्ष्मीकांत यांचा त्यावेळी स्ट्रगल चालू होता आणि त्यांना जास्त कोणी ओळखत नव्हते. आपल्या खेळकर आणि विनोदी स्वभावाने ते सर्वाना आपलेसे करत. नंतर ‘कशात काय आणि लफड्यात पाय’ या नाटकाच्या निमित्ताने रुही आणि लक्ष्मीकांत पुन्हा एकत्र आले आणि कायमचे एकत्र झाले. त्या नाटकापासून त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. रुही त्यावेळीची प्रसिद्ध अभिनेत्री आणि लक्ष्मीकांत हे एक स्ट्रगलिंग ॲक्टर होते पण दोघांनी याची कधीच पर्वा केली नाही. लक्ष्मीकांत हा एक दिवस नक्की स्टार बनेल यावर रुहीचा पक्का विश्वास होता. ‘मैने प्यार किया’ आणि ‘हम आपके है कौन’ या सुपरहिट चित्रपटातील भूमिका मिळण्याचे श्रेय लक्ष्मीकांत यांनी रुहीलाच दिले होते.
लग्नाची बेडी
पुढे १९८३ साली रुही आणि लक्ष्मीकांत लग्नाच्या बेडीत अडकले. रुही लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातील खरी लक्ष्मी ठरली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लक्ष्मीकांत यांच्या ‘धुमधडाका’ या फिल्मचे चित्रीकरण सुरु झाले. त्यांचा संसार १५ वर्षे टिकला. या दरम्यान लक्ष्मीकांत यांच्या आई वडिलांचे निधन झाले त्यावेळी रूहीने आपल्याला खूप मानसिक दिला आणि खूप सावरले होते असे लक्ष्मीकांत यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
‘सतीची पुण्याई’, ‘दोस्त असावा तर असा’, ‘दुनिया करी सलाम’, ‘ओवाळिते भाऊराया’, ‘मामला पोरींचा’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘पांडू हवालदार’, ‘आ गले लग जा’ आदी चित्रपटांमधून प्रेक्षकांना भावलेल्या रुही यांनी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी विवाह केला आणि त्या रुही बेर्डे झाल्या. त्यानंतर त्यांनी ‘एक फूल चार हाफ’, ‘डॉक्टर डॉक्टर’ असे मोजके चित्रपट तर नस्ती आफत ही दूरदर्शनवरील मालिकाही केली.
कर्करोगाशी सामना
‘आ गले लग जा’ या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुही बेर्डे यांची निवड खरे तर हृषीकेश मुखर्जी यांनी ‘गुड्डी’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटासाठीदेखील केली होती; पण दुर्दैवाने रुही बेर्डे यांच्या हातून ही भूमिका निसटली. ‘गुड्डी’ चित्रपटाने रुही बेर्डे यांना जसा चकवा दिला, तसाच त्यांच्या आयुष्यानेही त्यांना चकवा दिला कर्करोगावर उपचार सुरु असतांना अंधेरीला जाण्यासाठी आपल्या गाडीतून निघाल्यावर त्यांना ब्रेन हॅमरेज झाले. उपचारासाठी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आजार बळावत गेला आणि त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले. ५ एप्रिल १९९५ रोजी त्यांचे निधन झाले.
Leave a Reply