माणसाने मनात आणले तर तो अशक्यप्राय गोष्टीही सहज साध्य करु शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे क्रिकेटपटू #नवज्योतसिंह_सिध्दू. navjot singh sidhu आज २०ऑक्टोबर नवज्योतसिंह सिध्दू याचा वाढदिवस.
सुरुवातीला अबोल असणारा हा क्रिकेटपटू, नंतर लोकांना प्रोत्साहित करणारी भाषणे देणारा राजकारणी, त्यानंतर समालोचक आणि आपल्या अनमोल वचन व कवितांनी लोकांचे मनोरंजन करणारा कॉमेडी शोचा जज देखील झाला. क्रिकेटपटू असतांना नवज्योतसिंहला इंग्लीशसुध्दा बोलता येत नव्हते. खेळापेक्षा जिंकल्यानंतर पत्रकारांना भेटायला घाबरुन कॅमेर्यासमोरून पळ काढण्यासाठी तो कारणे शोधायचा हे आजचा हरफनमौला नवज्योतसिंह सिध्दू navjot singh sidhu पाहिल्यानंतर खरं देखील वाटणार नाही. आज त्याच्या शेरोशायरीचे दिवाने देशभरात आहेत.
बालपण
नवज्योतसिंहचा navjot singh sidhu जन्म जाट सिख परिवारात २० ऑक्टोबर १९६३ ला पंजाब राज्यातील पटियाला येथे झाला. प्राथमिक शिक्षण पटियालाच्या यादविंद्र पब्लीक स्कूलमध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण पंजाब युनिर्व्हसिटीच्या मोहिन्द्र कॉलेज चंदीगढ येथे. महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतांना सिध्दू मुंबईला आले आणि मुंबईतील एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. वडील भगवंतसिंह क्रिकेटपटू होते तर पत्नी नवजोतकौर सिध्दू डॉक्टर व पंजाब विधानसभेत आमदारदेखील होत्या. नवज्योतसिंह यांना दोन मुलं असून, मुलगा करण आणि मुलगी राबिया असे आहेत.
क्रिकेटमधील कारकिर्द
नवज्योतसिंह navjot singh sidhu यांनी क्रिकेटमधील आपली कारकिर्द १८ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू म्हणून पंजाब राज्याकडून खेळतांना केली. आंतरराष्ट्रीय कारकिर्द १९८३ मध्ये झाली. १२ नोव्हेंबर १९८३ ला अहमदाबाद येथे झालेल्या वेस्टइंडीजविरोधातील टेस्टमॅचमध्ये पदार्पण करत त्यांनी १९ धावा केल्यात. त्यानंतर मात्र त्यांना संघाबाहेर बसावे लागले. नंतर संधी मिळाली १९९० मध्ये पण त्यावेळीही अपयश हाती आल्याने पुन्हा संघाबाहेर काढण्यात आले. यावेळी त्यांच्या अपयशावर लेखही लिहून आला होता. त्यामुळे सिध्दूच्या वडीलांना फार वाईट वाटले. मात्र यानंतर नवज्योत यांनी क्रिकेटकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली. मोहिंदर अमरनाथ यांनी नवज्योतसिंह सिध्दूला १९८७ च्या विश्वकप मालिकेत भारताकडून खेळण्याची संधी मिळवून दिली. यावेळी मात्र त्यांनी पहिल्याच सामन्यात ७३ धावा केल्यात. विश्वकपमधील ५ सामन्यांपैकी ४ सामन्यात त्यांनी अर्धशतक केले. मात्र दुर्दैव पुन्हा आड आले. सेमीफायनलमध्ये भारत इंग्लडविरोधात हरला. पण या सामन्यांनी नवज्योतसिंह यांची भारतीय संघातील जागा पक्की केली होती.
पहिले वनडे शतक
१९८९ मध्ये पाकिस्तानच्या विरोधात शारजाह येथे खेळतांना त्यांनी आपले पहिले वनडे शतक केले. १९९७ ला वेस्टइंडीज दौर्यात त्यांनी द्विशतक केले. सिध्दू आणि अझरुद्दीन यांच्यात १९९६ दरम्यानच्या इंग्लड दौर्यात मतभेद झाल्यामुळे ते पुन्हा संघाबाहेर फेकले गेले मात्र त्यांनी पुन्हा संघात पुनरागमन केले आणि इंग्लड विरोधात झालेल्या क्वीन्स पार्क ओव्हल येथे द्विशतक केले. २०१ हा त्यांचा सर्वोत्तम स्कोअर होता. श्रीलंकेविरोधात त्यांनी १२४ धावा काढल्या होत्या यात ८ षटकार होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियात त्यांनी पाच डावात ४१५ धावा केल्यात. त्यानंतर १९९९ मध्ये इंग्लडच्याविरोधात १३४ धावा केल्यात. १९९९ हे वर्ष त्यांच्या १६ वर्षाच्या कारकिर्दीतील सर्वात चांगले वर्ष मानले जाते. पण याचवेळी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय नवज्योतसिंह यांनी घेतला.
निवृत्ती
१९९९ ला निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी वाचनावर भर दिला. स्वामी विवेकानंदांच्या साहित्याने त्यांना प्रेरणा दिली आणि २००१ मध्ये भारतीय संघाच्या श्रीलंका दौर्यापासून त्यांनी समालोचक म्हणून आपली नवीन कारकिर्द सुरु केली. या सामन्यांदरम्यान त्यांनी एका वाक्यात सामन्यावर केलेली टिप्पणी खास प्रसिध्द झाली. त्यांनी समालोचक म्हणून इएसपीएन स्टार स्पोर्टस् या वाहिन्यांकरिता काम केले मात्र त्यांच्या एका विवादित टिप्पणीमुळे इएसपीएनने त्यांना समालोचक पदावरून बाजूला केले. त्यानंतर त्यांनी टेनस्पोर्टस्करिता काम सुरु केले. विविध भारतीय वाहिन्यांवर क्रिकेट विश्लेषक म्हणूनसुध्दा ते दिसून आले. २०१२ मध्ये पुन्हा त्यांना इएसपीएन स्टार स्पोर्टस्ने समालोचक म्हणून बोलाविले.
टी.व्ही.वरील कारकिर्द
भारतीय टेलिव्हिजनवरील द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमापासून ते कॉमेडी रिअॅलिटी शो चे परीक्षक म्हणून काम पाहू लागले. या शोमध्ये शेखर सुमन यांच्यासोबत ते परीक्षक होते. त्यानंतर कलर्सवर येणार्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा यातदेखील ते आमंत्रित परीक्षक म्हणून काम करत आहेत. यासोबतच फनबाजी चक दे म्हणून दूरचित्रवाणीचा एक कार्यक्रमही ते सादर करत. त्यांनी अभिनयाची बाजूदेखील आजमावून पाहिली असून, दूरचित्रमालिका करीना करीना मध्ये त्यांनी कामही केला आहे. तसेच बिगबॉस ६ मध्ये ते स्पर्धक म्हणून सहभागी होते. पण हा शो त्यांनी मध्येच सोडून दिला. शो सोडण्याचे कारण राजकीय असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले होते.
दूरचित्रवाहिनीसोबतच चित्रपटामधूनदेखील सिध्दू यांनी आपला जलवा दाखविला आहे. सलमान खान यांच्या मुझसे शादी करोगी या चित्रपटात ते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होते. याव्यतिरिक्त मेरा पिंड या पंजाबी चित्रपटात त्यांनी पंजाबी गायक हरभजन मान, राना रणवीर आणि गुरप्रीत घुग्गी यांच्यासोबत अभिनय केला आहे. या चित्रपटात त्यांनी अनिवासी भारतीय नर्वोजसिंह लाम्बाची भूमिका केली आहे. हा चित्रपट २० सप्टेंबर २००८ ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सिध्दू यांनी एबीसीडी २ या चित्रपटातूनही आपला अभिनय आजमावला आहे.
राजकारणातील कारकिर्द
यासोबतच २००४ मध्ये त्यांची राजकारणातील कारकिर्द सुरु झाली. २००४ च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे अमृतसरमध्ये सिध्दू विजयी झाले. मात्र एका कोर्टकारवाईमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण पुन्हा झालेल्या फेरनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवून जनतेत असलेला आपला विश्वास सार्थ केला. २००९ मधील निवडणुकात अमृतसरमध्ये आपले विरोधक काँग्रेसचे ओमप्रकाश सोनी यांना 6858 मतांनी पराभूत केले. मात्र २०१४ च्या निवडणुकात नवज्योतसिंह यांना भारतीय जनता पार्टीचे अमृतसरकरिता तिकीट न मिळाल्याने ते कष्टी झाले मात्र अमृतसरच्या जनतेला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी अमृतसरमधूनच लढणार हा निर्धार त्यांनी कायम ठेवला. २८ एप्रिल २०१६ ला राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेतली. मात्र सहा महिन्यांनंतर त्यांनी १८ जुलै २०१६ ला त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी परगटसिंह यांच्यासह नवीन पार्टीची स्थापना केली. या पार्टीचे नाव त्यांनी आवाज ए पंजाब ठेवले. ही पार्टी पंजाबविरोधात काम करणार्या लोकांचा विरोध करते. भारतीय जनता पार्टीवरील रोष व्यक्त करण्यासाठी जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. पंजाब विधानसभा निवडणुकीत ते अमृतसर पूर्व भागातून आमदारकीसाठी उभे राहिले आणि प्रचंड बहुमताने विजयी झाले. विरोधकापेक्षा त्यांना ४२,८०९ मते जास्त मिळाली. यानंतर त्यांनी पंजाब राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतली.
आचारसंहितेचे उल्लंघन
२३ एप्रिल २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने मॉडेल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सिध्दूला ७२ तास निवडणूक प्रचारावर बंदी घातली. यापूर्वीही बिहार जिल्ह्यातील कातिहार जिल्ह्यातील मेळाव्यात धर्माच्या आधारावर मत मागण्याबाबत आयोगाने सिध्दूला नोटीस बजावली होती. १८ जुलै २०१९ रोजी, सिध्दूने पंजाबच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची प्रत १० जून २०१९ रोजी राहुल गांधींना दिली.२० जुलै २०१९ रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंह आणि पंजाबचे राज्यपाल व्ही.पी. सिंग बडनोरे यांनी सिध्दूचा राजीनामा स्वीकारला. पुन्हा १८ जुलै २०२१ रोजी, नवजोत सिंह सिध्दू यांना त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांचा तीव्र विरोध असूनही पंजाब काँग्रेस प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले मात्र अवघ्या २ महिन्यांनंतर त्याच वर्षी २८ सप्टेंबर रोजी, नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या मुख्यपदाचा राजीनामा दिला.
Leave a Reply