रुबाबदार व्यक्तिमत्व, बोलके डोळे, मर्दानी डौल यासोबतच धिप्पाड आणि बांधेसूद तसेच रेखीव आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व असणारे नटश्रेष्ठ, आपल्या भूमिकांच्या अप्रतिम सादरीकरणाने नाट्यसृष्टीचे अनभिषिक्त नटसम्राट म्हटले गेलेले नानासाहेब तथा गोपाळ गोविंद फाटक Nanasaheb Phatak यांचा आज दि. ८ एप्रिल स्मृतिदिवस.
ऐन शालेय वयापासून रंगमंचाने भारावून वयाची सत्तरी होईपर्यंत रंगभूमीवर इनॲक्शन असणारे रंगसाधक म्हणून ते प्रसिध्द होते. नानासाहेब फाटकांचा Nanasaheb Phatak २४ जून १८९९ साली कोल्हापूर येथे जन्म झाला गोपाळ गोविंद फाटक हे त्यांचे मूळ नाव. मात्र, या नावापेक्षा त्यांचे नानासाहेब फाटक हेच नाव लोकांच्या तोंडी जास्त झाले.
रक्षाबंधन या नाटकातून त्यांनी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला. रक्षाबंधनमधली त्यांची गिरीधराची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर त्यांना प्रमुख नायक आणि खलनायक म्हणून अनेक भूमिका मिळाल्या. नानासाहेब फाटक हे वास्तविक रंगमंचावरचे कलाकार. पण ‘थोरातांची कमळा’ चित्रपटातील त्यांचा शिवाजी न भूतो न भविष्यति ठरला. त्यांनी या भूमिकेला शंभरटक्के न्याय दिला की, शिवाजीराजे म्हणजे नानासाहेब फाटक यांच्यासारखेच असे समिकरणच रूढ झाले होते. पण ते चित्रपटाच्या क्षेत्रात फारसे रमले नाहीत.
पुण्यप्रभाव, ‘श्री’,‘सोन्याचा कळस’,‘राक्षसी महत्वाकांक्षा’ या नाटकांतील देखील नानासाहेबांच्या भूमिका विशेष ठरल्या. ‘श्री’ या नाटकामध्ये त्यांनी कुसुमाकराची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली.‘सोन्याचा कळस’ या नाटकात त्यांनी केलेली बाबा शिवगणची भूमिकाही नाट्यप्रेमींना आवडली होती. ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ त्यांनी केलेली विक्रांतची भूमिका अजरामर ठरली होती. आपल्या या अप्रतिम भूमिकांमुळेच त्यांच्या काळात नानासाहेब नाट्यसृष्टीचे अनशिषिक्त नटसम्राट झाले होते. Nanasaheb Phatak
मराठी रंगभूमीवर फार थोड्या नटांना खलनायकांच्या भूमिका करून यश, कीर्ती आणि संपत्ती यांचा लाभ झाला. अशा थोड्या नटांत नानासाहेबांची Nanasaheb Phatak गणना प्रामुख्याने होते. जाहिरातीत बालगंधर्व आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांची नावे वाचून रसिक गर्दी करीत, त्याचप्रकारे ‘नटवर्य नानासाहेब फाटक’ हे नाव वाचून रसिक ते नाटक हाउसफुल्ल करीत. जाहिरातीत नटवर्य नानासाहेब फाटक हे नाव वाचले की, प्रेक्षक नाट्यगृहात तोबा गर्दी करीत असत. धिप्पाड आणि बांधेसूद तसेच रेखीव आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख. त्यांनी रंगमंचावर पाऊल टाकले की, सारा रंगमंच भरून गेला असे वाटत असे. देहयष्टी दृष्ट लागण्यासारखी. नटाला जो ‘डोळा’ लागतो तो नानासाहेबांपाशी होता. आवाज तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा. हालचाली कमालीच्या ग्रेसफुल. आवाज पल्लेदार असल्याने कितीही मोठे वाक्य ते अगदी विनासायास, सहजगत्या आणि लीलया फेकीत. त्यांनी केलेल्या सर्व भूमिका ही कुणाचीही नक्कल न करता स्वत:च्या पद्धतीने, विचारपूर्वक केल्या होत्या.
विद्यार्थीदशेतच नानासाहेबांची काकासाहेब खाडिलकरांच्या ‘सत्त्वपरीक्षा’ या नाटकातली विश्वामित्राची भूमिका खूप गाजली. पण, त्यांना खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता लाभली ती ‘रक्षाबंधन’ या नाटकातील ‘गिरीधर’च्या भूमिकेने. या भूमिकेने त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. हा सुशिक्षित आणि देखणा नट आपल्याकडे असावा असे गुणग्राहक केशवराव भोसल्यांना वाटले आणि त्यांनी नानासाहेबांना ललितकलेत बोलावले. या नाटक मंडळीत नानासाहेबांचा प्रवेश झाला आणि त्यांच्यातील नाट्यगुणांना वाव मिळेल अशा विविधांगी भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या.
कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, काल्पनिक, पौराणिक असे विविधांग विषय असलेली नाटकं आणि त्यांच्या भूमिकांमधली विविधता ही विलक्षणच! गणेश नाटक मंडळीच्या टिपणीसांच्या ‘मत्स्यगंधा’तील शंतनु; शेट्ये यांच्या ‘लोकशासन’ मधला अमात्य; वि. गो. शेट्ये यांच्या ‘रक्षाबंधन’ नाटकातला लिंगपिसाट गिरधर; ‘ललितकलादर्शना’च्या ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’तला ध्येयवादी विक्रांत, मामा वरेरकर यांच्या ‘संन्यासाचा संसार’ यातला संयमी शंकराचार्य, ‘सत्तेचे गुलाम’ यातला खलनायकही केरोपंत वकील, ‘पुण्यप्रभाव’ नाटकातला वृंदावन – ही नाटके म्हणजे भूमिकांचे वैभवच! ‘शहा-शिवाजी’ या ऐतिहासिक नाटकातला त्यांचा शहाजी, पौराणिक ‘कृष्णार्जून युद्ध’ यातला गंधर्व, कौटुंबिक ‘हाच मुलाचा बाप’ यातला वसंता, ‘सोन्याचा कळस’ या नाटकात कामगार-बाबा, ‘श्री’ नाटकात भावाची असणारी कुसूमाकर ही भूमिका मेनरोल वाढणारी, अत्रे यांच्या ‘जग काय म्हणेल’ यातला व्यसनी दिवाकर, ‘पाणीग्रहण’मधला विनोदी ढंगाचा मसालेवाला, लग्नाची बेडीतला डॉ. कांचन, भावबंधन – धन:श्याम, भाऊबंदकी – राघोबादादा, राजसंन्यास – पहेलवान देहू, एकच प्याला – सुधाकर, मृच्छकटिक – मैत्रेय, वैजयंती – रत्नाकर, बेबंदशाही – संभाजीराजे, झुंजारराव – झुंजारराव, पुण्यप्रभाव – वृंदावन, राक्षसी महत्वाकांक्षी – विक्रांत, हॅम्लेट – हॅम्लेट, माते तुला काय हवय – युधिष्ठिर अशी अजून मोठी यादी त्यांच्या नावावर आहे. यातील ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकातील वीरश्रीयुक्त विक्रांतची भूमिका, ‘संन्याशाचा संसार’मधील शंकराचार्यांची भूमिका,‘सत्तेचे गुलाम’मधील केरोपंत वकिलाची भूमिका,‘शहाशिवाजी’ नाटकात शहाजी,‘कृष्णार्जुन युद्धात’ चित्ररथ गंधर्व,‘हाच मुलाचा बाप’मध्ये वसंत,‘श्री’ या नाटकातील कुसुमाकर, ‘सोन्याचा कळस’ नाटकातील कामगार बाबा शिगवण इ. भूमिका तर खूपच गाजल्या.
गणपतराव जोशी यांच्यानंतर ‘हॅम्लेट’ची भूमिका त्यांनी अनेकवर्षे केली. या भूमिकेत नानासाहेबांनी Nanasaheb Phatak घेतलेली झेप हे अगदी रंगमंचाबाहेर प्रेक्षकांपर्यंत पोहचली. पण ते भूमिकेतून बाहेर पडले नाहीत. ‘हॅम्लेट’चे किमान हजारावर त्यांनी प्रयोग केले होते. तोच प्रकार ऑथेल्लो, मॅकबेथ या भूमिकेतही दिसला. ‘अक्षरशः भूमिकेत झोकून देणे म्हणजे काय हे त्याकाळच्या रसिकांनी अनुभवलं. त्यांचा ‘हॅम्लेट’ शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होता. हॅम्लेट, पुण्यप्रभाव आणि एकच प्याला – या नाटकांचे प्रयोग शेवटच्या कालखंडात त्यांनी केले. महाराष्ट्रभर दौरेही केले.
नाट्यसृष्टीतले अनेक सन्मान त्यांच्याकडे चालत आले खरे, पण त्यासाठी त्यांनी कधीही मोर्चेबांधणी केली नाही किंवा स्वतःचा म्हणून कंपूही उभा केला नाही. १९५८ साली हैद्राबाद येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांचे अध्यक्षीय भाषण आणि त्यातले वैचारिक मंथन हे आजही दिशादर्शक आहे. तत्कालीन परिस्थितीचा वेध घेऊन नाट्यसृष्टीला नवे वळण देण्याचा प्रयत्न त्यात आहे.
नाट्यवाङमयावर भाष्य करणारा विचारवंत म्हणूनही त्यांचे लेखन गाजले. ‘मुखवट्याचे जग’ हे पुस्तक त्याची साक्ष देते. देशभरातल्या ‘सर्वोत्कृष्ट नटा’चा सन्मानही त्यांना मिळाला. दिल्लीत केंद्र सरकारतर्फे त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. दिल्लीला झालेल्या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठी १९५४ साली त्यांची सुधाकराची भूमिका असलेले नाटक – ‘एकच प्याला’ पाठविण्यात आले आणि त्यांचा सुधाकर देशभरातल्या रंगकर्मी व रसिकांपर्यंत पोहचला. एका कालखंडातल्या नाट्यसृष्टीतील मंतरलेल्या दिवसांचे ते साक्षीदार होते. त्यांच्याइतका भव्य, रुबाबदार, देखणा आणि ग्रेसफुल नट आजतागायत दुसरा कुणी झाला नाही, असे म्हटले जाते ते उगीच नाही. नानासाहेब फाटक यांचे ८ एप्रिल १९७४ रोजी निधन झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
Leave a Reply