madanlal-dhingra

Madanlal Dhingra – युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारकांनी केलेले कार्य भारताच्या भूमीवरच केले होते परंतु प्रथमच शत्रूच्या भूमीवर त्यांच्याच उच्चाधिकार्‍याला गोळ्या घालून मारण्याचा मान मिळविला तो युवाक्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी. १ जुलै १९०९:- क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा Madanlal Dhingra यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायलीचा वध केला.

कर्झन वायली याचा वध करण्यापूर्वी मदनलाल धिंग्रा यांनी लॉर्ड कर्झन याचाही वध करण्याचा प्रयत्न केला होता. कर्झन हा अतिशय उर्मट व्हॉईसराय होता. तो दोनदा मदनलाल यांच्या हल्ल्यातून वाचला. मदनलाल यांनी बंगालचा माजी गव्हर्नर ब्रॅमफील्ड फुल्लर याचाही काटा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण तो उपस्थित असलेल्या बैठकीला मदनलाल उशिरा पोहोचले व सगळा डावच फसला. त्यानंतर मदनलाल धिंग्रा Madanlal Dhingra यांनी कर्झन वायली याला ठार मारण्याचे ठरविले.

२९ जून १९०९ रोजी त्यांनी कर्झन वायलीच्या वधाचा कट आखला. सावरकरांची भेट घेतली त्यावेळी बिपीनचंद्र पाल उपस्थित होते. वायलीच्या वधानंतर काय सांगायचे हे सावरकरांनी मदनलाल यांना सांगितले होते. निरंजन पाल यांनी मदनलाल यांना सावरकरांनी वायलीच्या खुनानंतर करायच्या निवेदनाची एक प्रत दिली. सावरकरांनी त्याचवेळी मदनलाल यांच्या हाती बेल्जियन बनावटीचे ब्राऊनिंग पिस्तूल ठेवले व नंतर मदनलाल यांनी प्रेमाने त्यांचा निरोप घेतला. पण निघताना ते भावविवश झाले. सावरकर मात्र कणखरपणे म्हणाले, जर तू या मोहिमेत अपयशी ठरलास तर मला परत तोंड दाखवायला येऊ नकोस. मदनलाल यांनी तसे घडणार नाही असा शब्द सावरकरांना दिला. ३० जूनला मदनलाल परत सावरकरांना भेटायला गेले होते पण त्यावेळी त्यांची भेट होऊ शकली नाही.

कोरेगावकर नावाचे सहकारी त्यांच्याबरोबर इंपिरियल इन्स्टिटय़ूटमधील त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार होते. मदनलाल यांनी निघण्यापूर्वी दुपारचे भोजन केले व चहा घेतला. दुपारी दोन वाजता ते घरातून निघाले, त्यांनी कातडी मूठ असलेले नवे कोरे खंजीर खिशात ठेवले होते, नंतर ते फनलँडला गेले व तेथे अठरा फुटांवरून गोळ्या मारून सराव केला. त्यातील अकरा गोळ्यांनी लक्ष्यभेद केला. नंतर रिव्हॉल्वर स्वच्छ करून घेतली. सायंकाळी सात वाजता त्यांनी लाऊंज सूट परिधान केला व निळ्या रंगाची पंजाबी तुर्बान घातली. जवळचे कोल्ट रिव्हॉल्वर गोळ्या भरून सज्ज केले व उजव्या खिशात ठेवले. दुसरे एक रिव्हॉल्वर वेगळ्या खिशात ठेवले.त्यावेळी त्यांनी १०-१२ शिलिंग इतकी रक्कमही बरोबर घेतली होती.

तो दिवस होता १ जुलै १९०९ पण त्यांचे दुर्दैव म्हणजे समारंभासाठी आवश्यक असलेला पास आणायला ते विसरले. त्या संस्थेचा सदस्य असल्याने त्यांना व्हिजिटर्स बुकमध्ये सही करून आत जाऊ देण्यात आले. कोरेगावकरही पिस्तूल घेऊन आले होते. ती सभा संपली व कर्झन वायली निघण्याच्या तयारीत होता. कोरेगावकर धिंग्रांना म्हणाले, अरे जावो ना. क्या करते हो. मग लगेच मदनलाल धिंग्रा वायलीच्या दिशेने गेले. त्याच्याशी बोलण्याचे सोंग केले. वायली व धिंग्रा काचेचे प्रवेशद्वार लोटून बाहेर निघाले. नंतर मदनलाल यांनी आवाज काहीसा बारीक करून गोपनीय बोलण्याचे नाटक केले. वायलीने कान मदनलाल यांच्या जवळ आणला तेवढय़ात मदनलालनी डाव साधला व उजव्या खिशातून कोल्ट पिस्तूल काढून अगदी जवळून दोन गोळ्या वायलीला मारल्या. तेव्हा रात्रीचे ११ वाजून २० मिनिटे झालेली होती. कर्झन वायली कोसळल्यानंतर मदनलाल यांनी आणखी दोन गोळ्या त्याच्यावर झाडल्या.तेथून पळून जाण्याची त्याने कोणतीही धडपड केली नाही. एवढा भीषण वध करूनही विजयाचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते.

भारताच्या स्वातंत्र्याचा एक विरोधक त्याने संपवला होता. पोलिसांनी मदनलालला पकडले. त्या झटापटीतही त्यांनी एकाच्या बरगडय़ा मोडल्या. डॉक्टरांनी लगेच मदनलाल यांची नाडी तपासली ती व्यवस्थित होती, ते घाबरलेले नव्हते. तुमच्या अटकेची माहिती तुमच्या मित्रांना द्यायची आहे काय, असे विचारले असता त्याची काही गरज नाही. वृत्तपत्रातून त्यांना उद्या काय ते समजेलच असे उत्तर त्यांनी दिले. एवढेच काय, तर त्यांना अटक करून ठाण्यात नेल्यावरही ते पाचच मिनिटांत घोरू लागले होते. १७ ऑगस्ट १९०९, या दिवशी मदनलाल धिंग्रा यांना पेंटोव्हिले तुरूंगात फासावर चढवण्यात आले. हातात गीता आणि ओठात रामकृष्णाचे नाव घेऊन देशप्रेमाने भरलेला तो देशभक्त हसत हसत फाशी गेला.

ज्या आपल्या निवेदनानंतर धिंग्राजी जगभरच्या क्रांतिकारकांचे प्रात:स्मरणीय प्रेरणास्थान झाले, त्यात ते म्हणतात ”एक हिंदू म्हणून माझी भावना अशी आहे की, माझ्या देशाचा अपमान हा परमेश्वराचाच अपमान होय. उपेक्षा आणि देशवासीयांना होणारं विस्मरण हा क्रांतिकारकांना मिळालेला शाप. असाच शाप मिळालेले अनेक थोर क्रांतिकारक होऊन गेले. त्यांपैकी एक नाव मदनलाल धिंग्रा. तो शाप अत्यल्प प्रमाणात का होईना, ते विस्मरण किंचित प्रमाणात का होईना दूर करण्यासाठीचा हा प्रयत्न.