JACKI-CHAN

कुंग फू स्टार अभिनेता जॅकी चॅन jackiechan

आज ७ एप्रिल आंतरराष्ट्रीय चिनी चित्रपट अभिनेता जॅकी चॅन jackiechan यांचा वाढदिवस.
हाँगकाँगचे कुंग फु सिनेमे जगभरात नेले ते ब्रूस लीने. त्याचे सिनेमे पाहून कुंग फू नावाचा अचाट प्रकार जगभरातली लहान मुलं आणि तरुणांनी डोक्यावर घेतला. ‘बिग बॉस (१९७१)’, ‘द फिस्ट ऑफ फ्युरी (१९७२)’, ‘इंटर द ड्रॅगन (१९७३)’ सारख्या सिनेमांच्या जोरावर पहिल्यांदाच एक चीनी कलाकार हॉलीवूड मध्ये लोकप्रिय झाला. लोकप्रियतेची शिडी झपाझप चढत असतानाच वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी ब्रूस लीचा गुढ मृत्यू झाला आणि तो एका दंतकथाच बनला. ९० च्या दशकात त्याच्या कुंग फु कौशल्याचे आणि जीवावर उदार होऊन हाणामारी करायचे खरे-खोटे किस्से मोठ्या चवीने आम्हा मुलांमध्ये फिरायचे.बिना शर्टच्या ब्रूस लीच्या छातीवर चार घाव आहेत आणि तो आक्रमक कुंग फु च्या पवित्र्यात उभा आहे हे दृश्य आज जगभरातल्या सिनेचाहत्यांच्या मनात कोरलं गेलं आहे.

ब्रूस ली प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सतरा वर्षीय जॅकी चॅन jackiechan हाँगकाँगच्या चित्रपटांमध्ये स्टंटमनची आणि एक्स्ट्राची छोटी मोठी कामं करत होता. ७ एप्रिल १९५४ साली हाँगकाँग इथे जन्मलेले चॅन यांचे वडील एक स्वयंपाकी होते. त्यांनी लहानपणीच चॅन यांना पेकिंग ऑपरा स्कूलमध्ये भरती केलं. कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कुंग फु, कसरती, नृत्य आणि संगीत शिकवलं जायचं. इथं शिकलेल्या कौशल्यांच्या जोरावर चॅनने हॉंगकॉंग चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावलं. काही दिग्दर्शकांनी त्याच्या स्टंटबाजीने प्रभावित होत त्याला ब्रूस ली पठडीतले चित्रपट दिले. परंतु ते यशस्वी ठरले नाहीत.

ब्रूस लीच्या सावलीतून बाहेर पडत वेगळी वाट चोखाळण्यातचं आपलं भलं असल्याचं ओळखून तो अॅक्शन-कॉमेडी सिनेमांकडे वळला. ‘स्नेक इन द इगल शॅडो, १९७८’, ‘ड्रंकन मास्टर, १९७८’ या सिनेमात त्याची ही कॉमेडी मिश्रित कुंग फु ची शैली प्रेक्षकांसमोर प्रथम आली आणि त्याला बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळालं. गावातला टिवल्याबावल्या करणारा बावळट मुलगा आपल्यावरील अन्यायाचा बदला घेण्यासाठी ड्रंकन स्टाईल, मंकी स्टाईलसारख्या विनोदी कुंग फु शैलींचा वापर करतो अशी साधारण या सिनेमांची मांडणी होती. परंतु आपल्या कॉमेडी कुंग फुचं यश पाहिल्यावर चॅन jackiechan याने आधुनिक शहरी पार्श्वभूमी असलेले सिनेमे बनवायला सुरुवात केली. यात हॉलीवूड सिनेमांच्या संकल्पना आणल्या. कुंग फु ला पारंपरिक शैलींच्या नियमातून मुक्त केलं. उदा. ‘पोलीस स्टोरी’ (१९८४), ‘प्रोजेक्ट ए’ (१९८३), ‘आर्मर ऑफ गॉड’ (१९८६). जुन्या हॉलीवूड मूकपटांमध्ये बस्टर कीटनसारखे कलाकार स्टंटचा वापर विनोदासाठी करत असत.

चॅनच्या सिनेमांचं एक सौंदर्यस्थळ म्हणजे त्यातले त्याने आणि त्याच्या स्टंटमनने स्वतः केलेले स्टंट. एखादया समूह नृत्याप्रमाणे ते स्टंट बसवलेले असतात. हिंसा हा त्यांचा केंद्रबिंदू नसून एखादया जिम्नॅस्टसारखी चपळता आणि कौशल्य हे त्याचा आकर्षणबिंदू असतो. एक मनुष्यप्राणी जीवावर उदार होऊन अशा अफलातून कसरती करू शकतो याचा प्रेक्षकांना अचंबा वाटतो. चॅनच्या प्रत्येक सिनेमाच्या अखेर नामावली दाखवताना त्यातील स्टंटचं चित्रीकरण करतानाची दृश्य दाखवली जात. यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्या स्टंटमागची मेहनत, क्लिष्टता, धोका बिंबवला जातो. आज कम्पुटर ग्राफिक्सच्या युगात चित्रपटातून असे स्टंट दुर्मीळच झाले आहेत. जुन्या अॅक्शन चित्रपटातील स्टंटची मजा गायब झाली आहे. चॅनचं पात्रं कुंग फुमध्ये तरबेज असलं, धाडसी असलं तरी ते ब्रूस लीसारखं पारंपरिक योद्धा म्हणून पुढे येत नाही. तर ते एक सामान्य व्यक्ती म्हणूनच पुढे येतं. ब्रूस लीवर त्याच्या प्रतिस्पर्ध्याने धारधार शस्त्राने मार केला तर तो चेकाळून शर्ट फाडतो आणि प्रतिस्पर्ध्यावर अधिक त्वेषानं तुटून पडतो. याउलट चॅनच्या तोंडावर बुक्का बसला तर तो आधी ‘आ ऊ’ करत तोंड चोळत बसतो आणि मगच प्रतिहल्ला करतो. एकामागून एक संकटांना तोंड देणारं चॅनचं पात्रं एक भेद्य लढवय्या म्हणून प्रेक्षकांसमोर येतं. यामुळेच तो प्रेक्षकांना जास्त जवळचा वाटतो.

गेली चार दशकं हिंसेचं कुठंही उदात्तीकरण न करता निखळ कौटुंबिक करमणूक करणारे अॅक्शनपट बनवणाऱ्या जॅकी चॅनचं jackiechan अमेरिकेच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स या ऑस्कर पुरस्कार देणाऱ्या संस्थेनं मानद ऑस्कर पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अकॅडमीने मानद ऑस्कर पुरस्कारांचा वापर जगभरातल्या चित्रपटसृष्टीला भरघोस योगदान देणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी केला आहे. १९९१ साली सत्यजित रे यांना हा बहुमान मिळाला होता.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *