मुंबई लगत असलेल्या रायगड जिल्हयात अलिबागच्या निसर्गरम्य भुमीत कुलाबा किल्ला Kulaba Fort उभा आहे. . एकीकडे दऱ्या-खोऱ्यांचा,डोंगरांचा वळणावळणाचा,घाटांचा भाग तर दुसरीकडे २४० कि.मी.लांबीचा अथांग अरबी समुद्र अशी भौगोलिक रचना. तीस ते पस्तीस कि.मी.लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. कुलाब्याच्या इतिहासात डोकावले तर हा जलदुर्ग मराठेकालीन बांधकामाची साक्ष देत आजही दिमाखात उभा असलेला दिसून येतो. कुलाबा किल्ला खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आला तो सरखेल कान्होजी आंग्रेच्या काळात. नजर ससाण्याची, झेप गरुडाची व पकड मगरीची अशा यथार्थ शब्दांनी गौरविलेल्या कान्होजीं आंग्रेनी आपले प्रमुख ठाणे म्हणून कुलाबा किल्ल्याची निवड केली. प्रथम शिवशाही नंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले.
स्वराज्याची सागरी राजधानी
इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला. अलिबाग समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दुर्गजोडी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंत जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्याहुन १ कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्याहुन ओहोटी वेळेस किल्ल्यात चालत जाता येते तर भरतीच्या वेळी बोटीतून जाता येते. दक्षिणोत्तर पसरलेला हा लांबट चौकोनी आकाराचा हा जलदुर्ग ज्या खडकावर उभा आहे त्याची दक्षिणोत्तर लांबी ९०० फूट असून पूर्व पश्चिम रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज ३३५ वर्षे उलटली तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता खंबीरपणे उभा आहे.
इतिहास
कुलाबा किल्लाच्या बांधकाम कालखंडाविषयी इतिहासकारात एकवाक्यता नाही. ग्रॅण्ट डफ या इतिहासकाराच्या मराठयांची बखर या ग्रंथातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६६२ च्या सुमारास नव्याने बांधून मजबूत केला तर रियासतकारांच्या मते या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या काळात सुरू होऊन त्यांच्या मृत्यूआधी काही दिवस पूर्ण झाले अशी माहिती मिळते म्हणजेच छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा शेवटचा जलदुर्ग! अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटर आत असलेल्या खडकावर १२ मार्च १६८० ते जुन १६८१पर्यंत भिवजी गुजर यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याची येथे चौकी होती. ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र ह्या उक्तीप्रमाणे शिवाजी महाराजांनी मोक्याच्या बेटांवर नवीन किल्ले बांधले व जुने अधिक बळकट केले. २१ मार्च १६८० रोजी त्यांनी इथल्या नवघर नावाच्या खडकाळ बेटावर हा जलदुर्ग बांधण्यास सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. महाराजांनंतर मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला खऱ्या अर्थाने प्रसिध्दीस आला. सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरून त्यांनी आपले आरमार कुलाबा किल्ल्यावर हलवले आणि हा किल्ला आरमारी डावपेचांचा केंद्र बनला. जंजिऱ्याच्या सिद्दीने अनेक वेळा कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला पण प्रत्येक वेळी त्याला पराभव झाला. या किल्ल्याजवळ समुद्र खडकाळ व उथळ असून बंदरांत येण्याचा मार्ग अरुंद व सांपडण्यास कठिण असल्यामुळे आंग्र्यांचे आरमार या बंदरांत सुरक्षित असे. डच,इंग्रज, पोर्तुगीज आणि मुरुडचा सिद्दी या परकीय संकटांना आंग्य्रांच्या या अभेद्य भिंतीने रोखून धरले. कुलाबकर आंग्य्रांच्या पाच पिढय़ा इथे नांदल्या. त्यामुळे कुलाब्याच्या साऱ्या इतिहासावर आंग्रे घराण्याची छाप पडलेली आहे. ४ जुलै १७२९रोजी सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यात निधन झाले. त्यांची समाधी आजही आपल्याला अलिबाग मधील ठुकराली नाका येथे बघायला मिळते.
संरक्षण सज्जता
कुलाब्याचा धाकटा भाऊ शोभावा असा सर्जेकोट नावाचा आणखी एक छोटेखानी किल्ला कुलाबा किल्ल्याच्या पुढयात उभा आहे. किनाऱ्यावरून हल्ला झाला तर येथुनच त्याच्याशी पहिला मुकाबला होत असे. या दोन कोटांच्या मध्येच दगडांच्या अनेक राशी ओतून एक सेतू किंवा छोटीशी तटवजा भिंत तयार केलेली आहे. सर्जेकोटामध्ये आजमितीस एका विहीरीशिवाय अन्य कोणतेही अवशेष नाहीत. कुलाबा किल्ल्याला पुढील बाजुने व मागील समुद्राच्या बाजुने अशी दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात तरीही मुख्य प्रवेशव्दारापासून सुमारे १५ फूटापर्यंत भरतीचे पाणी येत नाही.
शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर खाचा मारून रचलेले आहेत. दोन दगडांतील फटीत चुना भरलेला नसल्याने समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेचा जोर कमी होतो.
किल्ला परिसर
किनाऱ्याहुन येताना किल्ल्याचा मुख्य दरवाजा सरळ समोर दिसत नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार किनाऱ्याच्या बाजुस पण ईशान्येकडे वळवलेले आहे. थोडे उजव्या हाताला वळल्यावर दोन मोठया बुरुजांच्या मध्ये त्याचे दर्शन होते. दोन बुरुजांच्या मधोमधील महाद्वारावर नगारखाना असुन या दरवाज्यावर मोर, हत्ती, हरिण, शरभ आदी पशुपक्ष्यांची शिल्पे कोरलेली आहेत. याशिवाय उमलत्या कमळांची अनेक फुले कोरलेली असुन कमानीच्या मध्यभागी गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. आत शिरताच वळण घेत पुढे आणखी एक दरवाजा आहे. हा किल्ल्याचा दरवाज्यातील रणमंडळाचा भाग आहे.
किल्ल्याचा दुसरा दरवाजा केवळ अवशेष रुपात शिल्लक असुन या दरवाजातून आंत जाताना कोनाड्यातील देवतांचे दर्शन होते. येथे किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व विभागाचे पंधरा रुपयाचे तिकीट घ्यावे लागते. किल्ल्याला एकुण १७ बुरुज असुन चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे त्यांची रचना आहे. या बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी,फत्तेबुरुज, दर्याबुरुज अशी नावे आहेत. किल्ल्याच्या उत्तरेस असणाऱ्या सर्जेकोटाचाही काही वेळेस कुलाब्याचा १८ वा बुरुज म्हणुन उल्लेख आहे. गडात शिरल्यावर उत्तर दिशेला तटातच तळघरात काढलेले धान्याचे कोठार दिसते. हे कोठार पाहिल्यावर आपल्याला पन्हाळा व शिवनेरी येथील अंबरखान्याची आठवण येते. चार घुमटांचे छत आणि त्याला गोल खांबांचा आधार अशी याची रचना आहे.कधीकाळी इथे धान्याची पोती भरून ठेवली जात असतील पण आता मात्र पुरातत्व विभागाने येथे चुन्याची पोती भरून ठेवली आहेत त्यामुळे आत जाता येत नाही. बुरुजावरील ढालकाठीला आधार म्हणुन बुरुजावरील ढालकाठी वरील बुरुजापासुन या तळघरात आली आहे व येथेच तिला आधारासाठी ओटा बांधलेला आहे. या ओट्यात पुरातन ढालकाठीची काठी आजही दिसून येते.
गडात शिरल्यावर समोर गुलवती देवीची घुमटी तर तटाकडे गडदेवता भवानीदेवी मंदिर दिसते. गडदेवता भवानी देवीच्या मंदिरात गणेश आणि वेताळ यांच्याही मुर्ती आहेत. देवळासमोरच साडेसात मीटर उंचीचा दीपस्तंभ आहे. असे म्हणतात कि आंग्रे मोहिमेवर निघण्यापूर्वी भवानी देवीचा कौल घेत असत.आंग्रेच्या कौल मिळालेल्या सर्व मोहिमा यशस्वी झाल्याचा इतिहास असल्यामुळे आजही कोळीबांधव महत्वाच्या काम सुरु करण्यापुर्वी भवानी देवीचा कौल घेतात. या शक्तिदेवतांचे दर्शन घ्यायचे आणि दुर्गदर्शनाला सुरुवात करायची. तटाला लागुनच दहाबारा घरांची वस्ती आहे. या तटाच्या वर बुरूजावर दोन मध्यम आकाराच्या तोफा मातीत पडल्या आहेत. येथुन खाली उतरून आल्यावाटेने पुढे निघाल्यावर डाव्या बाजूला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात.
डावीकडची वाट हाजी हजरत कमालउद्दीन शहा ह्यांच्या दर्ग्याकडे जाते तर पुढे जाणारी पायवाट दोन्ही बाजूला जुने अवशेष व वाढलेल्या गवतामधून किल्ल्याच्या दुस-या दरवाज्यापर्यंत जाते. देवीच्या मंदिरांपासुन सरळ निघालेल्या या वाटेत एक सिध्दीविनायक मंदिर आहे. छोटयाशा दगडी तटाच्या आत हे मंदिर असुन मंदिराच्या आवारात उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरा समोर एक अतिशय बारीक नक्षीकाम केलेले तुळशी वृंदावन आहे. साधारण वीस मीटर लांब, सहा मीटर रुंद व पंधरा मीटर उंच अशा ह्या मंदिराचे निर्माण राघोजी आंग्रेने सन १७५९ मध्ये केले. मुख्य मंदिर हेमाडपंती असुन मंदिराच्या दारातच दगडातच बांधलेले भग्न झालेले कारंजे आहे. मुख्य मंदिराला अष्टकोनी सभागृह आणि त्यामागे अष्टकोनी आकारातच गर्भगृह आहे. दोन्ही दालनांना वेलबुट्टीची नक्षी असलेली गवाक्षे आणि घुमटाकृती छत आहे. मंदिरातील गाभाऱ्याचे प्रवेशद्वार खुपच सजवलेले असुन उंबरठयावर कीर्तिमुख, दोन्ही बाजुस द्वारपाल, व्याघ्रमुखे, सभोवतीच्या चौकटीवर पाना-फुलांच्या माळा आणि वरच्या द्वारपट्टीवर अन्य देवतांबरोबर मधोमध गणेशही विराजमान झालेला आहे. या दरवाजाच्या डाव्या बाजूस कार्तिकस्वामी, तर उजव्या बाजूस गणेशमूर्तीची स्थापना केलेली आहे. गर्भगृहात संगमरवरातील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची दीडफुट उंच मुर्तीची स्थापना केलेली आहे. या मुर्तीशेजारी अक्षमाला, नाग, डमरू आदी आयुधे घेतलेला शिव, कमळे धारण केलेला चतुर्भुज सूर्य, तर पद्म, गदा, चक्र आणि शंख घेतलेला विष्णु तसेच परळ, त्रिशूल, चाप, तलवार, नाग आणि पेला हाती घेतलेली अष्टभुजा महिषासुरमर्दिनी या चार देवतांच्या मूर्तीचीही स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे मंदिर गणेश पंचायतन बनले आहे. मंदीरांचे प्रांगणाबाहेर काळ्या दगडातील जुनी बांधकामातील नक्षीदार २४ फुट उंचीची दीपमाळ आहे. या मंदिरासमोरच एक चिरेबंदी बांधणीची गोडया पाण्याची देखणी पुष्कर्णी आहे. ३४.५ मीटर लांब आणि ३१.५ मीटर रुंद अशा विस्तीर्ण आकारातील हा तलाव राघोजी आंग्य्रांनीच बांधला. चारही बाजूंनी पायऱ्यांची रचना असलेल्या या पुष्करणीच्या एका बाजूला सात कोनाडे असुन या सात कोनाड्यात साती आसरांचे(सप्तमातृका) शिल्प बसविण्यात आलेले आहे. पुष्करणी नावातले सारे सौंदर्य इथे आहे फक्त पाणी मात्र शेवाळाने हिरवेगार झाले आहे.
पुष्कर्णीच्या दक्षिणेकडील भिंतीला लागुनच बापदेवाची घुमटी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटाबाहेर स्वच्छ पाण्याची विहीर असुन या विहिरीला आत उतरायला पायऱ्या आहेत. याशिवाय गडातील पिण्याच्या पाण्याची सोयीकरिता दक्षिणेकडे अंधारबाव नावाची आणखी एक विहीर आहे. पायऱ्या उतरून गेल्यावर ओंजळीने या विहिरीचे पाणी पिता येते. किल्ल्यात गोडया पाण्याच्या एकुण चार विहीर असुन त्यातील या दोन भुमिगत विहीरी आहेत. गणपती मंदिराजवळ दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा /दर्या दरवाजा/ दस्त दरवाजा अशी अनेक नावे आहेत. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली असुन वरील बाजुला व्यालशिल्प कोरलेले आहे. व्यालशिल्प म्हणजे वाघासारखा तोंड असणारा एक काल्पनिक प्राणी ज्याच्या पायात चार, तोंडात एक आणि शेपटीत एक असे सहा हत्ती पकडलेले दाखवलेले असतात. दरवाजा जवळच कान्होबाची म्हणजेच कानिफ नाथांची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. घुमटीच्या डाव्या बाजूच्या तटाच्या आत लांबवर बांधलेल्या दोन खोल्या दिसतात. हे बहुधा कारागृह अथवा शौचकूप असावे. किल्ल्याच्या या भागात तटाबाहेर गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जुनी दुरुस्त केली जात असत. पुरातन गोदीचे हे अवशेष खरोखरच अभ्यासनीय आहेत. गोदीच्या या भागात यशवंतदारीदेवी व वराह हनुमान मंदिर आहे.येथे किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गडाच्या तटबंदीवरून चालत संपुर्ण गड पाहता येतो.
तब्बल पाच वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी
किल्ल्याच्या उत्तर बुरुजावर गाडयावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ डाऊसन हार्डीफिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर इंग्लंड, १८४९असे तोफा बनवणाऱ्या कंपनीच नाव व वर्ष कोरलेल आहे. उत्तरेकडील या बुरूजावरून खांदेरी-उंदेरी किल्लादर्शन होते तर पूर्वेला सागरगड व कणकेश्वर डोंगर दिसतो.दक्षिणेकडे कोर्लई किल्लाही दिसतो. मुख्य प्रवेशदार व विनायकाचे मंदिर ह्यामधे कान्होजी आंग्य्रांच्या पडझड झालेल्या वाडय़ाचे अवशेष दिसतात. कधीकाळी पाचमजलीअसलेला हा वाडा १७५३ ते १७८७ या ३४ वर्षांत तब्बल पाच वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सन १७७०मधे पिंजरा बुरूजाजवळ आग लागली. काही वेळातच ती फडणीस वाडा, जुना राजवाडा व तबेल्यापर्यंत पसरली. त्यानंतर १७८७ मधे लागलेल्या आगीत वाडयाची प्रचंड हानी झाली. पुढे सन १८१६मधे नानीसाहेबाचा वाडा नावाची पाच मजली इमारत राघोजी आंग्रे यांनी नव्याने बांधली आणि राहती केला. पण थोडय़ाच वर्षांत १८३९ मध्ये आंग्य्रांचे हे संस्थान इंग्रजांकडून खालसा झाले. त्यांचा अंमल आल्यावर त्यांनी सन १८४२ मधे या वाडय़ाच्या लाकडांचा लिलाव केला आणि इथले दगड वापरुन अलिबागच्या पाणी पुरवठा विभागाची इमारत बांधली. कुलाबा हे नाव ‘कुल’ आणि ‘आप’ या शब्दांपासून तयार झाले. कुल म्हणजे सर्व, तर आप म्हणजे पाणी ! सर्व (बाजूने) पाणी असलेली ही जागा म्हणजे ‘कुलाप’! याचाच अपभ्रंश तो कुलाबा !
ब्रिटीश व पोर्तुगिज यांच्या संयुक्त सैन्याचा हल्ला
२९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिज यांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६५०० पायदळ,२०० घोडेस्वार,२४ पौंडी आठ व १८ पौंडी आठ तोफा शिवाय इतर लहान मोठया तोफा, ६ युध्दनौका व त्यावरील सैनिक असे प्रचंड सैन्यबळ घेऊन कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला. यावेळेस किल्ल्यावर फक्त १००० पायदळ आणि ७०० घोडदळ होते. पण कान्होजी आंग्रे यांनी योग्य रणनीती आखुन बाजीराव पेशव्यांच्या सहाय्याने या संयुक्त फौजेचा सपशेल पराभव केला. १८३९ मध्ये आंग्य्रांचे संस्थान खालसा झाल्यावर काही काळ इंग्रजांच्या सैन्याची एक तुकडी येथे रहात होती
कसे जायचे?
मुंबईहून – पनवेल – वडखळ मार्गे अलिबागला जावे, अलिबागच्या समुद्र किनार्यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते. गडावर राहण्याची – जेवणाची सोय नाही, पण अलिबाग मध्ये आहे.
Leave a Reply