कोथळीगड

Kothaligad : उर्ध्वमूखी भुयारीमार्गाचा – कोथळीगड

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना सह्याद्रीतील गिरीदुर्गांचे महत्व जाणले होते. त्यामुळे त्यांनी असंख्य गिरीदुर्ग लष्करीदृष्ट्या भक्कम केले होते. हे करताना त्यांनी फक्त आपले लक्ष्य बलाढ्य गिरीदुर्गांवर केंद्रित न करता, छोट्या छोट्या गिरीदुर्गांवरही केंद्रित केले. शिवकालात मोक्याच्या ठिकाणी असलेले गिरीदुर्ग, टेहळणीसाठी उपयोगात आणले जात असत. कोथळीगड Kothaligad हा देखील असाच टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला. दुरून बघितल्यावर एका पाणबुडीच्या आकाराचा हा किल्ला दिसतो आणि पठाराच्या उजव्या बाजूला मस्त दरी आणि शुभ्र कोसळणारे धबधबे दिसतात. एकदम प्रसन्न वाटतं इथे. मस्त जोरदार हवा सुरु असते, आणि समोर मस्त हिरव्या गवताचा गालीचा आपले भान हरखून टाकतो. पेठ गावाच्या बाहेरूनच, शेतीच्या बंधाऱ्यावरून गडावर जायला वाट आहे

लहानशा दिसणार्‍या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दूल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले. हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दूल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह (विजयाची किल्ली) असेही नामकरण करण्यात आले.फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नोव्हेंबर 1684 ला नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकुन घेण्याचा अयशस्वी प्रयास केला;ज्यात तो आणि त्याचे सैन्य मारले गेले.

पेठच्या किल्ल्यावर दुर्गवास्तुशास्त्राची अक्षरश: उधळण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चढणही अवघड नाही. गावापासून गडाची वाट एकदम सोप्पी आहे. ३५-४५ मिनिटात आपण एका भग्न प्रवेशद्वारातून गडावर पोचतो. तिथून उजवीकडील पायऱ्यांच्या वाटेने आपण एका प्रशस्त गुहेजवळ येऊन पोचतो. ही गुहा पूर्णपणे कातळात खोदून काढली असून, गुहेच्या तोंडाशी भैरोबाचं देऊळ आहे. गुहेतील खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले असून, गुहेत जनाईची मूर्ती आहे. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. या देवळाशेजारी आहे एक स्वच्छ, चवदार पाण्याचे टाके. हे टाके उन्हाळ्यातही तीन महिने पेठ गावाला पाणी पुरवते आणि तेथेच एक आश्चर्य दडले आहे. प्रथमत: आपल्या लक्षातच येत नाही. या टाक्यावरून एक दगडी भुयारी जिना आपल्याला थेट डोंगर माथ्यावर घेऊन जातो. येथे कर्नाळा किल्ल्यासारखा एक अंगठय़ाच्या आकाराचा सुळका आहे. याच्या पोटात एखाद्या मिनारातील जिन्याप्रमाणे गोल फिरत जाणारा भुयारी मार्ग, कातळाच्या पोटातून नागमोडी ७५ पायऱ्या खोदलेल्या आहेत, ज्या आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जातात. वर एक छोटेखानी दगडी प्रवेशद्वार आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला हत्तीचे आणि सिंहाचे दगडात कोरलेले शिल्प आहे. गडमाथ्यावर एक पाण्याचे टाकं आणि एका पडीक मंदिराचे अवशेष आहेत. तिथून परत खाली उतरून गुहेत आल्यास, डाव्या बाजूला पुढे गेल्यास एक विस्तृत पठार आहे. तिथे एक तोफ चांगल्या अवस्थेत आहे. सुळक्याच्या वर छोटीशी सपाटी आहे. येथे वाडय़ाचे जोते दिसते. एक छोटेसे तळे आहे आणि येथे आपल्याला पावसाळ्यात आढळतो पिवळाजर्द रानसोनटक्का. अधूनमधून ढग विरळ झाल्यास आपल्याला भीमाशंकर, कलावंतीण (पदरगड), ढाकची बहिरी, राजमाची, माथेरान इत्यादी गिरिशिखरांचे दर्शन होते. गुहेच्या आधी आपल्याला गड प्रदक्षिणा करता येते.

कर्जतहून एस.टी.ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात जावे. हे अंतर साधारण 30 किमी आहे. नेरळहून येताना कशेळे या गावी यावे आणि जामरुखची एस.टी. पकडून आंबिवली गावात यावे. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाच्या पायथ्याशी ‘पेठ‘ हे गाव आहे या गावाहून वर गडावर चढण्याचा मार्ग दमछाक करणारा आहे. पण वाटेवरील करवंदांची आणि चाफ्याची झाडे ही वाटचाल सुखावह करतात. ही वाट सरळ किल्ल्याच्या प्रवेशव्दाराशी घेऊन जाते. भैरोबाच्या गुहेत 20-25जण व्यवस्थित राहू शकतात. त्याशिवाय खाली पायथ्याशी पेठ गावात शाळेत अथवा मंदिरात व्यवस्था आहे. जेवणाची सोय- पेठ गावात ‘कोथळागड’ नावाचे हॉटेल आहे, घरगुती होऊ शकते.

काहीसा दुर्लक्षित असलेला हा किल्ला असल्याने येथे कधीतरी ट्रेकला येणार्‍या ग्रुपव्यतिरिक्‍त जास्त राबता नसतो. एकेकाळी 1684 च्या नोव्हेंबरमध्ये हर हर महादेव या गर्जनेने चारी दिशा दणाणलेला, तोफा, भाले – बाण यांचा झालेला वर्षाव, सळसळत्या तलवारीच्या पात्याने जमीनदोस्त केलेले गनिमांचे देह, रक्‍ताचे वाहिलेले पाट आणि शेकडो मावळ्यांच्या बलिदानाच्या रक्‍तरंजित इतिहासाचा साक्षीदार असणारा हा कोथळी गड पार्टीछाप सोकॉल्ड लोकांच्या विकृतीचा बळी ठरला आहे. गडावर ठिकठिकाणी बाटल्यांचा पडलेला खच, फुटलेल्या काचा या गडाच्या वैभवशाली इतिहासाची अवहेलनाच करीत आहे. पण आज जिथे मोठमोठया बलाढ्य आणि संरक्षित गडांची या विवंचनेतून सुटका नाही तिथे ह्या छोट्याशा कोथळीगडाला कोण विचारणार?…