हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले एक स्वप्न. लाभलेले वरदान. त्यांच्याशिवाय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. त्यांचे आयुष्य हे एका चित्रपटाचा विषय होऊ शकेल. आज (10 ऑक्टोबर) गुरुदत्तचा Guru Dutt स्मृतिदिन.
आरपार, कागज के फूल, चौदहवी का चाँद, प्यासा, बाजी, साहिब बीबी और गुलाम, सी.आय.डी. असे काही नावाजलेले चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांचे चित्रपट त्यातला जिवंतपणामुळे ते कायम स्मरणात राहतील. गुरुदत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या आयुष्यात खरे तर ते दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व जगले. आयुष्यात दोन स्त्रिया आल्या. दोन्ही त्यांच्या प्रेरणा होत्या. पत्नी गीता दत्त आणि अभिनेत्री वहिदा रहमान. गीता दत्त त्यांच्या पत्नी होत्या, तर सी. आय. डी. या चित्रपटापासून वहिदा रहमान त्यांच्या आयुष्यात आल्या. गुरुदत्त एक जागतिक पातळीवर निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतादेखील होता. त्यांना साहित्याची, संगीताची जाण पराकोटीची होती. पण, अभिनय ही त्यांची पहिली पसंती नव्हती तरीही त्याच्या सहज, संवेदनशील आणि नैसर्गिक अभिनयाचं गारुड रसिक प्रेक्षकांवर कायम होते आणि राहील.
जन्म
जीवनभर अखंड प्यासा राहिलेल्या, तहानलेल्या गुरुदत्तचा Guru Dutt जन्म बेंगलोरी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात ९ जुलै १९२५ मध्ये झाला. त्याचे वडील बर्मासेल कंपनीमध्ये कारकून. मात्र त्यांना इंग्रजी साहित्याचा मोठा नाद होता. आई आणि वडिलांमध्ये तितकासा सुसंवाद जमला नव्हता. मात्र, आई वासंतीदेवींचा स्वभाव खूप महत्त्वाकांक्षी. आपल्या मुलांनी काही मुलखावेगळे करून दाखवावे, हा तिचा ध्यास. गुरुदत्त वयाच्या पंधराव्या वर्षी अल्मोड्याला गेला आणि तेथे त्याने उदय शंकर यांच्या नृत्य कलाकेंद्रात नृत्याचे शास्त्रोक्त धडे गिरवले. पुढे बाबूराव पै यांच्याकडे तो पुण्याला प्रभात फिल्म कंपनीमध्ये तीन वर्षांच्या कंत्राटावर दाखल झाला. गुरुदत्तसाठी पुण्याचा मुक्काम हा खूप चैतन्यदायी होता. तेव्हा तुकारामबुवांच्या देहू येथील डोंगरावर जाऊन अखंड भटकणारा, तसेच भल्या पहाटे पर्वतीची टेकडी चढून एका बाजूला तास न् तास ध्यानस्थ बसणारा गुरुदत्त अनेकांनी पाहिला आहे.
दिग्दर्शनाची संधी
सन 1945 मध्ये प्रभातच्या “हम एक है’चे चित्रीकरण सुरू होते. त्या चित्रपटाचा नायक होता देवानंद; तर नृत्य दिग्दर्शक गुरुदत्त. Guru Dutt कंपनीत सर्वांसाठी धोबी एकच असायचा. एका गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी देवानंदने गुरुदत्तच्या अंगावर आपला सदरा पाहिला. त्याने सेटवरच गुरूला बाजूला घेऊन ती गोष्ट त्याच्या निदर्शनास आणली. घोटाळा धोब्याचा होता. मात्र त्याही विचित्र स्थितीत हिरमुसलेला गुरुदत्त म्हणाला,””माझ्याकडे आता घालायला दुसरा शर्ट नाही. उगाच गडबड करू नकोस.” त्या उमेदीच्या आणि गरिबीच्या दिवसांत दोघांमध्ये दोस्ताना घडून आला होता. सोबत अभिनेता रहमानही असायचा. पुढे चित्रसृष्टीत ज्याला यश मिळेल, त्याने दुसऱ्याला आधार द्यायचा, अशा आणाभाका झाल्या होत्या. त्यानुसार 1951 मध्ये “बाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने देवानंदने गुरुदत्तला दिग्दर्शनाची संधी दिली, तर “सीआयडी’ या आपल्या चित्रपटामध्ये गुरुदत्तने देवानंदला प्रमुख भूमिका दिली.
प्यासा – एक मैलाचा दगड
सन 1957 चा “प्यासा’ हा चित्रपट गुरुदत्तच्या आणि भारतीय चित्रपटदृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड. विजय नावाचा, घर असूनही बेघर झालेला, नातीगोती हरवलेला एक उमदा तरुण कवी. विजयची व्यक्तिरेखा नानारंगी. रस्त्यावरून भटकणारा एक हुशार कवी. ज्याचा दर्द समाजाला ठाऊक नाही. त्याच्या दर्दभऱ्या गीतांना ना व्यासपीठ मिळते, ना प्रकाशक भेटतो. त्याचे लेखन म्हणजे प्रकाशकांच्या कचऱ्याच्या टोपल्या आणि रद्दीच्या दुकानातील फळ्या यांचीच भर. गुलाबोच्या चुरगळलेल्या पदराच्या सावलीत अशांत विजयला थोडेफार सुखाचे कवडसे सापडतात. विजयला प्रकाशाची वाट सापडावी म्हणून गुलाबो पुढे धावते. आपले कष्टांच्या घामाने भिजलेले दागिने विकून त्याचे काव्यसंग्रह प्रकाशित करते. ही मुलखावेगळी भूमिका मधुबाला साकार करणार की मीनाकुमारी तिच्यामध्ये अधिक रंग भरेल, अशा पैजा तेव्हा चित्रपटसृष्टीत सुरू होत्या. मात्र, गुरुदत्तने जाणूनबुजून गुलाबोच्या अपरिचित व्यक्तिरेखेसारखाच वहिदा रहमान हा तोवर अज्ञात असणारा गोड चेहरा पडद्यावर सादर केला.
कागज के फूल
एका अभिनेत्रीच्या मोहपाशात अडकलेला दिग्दर्शक ही “कागज के फूल’ची पटकथा गुरुदत्तच्या खासगी जीवनाशी बराचसा समांतर प्रवास करणारी होती. या थोर कलावंताचा आलेखच मुळी अभिजात गायिका गीता दत्त आणि ख्यातकीर्त अभिनेत्री वहिदा रहमान या दोघींमध्ये वाटला गेलेला आहे. जेव्हा “बाजी’ चित्रपटाचे गीतमुद्रण सुरू होते, तेव्हा सांताक्रूझला राहणाऱ्या गीता दत्त नावाच्या देखण्या आणि मलमली आवाजाच्या गायिकेच्या प्रेमपाशात गुरुदत्त अडकला होता. दोघांच्याही घरातून लग्नाला प्रचंड विरोध होता. तरीही दोन वर्षांनंतर ते दोघे विवाहबंधनात अडकले. 1957 मध्ये गुरुदत्तच्या रुपेरी आयुष्यात वहिदा रहमानसारखी तेजस्वी तारका आली. त्यानंतरच त्याच्या वैवाहिक आयुष्यातील वादंगाला प्रारंभ झाला. तो संसार, मुले यांच्याऐवजी चित्रीकरण, गीतमुद्रण अशा कामांतच दीर्घ काळ गुंतून पडायचा. त्यामुळे गीता दत्त वहिदाबद्दलच्या संशयाने अधिकच चरफडून जायची, असे काही जणांना वाटते. मात्र, त्याच वेळी गुणवान स्त्रियांबद्दलची गुरुदत्तची आसक्ती आणि त्याचे प्यासेपण डोळ्याआड करता येणार नाही. तो पुण्यात असताना विजया नावाच्या एका मुलीच्या प्रेमात त्याचे आकंठ बुडून जाणे… तिच्यासोबत पळून जायची त्याने केलेली तयारी, याही गोष्टी अद्याप अनेकांना ज्ञात आहेत.
गुरुदत्तच्या नायिका
“प्यासा’ची गुलाबो अब्रार यांनी थोडी भडक लिहिली होती. तिच्या ओठी दिलेली सिगारेट गुरुदत्तने हळूच बाजूला काढून ठेवली. अन् तिच्या भावभऱ्या मुद्रेवर आणि लुब्ध; तरीही दुखऱ्या अशा डोळ्यांतील छटांवर आपला कॅमेरा चार्ज केला. प्रेमातुर झालेली गुलाबो आपल्या प्रियकराकडे वादळवाऱ्यात सापडलेल्या लतिकेसारखी खेचली जाते. तिचा हा दर्द जिवंत करण्यासाठी “आज सजन मोहे अंग लगा लो’ हे गीत एस. डी. बर्मन यांनी मुद्रित केले होते; तेही गीता दत्तच्या आवाजात. मात्र गीताचा साजण वहिदाच्या उंबरठ्यावर जाऊन अडकला. एक अभिजात गायिका म्हणून गीता दत्त तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर होती. आपल्या नवऱ्याच्या प्रीतीसाठी, संसारासाठी तिनं आपल्या धवल गायकीकडे-करिअरकडे दुर्लक्ष केले. स्वत:चं नुकसानही केलं, या गोष्टीसुद्धा विसरता येणार नाहीत. मात्र दुर्दैवानं “जाने क्या तूने कही’ असं म्हणता म्हणता “बात कुछ बनही गयी’ असंच सारं झालं.
गुरुदत्तचं योगदान
एक अभिजात आणि अव्वल दिग्दर्शक असं गुरुदत्तचं योगदान कोणाला नाकारता येणार नाही. चित्रपटाच्या नृत्य, पटकथा, अभिनय, संगीत अशा विविध अंगांवर त्याची कमालीची हुकमत होती. “साहिब, बिबी और गुलाम’ या चित्रपटातील साथिया, आज मुझे निंद नही आएगी’ हे गीत.. मुख्य नर्तिकेच्या पाठीमागे नाचणाऱ्या सहायक नर्तिकेचा एकही चेहरा प्रकाशात दिसत नाही. या गीतासाठी गुरुदत्तनं उभी केलेली तिहेरी प्रकाशयोजना केवळ लाजवाब होती. कलावंत, दिग्दर्शकाकडे आवश्यक असणारी एक हिंमत आणि ईर्ष्यासुद्धा त्याच्या ठायी होती. “प्यासा’ चित्रपटाची तीन रिळं चित्रित झाल्यावर विजय या कवीची भूमिका माझ्यापेक्षा दिलीपकुमार अधिक चांगली करेल, या कल्पनेनं त्याला पछाडलं. त्या काळात “न भूतो’ असा दोन लाख रुपये किमतीचा मेहनताना दिलीपसाहेबांनी गुरुदत्तकडे मागितला होता. एवढी रक्कम देणं अशक्य असल्याचं गुरुदत्तनं सांगताच दिलीपसाहेब बोलले, “”सांगा तुमच्या वितरकांना दिलीपकुमार काम करतोय म्हणून. ते वाढीव रक्कम द्यायला तयार नसतील तर मी माझे वितरक उभे करतो!” तेव्हा गुरुदत्तनं सांगून टाकलं- “”मी माझे वितरक बदलणार नाही अन् एकदा विकलेल्या सिनेमाचे वाढवून वा अडवून पैसे मागणं माझ्या तत्त्वात बसत नाही. शेवटी कमी रकमेत भूमिका करायला दिलीपकुमार यांनी मान्यता दिली. त्या रात्री एकूणच चित्रपटसृष्टीबाबत अब्रार अल्वींकडे गुरुदत्तचं मन कळवळलं. “”अब्रार, या चित्रदुनियेत आपण अनेकांना अभिजात कलावंत म्हणून पाहतो; मात्र त्यांच्या जागी प्रत्यक्ष उभे ठाकलेले असतात, ते सौदागर!” ठरल्या दिवशी संध्याकाळी चार वाजेपर्यंत गुरुदत्तनं वाट पाहिली. मात्र, शूटिंगसाठी दिलीपकुमार फिरकले नाहीत, तेव्हा नव्यानं तोंडाला रंग लावून विजयच्या भूमिकेमध्ये हिंमतबाज गुरुदत्त कॅमेरापुढे उभा राहिला.
“प्यासा’मध्ये गुरुदत्तनं उभं केलेलं वेश्यावस्तीचं चित्र हे केवळ अप्रतिमच. गरिबी, अज्ञान, रूढी, पोटाची खळगी, गुलामी अशा काटेरी त्रिशुळांनीच मुली-बाळींना वेश्या व्यवसायात ढकललं जातं. महालक्ष्मीच्या “फेमस’ स्टुडिओमध्ये गुरुदत्तनं दाणेआळीचा एक सेट लावला होता. मध्ये फक्त अरुंद बोळ, तिथल्या पाणथळ फरशा, दोन्ही बाजूंचे लाकडी कठडे, पिंजरे, त्यापल्याड जनावरांसारख्या कोंडलेल्या अबला. त्या बोळातून मद्यधुंद विजय तथा गुरुदत्त एकेक पाऊल टाकत पुढे चाललाय. मागे वळून कधी नजरेच्या कोपऱ्यातून तर कधी डोळे फाडून तो त्या गरीब अश्राप पोरींकडे पाहतोय. त्या कोणाच्या तरी बहिणी आहेत, माता आहेत, लेकी आहेत, या जाणिवेनं या वेदनांच्या ठणक्यांनी ओतप्रोत भरलेला गुरुदत्त नावाचा महान कलावंत रफीच्या आवाजात आक्रोशतो आहे-
ये पुरपेच गलियों, ये बदनाम बाजार
ये गुमनाम राही, ये सिक्कों की झंकार …..
ये फुलों के गजरे, ये पीकों के छींटे
ये बे-बाक नजरे, ये गुस्ताख फिकरे
ये ढलके बदन, और ये बीमार चेहरे
जिन्हे नाज है हिंद पर वो कहॉं हैं?
कहॉं हैं कहॉं हैं कहॉं हैं?
गुलाबो असो, “मालिश मालिश ऽऽऽ’ असे ओरडणारा सत्तारभाई (जॉनी वॉकर) असो; या अशा तळागाळातल्या व्यक्तिरेखा साहित्यात आपल्याकडे उर्दू लेखक सदाअत मंटोने रेखाटल्या आहेत
गुरुदत्तचा गूढ मृत्यू
गुरुदत्तचा रहस्यमय, गूढ मृत्यू हा एखाद्या चित्रपट कथेत शोभावा असाच अनाकलनीय. खऱ्या अर्थी रहस्यांच्या नानाविध पदरांमध्ये गुरफटलेली ती एक दुखान्त अखेर. ता. 10 ऑक्टोबर 1964 या दिवशी वयाच्या अवघ्या एकोणचाळिसाव्या वर्षी गुरुदत्तचं एकाएकी जाणं म्हणजे चित्ररसिकांसाठी एक वज्राघातच ! तेव्हा तो पेडररोडवरील आर्क रॉयल नावाच्या टोलेजंग वास्तूमध्ये भाड्याच्या जागेत राहत होता.
आपल्या चित्रपटाद्वारा “ये है बॉंबे मेरी जान’ असं सांगणाऱ्या गुरुदत्तचं ते काव्य अमर झालं; मात्र ती मुंबई आता राहिली नाही. आणखी काही वर्षं हा अभिजात कलावंत इथं राहिला असता तर मात्र भारतीय चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात त्यानं अनेक तुरे खोवले असते, हे निश्चित. त्याचा आकस्मिक मृत्यू हा तसा वज्राघातच होता…
तेव्हा गुरुदत्त नावाच्या आपल्या मित्राच्या सन्मानार्थ कैफी आझमी यांनी लिहिलेल्या ओळी आठवतात…
“”रहने को सदा दरमें आता नही कोई ,तुम जैसे गये ऐसे भी जाता नही कोई !”
Leave a Reply