आज 10 ऑक्टोबर – जागतिक गुलाबजाम Gulabjam दिवस. #worldgulabjamunday लालसर, मऊसुत, खमंग तळलेला आणि त्यानंतर पाकात घोळलेला गरमागरम गुलाबजाम समोर आले की हात आखडता घेणं म्हणजे महापाप असं विनोदाने म्हटलं जातं. “लग्नसराई असो वा घरातील अन्य शुभकार्य, खमंग पदार्थांची रेलचेल असलेल्या ताटात गुलाबजाम पडले नाहीत तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही”, “अन्न हे पुर्णब्रह्म असलं तरी ‘गुलाबजाम’ हे सर्वोत्तम वरदान आहे” ही वाक्य अनेकदा कानांवर पडली असतील.
इतिहास
भारतीय पक्वानात गुलाबजामचे Gulabjam स्थान हे मोठे आहे. इतिहासात गुलाबजाम संदर्भातील अनेक रंजक तथ्यांचे वर्णन करण्यात आले आहे. भारतात मिटक्या मारून खाल्ल्या जाणा-या गुलाबजाम या पक्वान्नाची संकल्पना मूळ भारतीय नाहीच. मात्र परदेशातील या प्रकाराचा प्रयोग भारतात झाला तो सतराव्या शतकात. पर्शियन बमियाह आणि तुर्कीश तुलांबा हे दोन गोड पदार्थ देखील बहुतांश गुलाबजामशी साधर्म्य साधणारे आहेत. ते पदार्थ देखील मऊ असतात आणि त्यांना देखील साखरेच्या पाकाच्या माध्यमातून गोडवा प्रदान करण्यात येतो. फक्त गुलाब जाम हा थंड असेल तर वाढला जातो आणि ते गरमा गरम वाढले जातात, हाच काय तो मूळ फरक आहे. ह्या परदेशी पदार्थांची प्रेरणा घेऊनच मुघल आचाऱ्यांकडून गुलाबजामचा आविष्कार केला गेला होता.
त्याचे झाले असे की, दिल्लीच्या तक्तावर बसलेल्या शहाजानना खूष करण्यासाठी तेथिल खानसामा प्रयत्नशील होते. रोजच्या पठडीतील मिष्टान्नाव्यतिरिक्त काहीतरी निराळे बनवावे यासाठी झटणा-या खानसामाने वेगवेगळे प्रयोग सुरु केले. त्यावेळी त्याला पूर्वी कधीतरी पाहिलेला एक पदार्थ आठवला. त्याने तो पदार्थ चाखला नव्हता, मात्र त्याची कृती त्याला लक्षात होती. आपल्याला हा पदार्थ नक्की बनवता येईल की नाही याबाबत त्याला शंका होती, मात्र त्याने आपले प्रयत्न सुरुच ठेवले. खव्याचा वापर करून काहीतरी पदार्थ तयार करावा या विचाराने खव्याचे लाडुसारखे गोल आकार करत तुपात तळले मात्र एवढं करून त्याला गोडवा येत नव्हता. त्यासाठी त्याने साखरेच्या पाकात हे गोळे भिजवले. आता चवीत गोडवा आला मात्र त्याला हवा तसा खमंग दरवळत नव्हता. खूप प्रयत्न करूनही सुवास काही येईना, अखेरिस त्याने या तळलेल्या गोळ्यांवर गुलाबपाणी शिंपडले आणि त्या मंद सुवासाने संपूर्ण महाल दरवळली.
जांभळासारखा (जामून) आकार आणि गुलाबाचा सुवास यांवरून या पदार्थाला गुलाबजाम Gulabjam हे नाव मिळालं असल्याचं सांगितलं जातं. ज्या बादशहासाठी ही मिठाई बनवली होती त्याला कितपत आवडली हे ठाऊक नाही, मात्र त्यानंतर अनेक शतके, आजही घराघरात जगभरातील खव्वैयांना या पदार्थाने वेड लावले आहे.
गुलाबजामचं बदलतं रुप
तुम्हांला आश्चर्य वाटेल की, भारतात केवळ राज्यच नव्हे तर प्रत्येक गावांनुसारही गुलाबजामचं रुप बदलतं. कुणी त्याला गुलगुले म्हणतं तर कुणी तुलुम्बा. अर्थात भारतीयांनी आपलं कौशल्य पणाला लावून त्याला त्यामध्ये बदल केले आहेत. लंबगोल, कवडी, शंख, जाळीदार, सुबक नक्षी अशा अनेकविध आकारांमध्ये गुलाबजाम समोर आला की हात आखडता घेणं शक्यच नाही. लेडीकिनी हा गुलाबजामचा प्रकार असून हे लांब सडक आणि तांबड्या राखाडी रंगाचे असतात. लेडीकिनी गुलाबजाम हे प्रामुख्याने कोलकाता शहरात मिळतात. ह्या लेडीकिनी गुलाबजामची सुरुवात १८५० साली भीम चंद्र नाग ह्या मिठाईवाल्याला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड कॅनिंगच्या पत्नी लेडी कॅनिंगसाठी खास मिष्ठान्न तयार करण्याचे आदेश देण्यात आले. लेडी कॅनिंग यांच्यासाठी बनवलेलं खास मिष्ठान्न म्हणून त्या पदार्थाला लेडीकिनी हे नाव मिळाले. लेडी कॅनिंगला देखील हा गोड पदार्थ प्रचंड आवडला, तिने आपल्या प्रत्येक कार्यक्रमात ह्या पदार्थाचे वाटप केले. बंगालमध्ये ह्या पदार्थाच्या प्रसाराला लेडी कॅनिंगने मोठा हातभार लावला होता.
गुलाबजाम प्रकार
कुंभकोणम येथे गुलाबजामचा अजून एक प्रकार आढळून येतो. त्याला कुंभकोणमचा सुखा जामुन म्हणून ओळखले जाते. हा पदार्थ कुंभकोणमच्या मुरारी स्वीटवर मिळतो. एक परिवार अनेक वर्ष ह्या पदार्थाची विक्री कुंभकोणम शहरात करत आहे. हा सुखा जामुन तयार करण्याची पद्धत गुलाबजाम सारखीच असून फक्त या गुलाबजामला ७ दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात येते, ज्यात तो गुलाबजाम पूर्णपणे पाक शोषून घेत कोरडा होतो. कुंभकोणमचा सुखा जामुन आकाराने लहान असतो.
गुलाबजामचा परिवारात एक अजून प्रकार आहे, जो भारतातील बहुतांश लोकांचा लाडका आहे. तो म्हणजे काला जाम अथवा काला जामुन. काळ्या आणि जांभळ्या रंगाचा हा गुलाबजाम नेहमीपेक्षा जास्त गोड असतो आणि अधिक तापमानावर तयार केला जातो. भारताच्या बहुतांश भागात हा कालाजामुन सहज उपलब्ध होतो. हल्ली तर अनेक कंपनीचे रेडीमेड पॅकिंग पण येते अगदी छान होतात . झटपट स्वीट डिश तयार. पाकातला गुलाबजाम,काला जाम – त्यावरून साखर लावलेला रसगुल्ल्या एवढा मोठा पण आतून रंग लाल , पिवळा, काळा. एवढंच नव्हे तर बडिशोप. व्हॅनिला, केसर, वेलची अशा विविध फ्लेवर्सचा खमंग सुवास येताच खव्वैयांच्या तोंडाला पाणी सुटतं. हेच खरं भारतीय खाद्यसंस्कृतीचं यश म्हणावं लागेल. इंदौर, दिल्ली या खाऊगल्ल्यांमध्ये गरमागरम गुलाबजामसोबत खाल्ली जाणारी रबडी चाखण्यासाठी परदेशी खव्वैयेही हजेरी लावतात.
पूर्वापारच्या इतिहासातील प्रक्रियेचा मोठा टप्पा पार करुन आपल्यापर्यंत पोहोचणा-या गुलाबजामने खीर, पुरणपोळी, बासुंदी या पदार्थांना केंव्हाच मागे टाकलंय. म्हणूनच कोणत्याही सोहळ्यात खमंग गुलाबजाम मुखात पडल्याशिवाय सोहळ्याचा आनंद पूर्ण होणं शक्यच नाही. जागतिक गुलाबजाम दिवसाच्या खमंग शुभेच्छा!
Leave a Reply