आज ६ एप्रिल बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बे’ म्हणून मान्यता पावलेल्या अभिनेत्री सुचित्रा सेन Suchitra Sen यांचा जन्मदिन. सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या.
कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन Suchitra Sen यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. ‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले. त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषण यांच्याबरोबरचा चंपाकली, देव आनंद यांच्याबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
संजीव कुमार यांच्यासमवेत केलेली त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८ मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन Suchitra Sen कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता. यशस्वी कारकिर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री आणि बंगाल सरकार कडून बंगबिभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. सुचित्रा सेन यांचे निधन १७ जानेवारी २०१४ रोजी झाले. – साभार आंतरजालावरुन.
Leave a Reply