काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ मिळत नाही. या उलट, सत्तापदी बसलेल्या कित्येक व्यक्तींची दृष्टी संकुचित असते. जर एखाद्या बहुगुणी व्यक्तीच्या कर्तृत्वाला योग्य पाठबळ मिळाले तर तो समाज व देश हे सुदैवी असतात असेच म्हटले पाहिजे. सधन पारशी कुटुंबात 1909 साली जन्मलेले डॉ. होमी जहांगीर भाभा Dr Homi Bhabha हे एक असे द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा विश्वास संपादन केल्याने दोन द्रष्टया व्यक्तींची परस्परपूरक शक्ती निर्माण झाली. या एका बाबीचा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे! भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचणारे होमी भाभा यांचे 24 जानेवारी पुण्यस्मरण .
संशोधन
डॉ. भाभा अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी केंब्रिज विद्यापीठात असताना, तेथील संशोधनासाठी पोषक असलेल्या वातावरणाने प्रभावित झाले. आयुष्यात आपल्याला काय बनायचे आहे याची नेमकी कल्पना, त्यांना वयाच्या विशीच्या आतच आली. त्यांनी आपल्या वडिलांना 8 ऑगस्ट 1928 रोजी लिहिलेल्या प्रसिध्द पत्रात ते म्हणतात, ” एखादा व्यवसाय करणे अथवा अभियंता म्हणून नोकरी करणे हे माझ्या स्वभावात बसत नाही, ते माझ्या वृत्तीच्या व मतांच्या थेट विरुध्द आहे. भौतिकशास्त्र हे माझे क्षेत्र आहे व त्यात काम करण्याची माझी ज्वलंत इच्छा आहे. एखाद्या संस्थेचा प्रमुख किंवा ‘यशस्वी’ माणूस होण्याची माझी इच्छा नाही. ते करण्यासाठी अनेक हुशार व्यक्ती आहेत. मला भौतिकशास्त्रामध्ये काम करू देण्याची मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो.”
त्यांच्या वडिलांना हे फारसे पटले नाही. पण त्यांनी भाभांना अभियांत्रिकीत प्रथम श्रेणी मिळाल्यास पुढील दोन वर्षे गणिताच्या अभ्यासासाठी केंब्रिजमधील वास्तव्याच्या परवानगीचे वचन दिले आणि पुढे तसेच घडले. त्यानंतर, वयाच्या तिशीपर्यंत त्यांनी भौतिकशास्त्रात उच्च दर्जाचे संशोधन केले. त्या छोटया कालखंडात, त्यांनी इलेक्ट्रॉन व त्याचा प्रतिकण पॉझिट्रॉन यांच्यातील परस्पर क्रियांविषयीचे संशोधन करून इलेक्ट्रॉन्सनी केलेल्या पॉझिट्रॉनच्या स्कॅटरिंगचा सिध्दांत मांडला.तो आजही ‘भाभा स्कॅटरिंग’ म्हणून ओळखला जातो व भौतिकशास्त्रात, विशेषत: कण-त्वरित्रामध्ये (पार्टिकल ऍक्सिलरेटरमध्ये) त्या सिध्दांताचा दैनंदिन वापर होतो. भाभा स्कॅटरिंगच्या कॅस्केडिंग परिणामाद्वारे त्यांनी अवकाशात होणा-या ‘कॉस्मिक शॉवर’च्या घटनेचे स्पष्टीकरण दिले. डिरॅक यांच्या सापेक्षतासिध्द समीकरणांचा त्यांनी क्वांटम इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलेला यशस्वी वापर त्या समीकरणांचा सर्वात महत्त्वाचा उपयोग मानला जातो. थोडया कालावधीत केलेल्या या कार्यासाठी व पुढील अणुक्षेत्रातील कामगिरीसाठी ते नोबेल पुरस्कार मिळण्यास पात्र होते, असे अनेकांना वाटते, पण तसे झाले मात्र नाही.
टी.आय.एफ.आर. संस्थेची स्थापना
होमी भाभा ह्यांची स्मृती अणुशक्ती केंद्रातर्फे आत्मीयतेने जपली जाते. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अणुशक्ती विभागाने शुभेच्छापत्र प्रसृत केले. त्यात भाभांची रेखाटलेली चित्रे आहेत.डॉ. भाभांना त्यांच्या कार्याची दिशा 1939 मध्ये बदलावी लागली. ते सुटीसाठी मायदेशी आले असतानाच युरोपमध्ये दुस-या महायुध्दाचा उद्रेक झाला आणि पी.एम.एस. बॅरॉकेट यांच्या मँचेस्टर येथील प्रयोगशाळेत रॉयल सोसायटीच्या अनुदानाद्वारे संशोधन करण्याची त्यांची योजना त्यांना सोडून द्यावी लागली. या प्रतीक्षेच्या कालखंडाचा सदुपयोग त्यांनी बंगळूरच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स या संस्थेत संशोधनकार्य करून केला. पुढे संशोधन कार्यासाठी त्यांच्यापुढे अनेक प्रस्ताव आले. या सर्वांतून मार्ग शोधून त्यांनी एक नवीन संस्था स्थापन करणे पसंत करून त्यासाठी पुढाकार घेतला. अशा संस्थांविषयीचे त्यांचे विचार स्पष्ट होते व त्यांचा त्यांनी आग्रहही धरला. ते जे.आर.डी. टाटांना 1943 मध्ये लिहिलेल्या पत्रात लिहितात ‘योग्य वातावरण व धोरणी आर्थिक पाठबळ नसल्यास विज्ञानाचा विकास या देशातील गुणवत्तेला न्याय देऊ शकणार नाही.’ आधी एखादी संस्था स्थापन करून मग लायक व्यक्तींचा शोध घेण्यापेक्षा उत्कृष्ट व्यक्तींभोवती संस्था व त्यातील विभागांची बांधणी करावी या, ब्रिटिश प्रोफेसर हिल यांच्या मताशी ते पूर्ण सहमत होते व पुढे त्यांनी तशा योजना अमलातही आणल्या. संस्थांना शासकीय मदत हवी, पण त्या नोकरशहांच्या ताब्यात जाऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी हे तत्त्वही त्यांच्या कार्यकालात त्यांनी राबवले. 1945 मध्ये टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टी.आय.एफ.आर.) या संस्थेची स्थापना या सर्व तत्त्वांवर आधारित अशीच झाली. आजही ही संस्था अणुशक्ती खात्यातर्फे मिळणा-या सरकारी मदतीवर चालवलेली पण एक स्वतंत्र संस्था असून सर्व जगात मान्यता पावलेली आहे. विज्ञान संशोधन संस्थेची इमारत व तिचा भोवताल, त्यांचे सौदर्य, तेथील सोयी सुविधा या उच्च दर्जाच्या असाव्यात या विषयी भाभांचा कटाक्ष व आग्रह होता. त्या बाबतीत तडजोड करण्याची तयारी नसल्याने त्यांचे अनेकांशी मतभेदही झाले. टी.आय.एफ.आर. व भाभा अणुसंशोधन केंद्र तुर्भे (त्या वेळची अणु उर्जा संस्था, तुर्भे), यांचा परिसर त्यांच्या या दृष्टीची साक्ष देतात.
अणुउर्जेतून विद्युतनिर्मिती
डॉ. भाभांची देशाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे अणुउर्जेतून विद्युतनिर्मिती करण्याचा तीन टप्प्यांचा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या आधारभूत व प्रेरक तत्त्वांमधील सर्वप्रथम तत्त्व म्हणजे देशातील युरेनियमचा मर्यादित तर थोरियमचा मुबलक साठा. थोरियम इंधन म्हणून वापरण्यास अनुकूल असलेल्या अणुभट्टीचे अभिकल्पन हे या कार्यक्रमाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. अणुउर्जा ही प्रदूषणविरहित आहे, परंतु वापरलेल्या इंधनातील किरणोत्सर्ग हे एक आव्हान आहे. त्यासाठी अशा इंधनाचा निराळया प्रकारच्या अणुभट्टयांत पुनर्वापर करून ही समस्या हलकी करणे हे दुसरे तत्त्व. या दोन्ही तत्त्वांमुळे निर्माण होणारी परिस्थिती ही भारताच्या संदर्भातील विशिष्ट अशी असल्याने त्यासाठी आवश्यक संशोधन करण्यात इतर देश स्वारस्य दाखवणार नाहीत. तसेच, या विषयाशी सतत जोडल्या गेलेल्या गोपनीयतेमुळे त्या विषयीच्या विज्ञान-तंत्रज्ञानाचे स्रोत मर्यादित आहेत. या बंधनांमुळे या विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये व त्यातून निर्माण होणा-या उद्योगांच्या गरजांमध्ये देशाला स्वयंपूर्ण होणे अत्यावश्यक आहे हे तिसरे तत्त्व. डॉ. भाभांचा दूरदर्शीपणा, दृष्टीचा आवाका व कर्तृत्वगुण हे कार्यक्रमाच्या आखणीत प्रकर्षाने दिसतात.
भारताच्या प्रगतीचा आराखडा
डॉ. भाभांची दूरदृष्टी व्यापकही होती व त्या अर्थाने ती त्रिमिती होती. 1960 च्या दशकात, जेव्हा कॉम्प्यूटरचा मागमूसही देशात कुठे नव्हता तेव्हा त्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते. कॉम्प्यूटरमुळे नवीन वैज्ञानिक संस्कृती उदयाला येईल असे त्यांनी नमूद केले आहे. या विश्वासामुळे टी.आय.एफ.आर.मध्ये कॉम्प्यूटर व इलेक्ट्रॉनिक्सचे विभाग त्यांनी सुरू केले. भारतातील पहिला काँम्प्यूटर तिथे बनला. हे विभाग नंतर तुर्भे इथेही सुरू केले गेले व त्यातूनच इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (ई.सी.आय.एल.चा) जन्म झाला. ट्रॉम्बे डिजिटल कॉम्प्यूटर्स (टी.डी.सी.) या शृंखलेतील संगणकांचा विकास तुर्भे येथे व निर्मिती इ.सी.आय.एल. हैदराबाद येथे होऊ लागली. 1963 साली भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स कमिटीची स्थापना केली. डॉ.भाभा तिचे अध्यक्ष होते. या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आराखडा व त्यात स्वयंपूर्णतेवर देण्यात आलेला भर हे काळाच्या निकषांवर आजही टिकून आहेत. या मार्गदर्शनातील डॉ. भाभांनी बजावलेल्या प्रमुख भूमिकेमुळे तिला ‘भाभा कमिटी” म्हणूनच ओळखली जाते. त्या मार्गापासून आपण किती ढळलो हा एक स्वतंत्र विषय आहे.
स्वयंपूर्णतेचे महत्त्व
रशियाने स्पुटनिक यानाचे उड्डाण 1958 मध्ये केले. त्यानंतर या क्षेत्रात भारताने आपले स्थान बनवायला हवे असे मत डॉ. विक्रम साराभाईंनी मांडले. या बाबतीतही डॉ.भाभांनी पुढाकार घेतला. आजच सुरुवात केली नाही तर इथेही आपण जगाच्या मागे पडू असे आग्रही प्रतिपादन करून अंतरिक्ष क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी त्यांनी भारत सरकारचे मन वळवले. डॉ.साराभाईंबरोबर त्याचा आराखडा बनवला. डॉ.भाभांच्या मृत्यूनंतर डॉ.साराभाईंनी अणुऊर्जा व अंतरिक्ष विज्ञान ही दोन्ही क्षेत्रे एकत्रितपणे सांभाळली. अंतरिक्ष विभागाचे आजचे यश पाहता डॉ.भाभा व डॉ.साराभाईंनी उचललेले पाऊल किती महत्त्वाचे होते ते लक्षात येते.
आधुनिक विज्ञानात संशोधन करायचे तर त्यासाठी लागणारे वैज्ञानिक तयार करणे आवश्यक आहे. याचे महत्त्व ओळखून तुर्भे येथे त्यांनी ट्रेनिंग स्कूल सुरू केले, ते 1956 मध्ये. तुर्भे येथील अनुभवी वैज्ञानिक तेथील पुढील वैज्ञानिक तयार करतात. अशी ती स्वयंपूर्ण शृंखला आहे. त्यामुळे विद्यापीठ शिक्षणात या विषयाचा अभाव असूनही आज मोठया संख्येने अणुवैज्ञानिक उपलब्ध आहेत. आजचे जवळपास सर्व अणुवैज्ञानिक, उच्चपदी असलेलेदेखील, या ट्रेनिंग स्कूलचे विद्यार्थी आहेत. मूळ पदवी निरनिराळया अभियांत्रिकी किंवा विज्ञान विषयातील असली तरी त्यातून मिळालेल्या ज्ञानाला अणुअभिमुखी करण्याचे मोठे कार्य ट्रेनिंग स्कूल गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ करत आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून आता होमी नॅशनल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व विवेचनावरून विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये देशाच्या स्वयंपूर्णतेचे महत्त्व डॉ. भाभांनी जाणले असल्याचे व त्या दिशेने त्यांनी अथक प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून येते.
देशहिताप्रती असलेली कळकळ
डॉ. होमी भाभांच्या पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या उत्तुंग व्यक्तीशी असलेल्या स्नेहसंबंधांमुळे एक मोठी शक्ती उभी राहिली. जे.आर.डी. टाटा व टाटा परिवार यांचे त्यांच्याशीही स्नेहसंबंध होते. काही लोक असा प्रतिवाद करतात की मोठया व्यक्तींशी असलेल्या परिचयामुळे त्यांना यश प्राप्त झाले. अशा स्नेहसंबंधांची त्यांना मदत झालीच; परंतु भाभांच्या ठायी वसलेल्या द्रष्टेपणा बरोबच त्यांची देशहिताप्रती असलेली कळकळ, सतत उत्कृष्ट दर्जाचा आग्रह, उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य, विज्ञान व कला या दोन्ही प्रांतांतील तितकाच सहज वावर या सर्व गुणांचा संगम त्यांच्यामध्ये झाला होता. याबरोबरच, त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘आपल्या आयुष्याचा कालावधी काही आपण वाढवू शकत नाही, पण त्याची तीव्रता, उत्कटता मात्र वाढवू शकतो. तेच मी करणार आहे.’ असा त्यांचा निश्चय होता.
मृत्यू
भाभांच्या आयुष्याचा कालावधी जरा लवकरच संपुष्टात आला व या बहुगुणी व्यक्तीला आपला देश मुकला हे मोठे दुर्देव. त्यांचे 24 जानेवारी 1966 रोजी जिनिवा येथील एका परिषदेसाठी जात असताना दिल्ली, बैरूत, जिनिवा मार्गे लंडनला जात असलेले एअर इंडियाचे विमान जिनिवाला उतरतेवेळी तेथील माऊंट ब्लॅक या पर्वतशिखरावर कोसळून विमानातील डॉ.भाभांसह सर्व 117 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. हा घातपात असल्याचा संशय अनेकजण अजूनही व्यक्त करतात. 1965 मधील लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू व 1966 मधील डॉ.भाभांचा मृत्यू या दोन्ही घटना, आंतरराष्ट्रीय प्रांगणातील दोघांचे स्थान काही देशांना अडचणीचे ठरत असल्याची भावना झाल्याने, सी.आय.ए.ने घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जातो.
Leave a Reply