बॉलीवूडमधील पहिला डान्सिंग स्टार किंवा जंपिंग जैक म्हटले जाणारे अभिनेता #जितेंद्र #Jitendra यांचा दि. 7 एप्रिल वाढदिवस… त्यानिमित्त त्यांना अभीष्टचिंतन!
जितेंद्र हे असे अभिनेता आहेत ज्यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शून्यातून विश्व उभे केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास सुरु झाला तो ज्युनिअर आर्टिस्ट एक्स्ट्रा म्हणून आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्टारपदापर्यंत मजल मारली. अशी उदाहरणे हिंदी चित्रपटसृष्टीत मोजकीच आहेत. 250 चित्रपटांच्या आपल्या करिअरमध्ये जितेंद्र यांचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग तयार झाला होता.
जितेंद्र Jitendra यांचा जन्म 7 एप्रिल 1942 ला अमृतसर पंजाब येथे झाला. जन्माच्या वेळी नाव ठेवले गेले रवि (रवि कपूर), चित्रपटसृष्टीत त्यांना जितूजी या नावाने बोलावले जाते. काही दिवस अमृतसरला राहिल्यानंतर त्यांचा परिवार मुंबईला आला आणि गिरगावातील एका चाळीत राहू लागला. वडील अमरनाथ कपूर आर्टिफिशल ज्वेलरी बनविण्याचे काम करीत असत. ही ज्वेलरी दुकानातून तसेच चित्रपटांमध्ये वापरण्यासाठी सप्लाय करीत. आई कृष्णा कपूर. जीतूजींचे प्राथमिक शिक्षण सेंट सेबेस्टियन गर्व्हमेंट हायस्कूलमध्ये झाले. कॉलेजजीवनात त्यांची ओळख राजेश खन्नाशी झाली आणि ती आयुष्यभर कायम राहिली.
जितेंद्र Jitendra यांच्या चित्रपटप्रवेशाविषयी एक किस्सा आहे. त्यांना लहानपणापासून चित्रपट पाहण्याची आवड होती आणि पुढे जाऊन या चित्रपटामधून काम करण्याची पण इच्छा होती. वडीलांना त्यांना प्रसिध्द दिग्दर्शक व्ही.शांताराम यांच्याकडे पाठविले. पण त्यावेळी वडीलांची शिफारस कामात आली नाही. व्ही.शांताराम यांनी सध्या रोल नाही असे सांगून त्यांना परतावून लावले. मात्र एकेदिवशी त्यांनी अमरनाथ कपूर यांना फोन करून जितेंद्रसाठी एक राजकुमाराचा रोल आहे त्याला सेटवर पाठवा असा निरोप दिला. बस मग काय जितेंद्र पोहचले सेटवर. पण तिथे गेल्यावर त्यांनी पाहिले की, राजकुमाराच्या वेशात बरेच कलावंत आहेत. तेव्हा त्यांना समजून चुकले की, आपल्याला एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून कामाला बोलावले आहे. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यानंतर पाच वर्षे छोटे मोठे रोल मिळत गेले, ते जितेंद्र करत गेले. एकदा तर व्ही.शांताराम यांनी त्यांना हिरोईनचा बॉडी डबल म्हणून काम करायला सांगितले, पण चित्रपटाच्या आवडीने जितेंद्रने ते ही हौसेने केले. त्यांना जो ही रोल मिळत असे तो रोल ते मन लावून मेहनतीने करत असत.
आणि मग तो सुवर्णदिवस उगवला. व्ही.शांताराम यांनी 1964 मधील ‘गीत गाया पत्थरोंने’ या चित्रपटासाठी हिरो म्हणून जितेंद्रला घेतले आणि अभिनेता म्हणून त्यांचे करियर सुरु झाले. या चित्रपटातच त्यांचे नाव रवि कपूर बदलून व्ही.शांताराम यांनी जितेंद्र Jitendra असे ठेवले. हा चित्रपट चांगलाच गाजला.
हिंदी चित्रपटसृष्टीत व्ही.शांताराम यांच्या चित्रपटातून काम करणारे कलावंत व्यावसायिक चित्रपटातून काम करु शकत नाही असा एक समज होता मात्र पुढे जाऊन जितेंद्रने हा समज खोटा ठरवला आणि एक यशस्वी अभिनेता म्हणून आपली वाटचाल सुरु केली.
गीत गाया पत्थरोंने नंतर जीतूजींचा फर्ज हा चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटात त्यांनी अभिनयासोबत केलेल्या नृत्याचे फारच कौतुक झाले. बस या चित्रपटानंतर जितेंद्र Jitendra आपल्या अनोख्या नृत्यशैलीमुळे प्रसिध्द झाले आणि त्यांना जंपिंग जॅक म्हटले जावू लागले. त्यांच्या नृत्यात एक अजब एनर्जी आणि उत्साह होता. फर्ज नंतर आलेले हमजोली आणि कारवा हे त्यांचे गाजलेले चित्रपट मग जीने की राह, दो भाई, जैसे को तैसा, धरती कहे पुकार के अशा चित्रपटातून त्यांनी आपल्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
पण एकसारखी भूमिका करून जितेंद्र वैतागले होते. त्याचदरम्यान त्यांनी राजेश खन्नाचा आनंद हा चित्रपट पाहिला. त्यांना लेखक गुलजार यांच्याविषयी एक आकर्षणच तयार झाले. जितेंद्र गुलजार यांना भेटायला गेले आणि त्यानंतर त्यांच्यासोबत परिचय, खुशबू और किनारा हे चित्रपट केले. ह्या चित्रपटातून जितेंद्र Jitendra यांच्या अभिनयाचा वेगळाच पैलू प्रेक्षकांसमोर आला. त्यानंतर जितेंद्र यांनी चित्रपट निर्माता म्हणून एका चित्रपटाची निर्मिती केली मात्र तो चित्रपट सपशेल आपटला. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जितेंद्र यांनी धडाधड एकामागोमाग एक अशा साऊथ इंडियन चित्रपटांना साइन केले. सोबत बिल्डरचा व्यवसायही सुरु केला. जितेंद्र यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम करत असताना मल्टीस्टार चित्रपटातूनही अभिनय केला. पडद्यावर रेखा, श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यासोबत त्यांची जोडी चांगली पसंद केली जाऊ लागली. या तिन्ही अभिनेत्रींसोबत त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले.
जितेंद्रनी Jitendra आपल्या करियरमध्ये 250 चित्रपट केले, त्यात मेरे हुजूर, खिलौना, हमजोली, कारवां, जैसे को तैसा, परिचय, खुशबू और किनारा, नागीन, धरमवीर, कर्मयोगी, जानीदुश्मन, द बर्निंग ट्रेन, धर्मकांटा, जुदाई, मांग भरो सजना, एक ही भूल, सौतन की बेटी, मवाली, जस्टीस चौधरी, हिंमतवाला, तोहफा, धर्माधिकारी, आशा, खुदगर्ज, आसमान से उंचा, मॉ हे त्यांचे गाजलेले चित्रपट.
90 च्या दशकात जितेंद्र यांनी चित्रपटातून काम करणे बंद केले आणि मुलगी एकता कपूर हिच्या दूरचित्रवाणी धारावाहिकांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये लक्ष घालणे सुरु केले. एकता कपूरच्या काही धारावाहिकातून त्यांनी कामही केले. झलक दिखला जा या नृत्यविषयक कार्यक्रमात परीक्षक म्हणून कामही पाहिले.
वैयक्तिक जीवनात जितेंद्र Jitendra यांचे हेमामालिनी सोबत असलेले अफेयर फारच गाजले होते, पण हे लग्न होता होता राहिले आणि 1974 मध्ये जितेंद्र यांनी निर्माता दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची बहीण शोभा सिप्पी यांच्यासोबत विवाह केला. मुलगी एकता आणि मुलगा तुषार. आज एकता कपूरचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे तर तुषार एक चांगला अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखला जातो. 2003 मध्ये जितेंद्र यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल फिल्मफेअर लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवार्ड दिले गेले. 2007 मध्ये दादासाहेब फाळके अॅकेडमी पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला तर 2014 मध्ये त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.
Leave a Reply