४ मे २०२४ ला पूंछ भागात हवाई दलाच्या गाड्यांवर झालेल्या दहशवादी हल्ल्यात शहीद झालेले कॉर्पोरल विक्की पहाडे Corporal Vikky Pahade हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नोनिया करबल गावातील रहिवासी होते आणि त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९९० रोजी झाला होता.
बालपण
स्वर्गीय श्री. दिमकचंद पहाडे आणि श्रीमती दुलारी पहाडे यांचा मुलगा, कॉर्पोरल विक्की पहाडे यांना तीन बहिणी आहेत. अगदी लहान असताना त्यांनी वडीलांचे छत्र गमावले. परिणामी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. शिक्षणासाोबत भारतीय हवाई दलात निवड होण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमारवाडा तालुक्यातील नवोदय विद्यालय, सिंगोडी येथे १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अवघ्या एका वर्षात २०११ मध्ये ते भारतीय हवाई दलात रुजू झाले.
भारतीय हवाई दलात समावेश
त्यांनी भारतीय हवाई दलात टेक्नीकल ट्रेडसमन म्हणून प्रशिक्षण घेतले आणि रडारसह हवाई दलाच्या विविध आयुधाच्या देखभालीवर त्यांची नेमणूक करण्यात आली. काही वर्षे सेवा केल्यानंतर त्यांचे रिना यांच्याशी विवाह झाला. या जोडप्याला २०१९ मध्ये हार्दिक हा मुलगा झाला. २०२४ पर्यंत त्यांनी हवाई दलाच्या विविध तळांवर सेवा बजावली होती. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर त्यांना कॉर्पोरल पदावर बढती देण्यात आली होती.
जम्मूमध्ये नियुक्ती
२०२४ मध्ये सी.पी.एल. विक्की पहाडे Corporal Vikky Pahade हे जम्मूमधील २३ विंग येथे स्थित ३५९ टी. आर. यू. (ट्रान्सपोर्टेबल रडार युनिट) सोबत कार्यरत होते. २३ विंग ए. एफ. ची स्थापना २५ जानेवारी १९६३ रोजी विंग कमांडर जे अँड्र्यूज यांच्या नेतृत्वाखाली जम्मू येथे करण्यात आली होती. २०२४ मध्ये, विविध मोहिमा हाती घेण्यात येणार होत्या. त्यासाठी, जम्मू येथील हवाई दलाच्या तळाकडे हवाई दलाच्या विमान आणि रडार यांचा समावेश होता. हा परिसर दहशतवादाने सक्रिय असल्याने, सुरक्षा दलांनी रस्ते आणि महत्वाच्या ठिकाणी पथके तैनात करून हवाईदलाचे कर्मचारी आणि साहित्य हलवताना सगळी दक्षता घेतली होती. ४ मे २०२४ रोजी, सी.पी.एल. विक्की पहाडे Corporal Vikky Pahade आणि युनिटच्या इतर काही हवाई योद्ध्यांना जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागात ऑपरेशनल कामासाठी जाण्याचे आदेश मिळाले. ठरल्याप्रमाणे सी. पी. एल. विक्की पहाडे Corporal Vikky Pahade आणि त्यांचे साथीदार ४ मे रोजी दुपारी सुरनकोटला रवाना झाले.
हवाईदलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला
तथापि, दुपारी ३ वाजता, त्यांची गाडी एलओसीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पूंछ जिल्ह्यातील बक्राबल (सनाई) भागात पोहोचली, तेव्हा त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांचा हा हल्ला पूर्वनियोजित होता. या भागाची रेकी करून त्यांनी हा हल्ला केला होता. हल्ल्यात सशस्त्र असलेल्या दहशतवाद्यांच्या गटाने जास्तीत जास्त नुकसान करण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात ग्रेनेड आणि स्वयंचलित शस्त्रांचा वापर केला. हवाई योद्ध्यांना घेऊन जाणाऱ्या हवाई दलाच्या दोन ट्रकवर तीन बाजूंनी गोळीबार करण्यात आला. वाहनांमधील सैनिकांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला, परंतु दहशतवाद्यांनी केलेल्या सुरुवातीच्या गोळीबारात पाच सैनिक जखमी झाले. जखमी सैनिकांना उधमपूर येथील लष्कराच्या कमांड रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सी. पी. एल. विक्की पहाडे Corporal Vikky Pahade उपचारादरम्यान शहीद झाले. सी. पी. एल. विक्की पहाडे हे एक सक्षम हवाई योद्धा होते, वयाच्या ३३ व्या वर्षी आपले कर्तव्य बजावताना त्यांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले. सी. पी. एल. विकी पहाडे यांच्या पश्चात आई श्रीमती दुलारी पहाडे, पत्नी श्रीमती रिना पहाडे आणि मुलगा हार्दिक असा परिवार आहे.
Leave a Reply