Colonel Manpreet Singh

Colonel Manpreet Singh : सेनामेडल विजेते कर्नल मनप्रीत सिंह

१३ सप्टेंबर २०२३ रोजी, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल गावाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आपण सैन्यदलाचे दोन अधिकारी गमावले. १९ आरआर बटालियनचे कमांडिंग ऑफीसर कर्नल मनप्रीत सिंह Colonel Manpreet Singh या कारवाईदरम्यान शहीद झालेत.

सैन्यदलातील सेवेची परंपरा

कर्नल मनप्रीत सिंग Colonel Manpreet Singh हे मूळचे पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील मुल्लानपूरजवळील भरोंजियांचे असून त्यांचा जन्म १९८२ मध्ये अमृतसर येथे परंपरेने सैन्यदलातील सेवा असलेले कुटुंब दिग्गज दिवंगत नाईक लखमीर सिंग आणि श्रीमती मनजीत कौर यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील, आजोबा शीतल सिंग आणि काका रणजीत सिंग यांनीही सैन्यात सेवा केली होती. त्यांना एक भाऊ संदीप सिंग आणि बहीण संदीप कौर आहेत.

बालपण व शालेय शिक्षण

पंजाबमधील एसएएस नगर येथील केंद्रीय विद्यालय मुल्लानपूर येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते एस.डी. कॉलेज चंदीगड येथे गेले, त्यांनी वाणिज्य (B.Com) पदवी घेतली. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी घेऊन काही वर्षे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केले. मात्र बालपणापासून परंपरेने चालत आलेली सैन्यदलात काम करण्याची इच्छा काही स्वस्थ बसू देईना. अखेर २००४ मध्ये कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षा यशस्वीपणे पास करुन देशसेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले.

देशसेवेची सुरुवात

सैन्य प्रशिक्षणासाठी प्रतिष्ठित म्हटल्या जाणाऱ्या आयएमए डेहराडून येथे प्रशिक्षण घेऊन २००५ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी लेफ्टनंट म्हणून उत्तीर्ण झाले. भारतीय सैन्याच्या इन्फंट्री रेजिमेंट, शीख लाइट इन्फंट्री रेजिमेंटच्या १२ शीख एलआय बटालियनमध्ये त्यांना कमिशन मिळाले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही, कठोर परिश्रम आणि अविरत मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतःला एक कठोर सैनिक आणि उत्तम अधिकारी म्हणून विकसित केले. त्यांना फोटोग्राफीचीही आवड होती. त्यांचा कॅमेरा निष्ठावान साथीदाराप्रमाणे सतत त्यांच्यासोबत राहत असे. २०१६ मध्ये सुश्री जगमीत कौरशी त्यांचा विवाह झाला आणि या त्यांच्या जीवनात मुलगा कबीर सिंग आणि मुलगी वाणी यांचा प्रवेश झाला.
२०१९ ते २०२१ या कालावधीत १९ आरआर बटालियनचे सह सेकंड इन कमांड (2IC) म्हणून त्यांनी काम केले आणि नंतर त्यांच्याकडे १९ आरआर बटालियनच्या कमांडिंग ऑफिसर जबाबदारी देण्यात आली. २०२३ पर्यंत, कर्नल मनप्रीत सिंग यांनी सुमारे १७ वर्षे सेवा केली होती आणि विविध आव्हानात्मक ऑपरेशनल क्षेत्रात काम केले होते.

अनंतनागला पोस्टींग

कर्नल मनप्रीत सिंग यांची 19 आरआर बटालियन जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात बंडखोरीविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आली होती. युनिटचे जबाबदारीचे क्षेत्र हे बंडखोरी प्रवण क्षेत्र असल्याने, सैन्याला नेहमीच उच्च पातळीवर सतर्कता ठेवावी लागत असे. कर्नल मनप्रीत सिंग यांनी बटालियनमध्ये सुमारे ५ वर्षांच्या कार्यकाळात अनेक ऑपरेशन्समध्ये भाग घेतला होता आणि ते लेफ्टनंट कर्नल असताना २०२१ मध्ये त्यांना “सेना मेडल” ने सन्मानित करण्यात आले होते.

शेवटचे ऑपरेशन

१३ सप्टेंबर २०२३ रोजी, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल गावाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात काही कट्टर दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल सुरक्षा दलांना गुप्तचर स्त्रोतांकडून माहिती मिळाली. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, १२ सप्टेंबर २०२३ च्या मध्यरात्री 19 आरआर बटालियन आणि जम्मू काश्मीर पोलिसांसह संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले.
१९ आरआरचे कमांडिंग ऑफिसर म्हणून कर्नल मनप्रीत सिंग संयुक्त टीमचे नेतृत्व करत होते. नियोजनानुसार संयुक्त पथक संशयित भागात पोहोचले आणि त्यांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार होऊन होत असतांना कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक आणि १९ आरआरचे सेप प्रदीप सिंग आणि डीएसपी हुमायुम बट्ट हे जखमी झालेत. जखमी अधिकारी व सैनिकांना तातडीने युध्दक्षेत्राच्या बाहेर एअरलिफ्ट करण्यात आले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी श्रीनगरला नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या अधिकाऱ्याचे निधन झाले.

कर्नल मनप्रीत सिंग हे सैनिकप्रिय अधिकारी होते. ऑपरेशन दरम्यान त्यांनी धैर्य, नेतृत्व आणि अत्यंत पराकोटीचा पराक्रम गाजवत वयाच्या ४१ व्या वर्षी देशसेवेत आपले प्राण अर्पण केले. कर्नल मनप्रीत सिंग यांच्या पश्चात त्यांची आई श्रीमती मनजीत कौर, पत्नी श्रीमती जगमीत कौर, मुलगा कबीर सिंग आणि मुलगी वाणी असा परिवार आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *