हिंदी चित्रपटसृष्टीत शून्यातून सुरुवात करुन प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेली अनेक व्यक्तिमत्व आहेत. त्यात कोरस डान्सरपासून सुरुवात करुन, जीवनातील अनेक संघर्षांना तोंड देत श्रीदेवीपासून माधुरी दीक्षित, गोविंदा आणि ऐश्वर्या रायपर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीतील कलावंतांना नृत्याचे धडे देणाऱ्या महान नृत्यदिग्दर्शक सरोज खान Saroj khan यांचा आज दि. २२ नोव्हेंबर जन्मदिवस.
‘हवा हवाई’, ‘नौ नौ चूड़ियां’, ‘एक दो तीन’, ‘धक धक’, ‘चोली के पीछे’, ‘मेरा पिया घर’, ‘डोला रे डोला’ यासारख्या अनेक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या सरोज खान Saroj khan यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी मुंबईत किशनचंद साधू सिंग आणि नोनी सिंग यांच्या कुटुंबात निर्मला नागपाल म्हणून झाला. सरोज यांचे आईवडील फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून स्थलांतरित झाले असल्याने, लहानपणापासूनच कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे सरोज यांचा जन्म होताच जगण्यासाठी संघर्ष काय असतो याची प्रचिती येऊ लागली होती. कुटुंबाचा चरितार्थ चालण्यासाठी कमाविणे गरजेचे असल्याने त्यांनी वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी बालकलाकार म्हणून ‘नजराना’ या सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘नजराना “या चित्रपटात बाळ श्यामा म्हणून आणि’ परछाई मध्ये सरोजा म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. ‘आगोश’ (१९५३) या चित्रपटात त्यांनी राधा आणि बेबी नाझ यांनी कृष्णाची वेशभूषा केली होती.
वयाच्या १० व्या वर्षापासून अनेक चित्रपटातील गाण्यांमध्ये त्यांनी पार्श्वनर्तक म्हणून काम केले. यात प्रामुख्याने ‘मायाबाजार’ (१९५७) ‘कितना बादल गया इंसान’ आणि ‘हावडा ब्रिज’ (१९५८) मधुबाला यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘आईये मेहरबान’ या गाण्यांमध्ये होत्या. ‘चढ गयो पापी बिच्छूवा’ (मधुमति) या गाण्यात मध्ये नृत्य करत असताना, सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्या सरोज Saroj khan यांची प्रतिक्षा लक्षात आली, त्यांनी १२ वर्षाच्या सरोज यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी सरोज यांना आपला नृत्यसहाय्यक म्हणून नियुक्त केले.
सरोज खान Saroj khan यांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार करत ४३ वर्षीय नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्यासोबत लग्न केले होते. सरोज यांच्यापेक्षा वयाने 30 वर्षे मोठे असलेल्या सोहनलाल यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांना पहिल्या लग्नापासून चार मुले होती. वयाच्या १३ वर्षी शाळेत जाण्याच्या वयात सरोज यांना लग्नाचा अर्थसुद्धा समजत नव्हता. एकेदिवशी त्यांचे नृत्यदिग्दर्शक सोहनलाल यांनी त्यांच्या गळ्यात काळा धागा बांधला आणि हा काळा धागा बांधल्यामुळे लग्न झाल्याचे सरोज यांना वाटले होते. त्यावेळी सोहनलाल विवाहित असून चार मुलांचे वडील असल्याचे सरोज यांना ठाऊक नव्हते. सरोज यांना सोहनलाल यांच्या पहिल्या पत्नीविषयी १९६३ मध्ये समजले होते. त्याचवर्षी सरोज यांच्या मुलाचा (राजू खान) जन्म झाला होता. १८६५ मध्ये सरोज खान यांनी सोहनलाल यांच्या दुस-या बाळाला जन्म दिला. मात्र बाळाचा ८ महिन्यांत मृत्यू झाला होता. त्यावेळी त्या १८ वर्षांच्याही नव्हत्या. यादरम्यान सोहनलाल यांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि मुलांना आपले नावही दिले नाही. तेव्हा सरोज त्यांच्यापासून विभक्त झाल्या. काही वर्षांनंतर सोहनलाल यांना हृद्यविकाराचा झटका आला. त्यांच्या आजारपणात सरोज पुन्हा त्यांच्या आयुष्यात परतल्या. याकाळात सरोज यांनी मुलीला जन्म दिला. मात्र मुलीच्या जन्मानंतर पुन्हा एकदा सोहनलाल आणि सरोज यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाले आणि सरोज यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे संगोपन एकटीने केले. कुटुंब चालविण्यासाठी नृत्यदिग्दर्शन करु लागल्या.
पण नृत्यदिग्दर्शन करणे सोपे नव्हते. त्याकाळात सर्व चित्रपटांना पुरुष नृत्यदिग्दर्शक असत. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज निर्माते एका मुलीला नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी देण्यास तयार नव्हते. मात्र पी.एल.संतोषी यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ‘दिल ही तो है’ (१९६३) या चित्रपटात अभिनेत्री नूतन यांच्यावर चित्रीत झालेल्या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन करण्याची जबाबदारी दिली. १९६० चे दशक सरोज खान यांचा वैयक्तिक व व्यावसायिक संघर्षाचा काळ होता. या काळा त्यांनी ‘फूल और पत्थर’, ‘तीसरी मंजिल’, ‘साजन’, ‘दो अंजने’, ‘धर्मात्मा’ या चित्रपटांना पी.एल.राज यांच्यासोबत सहाय्यक नृत्यदिग्दर्शन केले. सोबत पार्श्वनर्तक म्हणूनही काम करत होत्या. साधना यांच्यावर चित्रीत झालेल्या झुमका गिरा रे या गाण्यातही त्या पार्श्वनर्तक म्हणून प्रामुख्याने दिसतात. पी. एल. राज यांना सहाय्यक म्हणून इन्तकाम’ (१९६९) या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शनानंतर पी.एल. राज यांनी त्यांनी स्वतंत्ररित्या नृत्यदिग्दर्शनाची संधी द्यायचे ठरवले. साधना यांच्या ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाच्या नृत्यदिग्दर्शक म्हणून सरोज यांचे नाव रुपेरी पडद्यावर झळकले. त्यानंतर सरोज यांनी ‘जमीर’ (१९७५), ‘प्रतिज्ञा’ (१९७७) आणि ‘आनंद आश्रम’ (१९७७) या चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले.
यात काळात त्यांची भेट सरदार रोशन खान यांच्याशी झाली. अल्पावधीत ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर विवाहात झाले. रोशन खान यांनी सरोज यांच्या विवाह करण्यासोबत त्यांच्या दोन अपत्यांनाही स्वीकारले. मुलाचे नाव राजू खान आणि मुलीचे कुक्को खान ठेवले. १९७७ मध्ये त्या रोशनखान यांच्यासोबत दुबईला स्थायिक झाल्या. दुबईला त्यांची दुसरी मुलगी सुकैना यांचा जन्म झाला. सुकैना खान आता दुबईत डान्स इन्स्टिट्युट चालवते. १९८० मध्ये त्या भारतात परतल्या आणि जरीना वहाब यांच्या विनंतीवरून तिने ‘जज्बात’ (१९८०) या चित्रपटातील ‘गोरिया रे’ या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले. त्यानंतर ‘विधाता’ (१९८२) ‘हिरो’ (१९८३) ‘लावा’ (१९८५) ‘जानू’ (१९८५) आणि ‘आवारा बाप’ (१९८५), ‘नगीना’ (१९८६), ‘कर्मा’ (१९८६) आणि ‘मिस्टर इंडिया’ (१९८७) अशा नृत्यदिग्दर्शनाचा एकामागोमाग एक ऑफर येत गेल्या. त्यादरम्यान ‘मैं तेरा दुश्मन’, ‘आये मोहब्बत तेरी दास्तान’ आणि ‘हवा हवाई’ यासारख्या गाण्यांना श्रीदेवी ला नृत्यदिग्दर्शन करण्यासोबत सरोज यांचा नावलौकिक वाढत होता. नंतर श्रीदेवीला त्यांनी अनेक चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले. यात चांदनी (१९८९), चालबाज (१९८९), निगाहः नगीना पार्ट २ (१९८९), लम्हे (१९९१), बंजारन (१९९१), हीर रांझा (१९९२) या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.
श्रीदेवीसोबतच नुकत्याच उदयास आलेल्या माधुरी दीक्षित या अभिनेत्रीच्या गाण्यांनी सरोज यांना प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचवले. माधुरी दीक्षितला ‘एक दो तीन’ (तेजाब, १९८८) प्रथम नृत्यदिग्दर्शन केले यानंतर “ओ राम जी, बडा दुख दिनहा (राम लखन, १९८९), “तम्मा तम्मा (थानेदार, १९९०),”हमको आज कल है (सैलाब,१९९०)”, ” धक धक करने लगा (बेटा, १९९२), चोली के पीछे (खलनायक, १९९३), चने के खेत में (अंजाम, १९९४), अंखियां मिलावू, कभी अखियां चुराऊ (राजा, १९९५), मेरा पिया घर आया (याराना, १९९५), डोला रे (देवदास, २००२), तबाह हो गए (कलंक,२०१९) या लोकप्रिय गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांचेच होते.
त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलेली गाणी लोकप्रिय होण्यामागे सरोज खान Saroj khan यांच्या नृत्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे त्या केवळ गाण्याला नृत्यदिग्दर्शन करत नाही तर त्यातून व्यक्त होणाऱ्या अभिव्यक्ती व अभिनयाकडेही त्या बारकाईने लक्ष देत असत. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना केलेल्या नृत्यदिग्दर्शनातून हे प्रकर्षाने जाणवते. यामुळेच की काय हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंत सरोज यांना मास्टरजी या नावाने ओळखू लागले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत सरोज खान यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांसाठी, दोन हजारांपेक्षा जास्त गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. यात जानबाझ (१९८६), डकैत (१९८७), हिफाजत (१९८७), आखरी अदालत (१९९०), बीबी हो तो ऐसी (१९८८), दयावान (१९८८), त्रिदेव (१९८९), खोज (१९८९), आवारगी (१९९०), विश्वात्मा (१९९२), आयना (१९९३), अनमोल (१९९३), मोहरा (१९९४), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५), खामोशी – द म्युझिकल (१९९६), इरुवर (तामिळ, १९९७), परदेस (१९९७), और प्यार हो गया (१९९७), सोल्जर (१९९८), ताल (१९९९), हम दिल दे चुके सनम (१९९९), फिजा (२०००), लगान (२००१), साथिया (२००२), कुछ ना कहो (२००४), स्वदेश (२००४), वीरजारा (२००४), मंगल पांडे – द रायझिंग (२००५), सावरिया (२००७), गुरु (२००७), नमस्ते लंडन (२००७), जब वुई मेट (२००७), दिल्ली ६ (२००९), लव आज कल (२००९), एजंट विनोद (२०१२), रावडी राठोड (२०१२), एबीसीडी – एनीबडी कॅन डान्स (२०१२), गुलाब गँग (२०१४), तनू वेडस मनू रिर्टन (२०१५), मनकर्णिया – द क्वीन ऑफ झाशी (२०१९) या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.
‘डोला रे डोला (देवदास, २००३), शृंगारम (२००६) आणि ‘जब वी मेट (२००८) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचे तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले असून, ‘एक दो तीन (तेजाब, १९८९), ‘ना जाने कहां से’ (चालबाज, १९९०), ‘हमको आज कल है इंतजार’ (सैलाब, १९९१), ‘धक धक करने लगा’ (बेटा, १९९३), ‘चोली के पीछे’ (खलनायक, १९९४), ‘निंबूडा निंबूडा’ (हम दिल दे चुके सनम, २०००), ‘डोला रे डोला, (देवदास, २००३), बरसो रे (गुरु, २००८) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक म्हणून आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
याशिवाय सरोज खान या नच बलिए, झलक दिखला जा आणि उस्तादों का उस्ताद यासारख्या रिअॅलिटी डान्स शोमध्ये परिक्षक म्हणूनही होत्या. एन. डी. टी. व्ही. इमॅजिनवरील ‘नचले वे विथ सरोज खान’ (२००८) या शो मध्ये त्या नृत्यगुरू होत्या. सरोज खान यांनी त्यांच्या कारकिर्दीतील नृत्यदिग्दर्शन केलेले शेवटचे गाणे करण जोहर यांच्या ‘कलंक’ चित्रपटातील ‘तबाह हो गये’ हे होते. या गाण्यात त्यांचा आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित थिरकली होती.
४ दशकात साधना, वैजयंतीमाला, कुमकुम, हेलन, शर्मिला टागोर, माला सिन्हा, वहीदा रहमान, झीनत अमानपासून ते रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि सनी लिओनी या अभिनेत्रींना सरोज खान यांनी नृत्याचे धडे देणाऱ्या नृत्यगुरु सरोज खान यांनी ३ जुलै २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाच्या रंगमंचावरुन अचानक एक्झिट घेतली. पण त्यांच्या नृत्यदिग्दर्शनाने बहरलेल्या अनेक गाण्यातून, त्यांनी प्रशिक्षीत केलेल्या अनेक नर्तक, नृत्यदिग्दर्शकांच्या कार्यातून त्यांचा संस्मरणीय वारसा आजही जिवंत आहे.
– yogesh shukla 9657701792
Leave a Reply