amjad ali khan

amjad ali khan – प्रतिष्ठित सरोदवादक अमजद अली खान

आज ९ ऑक्टोबर प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान amjad ali khan यांचा वाढदिवस. सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून ‘स्थलांतरित’ होत होत हे वाद्य अमजद अलींच्या ‘बंगश’ घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे.

बालपण
ग्वाल्हेर येथे अमजद अली खान amjad ali khan यांचा जन्म झाला आणि शालेय शिक्षणही; मासूम अली खान उर्फ अमजद अली खान यांना आपली सुरवातीची तालीम वडिलांकडून मिळाली. त्यांचे वडील उस्ताद हाफ़िज़ अली खान हे ग्वाल्हेर राज-दरबार मध्ये प्रतिष्ठित संगीतज्ञ होते. वडिलांकडून मिळालेल्या पक्क्या तालिमीला डोळस रियाझाची जोड दिल्यानेच आत्ममग्न, स्वतःशीच संवाद साधणारं असं अमजद अलींचं आगळंवेगळं सांगीतिक व्यक्तिमत्व घडत गेलं आहे. सरोद वादनातल्या तांत्रिक गोष्टींबरोबर आपल्या वडिलांकडूनच कलेतली ‘अंतर्मुखता’ त्यांना परंपरेनेच मिळाली. सरोद हातात घेतल्यावर ते फार कमी वेळा आपल्या श्रोतृवर्गाकडे आवर्जुन लक्ष देताना दिसतात. आपल्या वादनात ते इतके तल्लीन होउन जातात, की एकदा डोळे मिटून घेतल्यावर भर मैफिलीत सभागृहाच्या आत-बाहेर करणाऱ्यात ‘असुरांची’ चाहूलही त्यांना सहजी अस्वस्थ करू शकत नाही. श्रोत्यांकडे वारंवार बघून मैफिल रंगते आहे की नाही अशी ‘चाचपणी’ करतानाही ते फारसे दिसत नाहीत. एखाद्या सृजनशील व्यक्तीला आपल्याच कलाकृतीकडे तिची निर्मीती सुरू असताना तटस्थपणे पाहता येण्यासाठी लागतो तो ‘स्थितप्रज्ञ’ भाव त्यांच्याकडे सहजच आला आहे हे लक्षात येते.

वैयक्तिक जीवन
अमजद अलींच्या पत्नी शुभलक्ष्मी यांचे साहचर्य लाभणे ही त्यांच्या सांगितीक जीवनातली एक खूप मोठी जमेची बाजू आहे. उस्तादजींचे ते एक सुप्त बलस्थानच आहे. शुभलक्ष्मी या मूळच्या आसामच्या, पण वृत्तीने मात्र पूर्णपणे दक्षिण भारतीय! आपल्या दोन मुलांचं यथास्थित संगोपन करण्यासाठी शुभलक्ष्मीजींनी आपल्या यशस्वी कारकिर्दीवर भर उमेदीच्या काळात पाणी सोडलं. आज ही दोन्ही मुलं यशस्वीरीत्या आपली उज्वल परंपरा पुढे नेताना दिसतात. अमान अली आणि अयान अली ‘बंगश’ जगभर आपल्या वडिलांच्या जोडीने तसेच आपसातल्या जुगलबंदीच्या सरोद वादनाच्या मैफिली अक्षरशः गाजवतात. या त्रयीने सरोदच्या तारा छेडताच त्या वाद्यातून उमटणारा वेगळाच गाज, सुरांचे माधुर्य आणि ‘बंगश’ घराण्याची राजमुद्रा भाळी घेउन आलेला शैलीदार नाद चटकन ओळखता येतो. श्रोत्यांच्या मनावर तो कायमची छापही सोडून जातो. या मुलांच्या वादनातून हे सहज सिद्ध होतं की उ. हफीज अलींचं घराणं काळाच्या कसोटीवर निर्विवादपणे उतरलेलं आहे.
सच्चं, सुरेल आणि पराकोटीचं सृजनशील जीवन जगण्यासाठी लागणारी आई सरस्वतीच्या कृपेची शिदोरी अमजद अलींनी आपल्या मुलांना दिलेली आहे. हाडाचे कलावंत असलेले वडिल आपल्या मुलांना यापेक्षा वेगळे आणखी काय देउ शकतात? आपली विद्या अमान आणि अयानच्या हाती सुपूर्त करून, घराण्याची परंपरा अखंड ठेउन अमजद अलींनी आपलं गीत, संगीत ‘अमर’ केलेलं आहे. सरोद वादनाच्या क्षेत्रात आणि एकंदरच हिंदुस्थानी अभिजात संगीतातल्या वाद्यसंगीताच्या महान परंपरेत त्यांचं स्वत:चं अढळ असं ध्रुवपदच त्यामुळे निर्माण झालं आहे.

सन्मान
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सरोदवादनाने भारतातीलच नव्हे, तर जगभरातील संगीतरसिकांवर ख्यातनाम सरोदवादक अमजद अली खान यांनी मोहिनी घातली आहे. म्हणून तर सरोद आणि अमजद अली खान हे समानार्थी शब्द बनले आहेत. मनात उमटेल त्या प्रमाणे वाद्य ‘गायला’ लागावं यासाठी स्वतः अमजद अलीं खान यांनीही या वाद्यात बरेच तांत्रिक बदल केलेले आहेत.भारतासह विदेशातही त्यांनी संगीत मैफिली केल्या असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अमजद अली खान यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *