आज ५ एप्रिल चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न अभिनेत्री दिव्या भारतीचा DivyaBharati स्मृतिदिवस.
दिव्या भारतीने वयाच्या अवघ्य़ा १९ वर्षीच तिनं सर्वांची मनं जिंकली होती. विश्वात्मा हा हिंदीतला तिचा पहिला सिने राजीव राय यांनी तिला या चित्रपटातून हिंदीत ब्रेक दिला. यातलं “सात समंदर पार तेरे ” या दिव्यावर चित्रित केलेल्या गाण्यानं तर धमालच केली होती. त्यानंतर शोला और शबनमनं तिच्या विजयात आणखी भर घातली. दिव्या आणि गोविंदा जोडी झाली होती. तर शाहरुख खान ऋषी कपूरबरोबरच दिवानानं तर तीनं सर्व अभिनेत्रींना मागं टाकलं. शाहरुख खान बरोबरच्या या चित्रपटानं तिला यश तर दिलच पण त्यावेळी ती सर्वात मोठी स्टारही झाली होती.
दिवानानंतर दिव्याचं मानधन २५ लाखांवर गेलं होतं असं सांगितलं जातं. म्हणजे त्यावेळी टॉपवर असलेल्या श्रीदेवी, माधुरी यांच्यापेक्षा जास्त मानधन ती घेऊ लागली. त्यातच दिवानाची गाणी आणि चित्रपटानं सगळ्यांच्या ह्रदयाचा गेमच केला होता. कॉलेजमधली तरुणाई तर “ऐसी दिवानगी देखी नही कही..” या शाहरुख आणि दिव्याच्या गाण्यावर फिदा झाली होती..शाहरुख आणि दिव्या DivyaBharati हीच चर्चा त्यावेळी होत होती. दिवाना रिलीज झाला ते वर्ष होतं १९९२ त्यावर्षी सगळीकडं दिव्याचा बोलबाला होता..दिव्यानं हिंदीत जवळपास १३-१४ चित्रपट केले. त्यातले काही सुपर डुपर हिट झाले तर काही जेमतेम चालले..पण तीनं त्यावेळच्या सर्व प्रस्थापित अभिनेत्रींना धक्का दिला होता.
हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर दिव्यानं तेलुगु चित्रपटातून आपलं करिअर सुरु केलं होतं. तेलुगुतले प्रसिद्ध निर्माता डी रामानायडू यांनी मुलगा व्यंकटेश याच्याबरोबरच्या “बोब्बीली राजा ” या चित्रपटातून हिरोईन म्हणून दिव्याला पुढं आणलं. दिव्याचा अभिनेत्री म्हणून पहिलाच सिनेमा हिट झाला आणि बघता बघता तिनं तेलुगु चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केलं. त्यावेळी तेलुगुतली यशस्वी अभिनेत्री विजयाशांती हिच्या नंबर एकच्या स्थानाला तिनं आव्हान दिलं होतं. त्यानंतर तिचा प्रवास हिंदीत झाला.. पण बोब्बीला राजा च्या अगोदर दिव्यालाही मोठ्या दिव्यातून जावं लागलंय. तिचा चित्रपटसृष्टीतला प्रवेशच खूप त्रासदायक झालाय. वयाच्या अवघ्या १४ वर्षी तीला चित्रपटासाठी विचारण्यात येत होतं. त्यावेळची सुपरस्टार श्रीदेवी हिच्या चेह-याशी थोडीफार मिळती जुळती असल्यामुळे तिला मागणी होत होती. नंदू तोराणीनं तिला गुनाहों का देवता साठी विचारलं होतं. त्यानंतर गोविंदाचा भाऊ किर्तीकुमार यानं दिव्याला घेऊन राधा का संगम करण्याचं ठरवलं…पण काही दिवसाच्या शुटींगनंतर दिव्याला तो सिनेमा सोडावा लागला. त्यानंतर सुभाष घई यांनी दिव्याला सौदागरमध्ये अमिर खानबरोबर घेतलं होते. पण तिथंही माशी शिंकली आणि सुरवातीचं काही शुट झाल्यानंतर दिव्याला काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तिला शेखर कपूर, शबनम कपूर, यांनीही विचारणा केली होती..पण तिचा कोणताच चित्रपट सुरु होत नव्हता. मुंबईत आपली डाळ शिजत नाही असं समजल्यानंतर तीनं हैदराबाद गाठलं. तोपर्यंत तिला शाळा अर्धवटच सोडावी लागली होती. त्यामुळे पुन्हा शाळेत जाणं शक्य नव्हतं. त्याचवेळी तिला डी. रामानायडूंचा बोब्बीली राजा मिळाला आणि तिचं नशिब बदललं. बोब्बीली राजा नंतर तिला विश्वात्मा मिळाला आणि त्यानंतर दिव्या भारती DivyaBharati हिंदीत पुन्हा झोकात आणि धडाकेबाज यश मिळवत आली..
शोला आणि शबनम पासून झालेली निर्माता साजिद नाडियाडवालाशी ओळख हळू हळू प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साजिदशी लग्न करण्याकरिता दिव्याने मुस्लिम धर्म स्वीकारला आणि 10 मे 1992 ला त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर एकाच वर्षात 5 एप्रिल 1993 ला दिव्याचा वर्सोवातील तुलसी भवन अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. आजही तिचा मृत्यूचे रहस्य कायम आहे. आत्महत्या, हत्या की अपघात या चक्रव्यूहात अडकलेल्या या घटनेची अनेक वर्ष तपासणी सुरु होती. अखेरीस 1998 ला मुंबई पोलिसांनी अकस्मात मृत्यू असे कारण देवून ही फाईल बंद केली.
Leave a Reply