जंजिरा

Janjira Fort – अजिंक्य ठरलेला जलदुर्ग – जंजिरा

जंजीरा चा अर्थच मुळी समुद्राने वेढलेला किल्ला, तसा जंजीरा आपल्या स्वराज्या साठी अजेय राहिला. मुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला Janjira Fort राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर बांधलेला आहे. भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. या तोफां मध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती.

जंजिरा Janjira Fort स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता, कदाचित हा शासक जंजिऱ्याचा जनक असला पाहिजे. यादव राज्य बुडून सुलतानी राज्य आल्या नंतर पण सन १४९० पर्यंत हा किल्ला स्वतंत्र होता, १४८५ मध्ये जुन्नरच्या मलिक अहमद ने जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोळ्यांचा नेता होता रामभाऊ कोळी. अभेद्य किल्ला आणि रामभाऊचा पराक्रम ह्या पुढे मलिक ने हात टेकले. ह्या घटनेच्या चार वर्षा नंतर एक व्यापारी जहाज जंजिऱ्याच्या तटाला लागले. पेरीमखान नावाचा व्यापारी व त्याच्या सिद्दी नोकरांनी सुरतेहून आल्याची बतावणी केली व आसरा मागितला. एतबारराव ह्या किल्लेदाराने मंजुरी देताच पेरीमखानाच्या मालाचे पेटारे किल्ल्यामध्ये आले. रात्री त्या पेटाऱ्यांतून ११६ हत्यारबंद लोक बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी झाली, किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या अंमलाखाली आला (१४९०). निजामशहाने किल्ल्याची जबाबदारी सिद्दी सरदारांकडे सोपवली व किल्ल्याचे नामकरण ‘जंजिरे मेहरूब’ असे केले.

सर्वप्रथम १४ ऑगस्ट १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या हाती जंजिऱ्याची मोहीम दिली होती पण त्या स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेत अपयश हाती आले. मे १६६९ ला महाराजांनी स्वतः मोहीम आखली. पायदळाने दंडा -राजपुरी वर व जंजिऱ्या वर नौदलाने स्वारी करून जंजिऱ्याची कोंडी करायची असा बेत होता. जंजिऱ्याचा सिद्दी होता फत्तेखान व त्याच्या हाताखाली संबूल, कासीम व खैर्यत हे सेनानी होते. फत्तेखान स्वतः दंडा-राजपुरीत होता. त्याच्या अमलांतील प्रदेशात इतर सात किल्ले होते. स्वराज्याचे आरमार जंजिऱ्याला उभे ठाकले. जंजिऱ्याचे पूर्ण बळ खर्ची पडत होते. पायदळाने एका मागोमाग एक असे फत्तेखानाचे सातही किल्ले काबीज करून दंडा-राजपुरी कडे वळाले होते. मराठी आरमारापुढे जंजिऱ्याची कलाल बांगडी तोफ लंगडी पडली. दंडा-राजपुरी काबीज झाल्या मुळे जंजिऱ्याची सर्व बाजूंनी कोंडी झाली होती. फत्तेखानाने मुंबईकर इंग्रजांना मदती साठी पत्र लिहिले, पण सुरतेच्या वरिष्ठ इंग्रजांनी महाराजां विरुद्ध पाऊल उचलण्या पेक्षा तटस्थ राहण्याचा सल्ला मुंबईकर इंग्रजांना दिला. (जून १६६९)

सिद्दीने मोगलांकडे आर्जव केले, त्या नुसार वेढा उठवण्याची आज्ञा महाराजांना झाली. पुरंदरचा वेढा, तह, महाराजांची आग्रा भेट व तिथले पलायन ह्याला फार वेळ झाला नव्हता. तहातले गेलेले किल्ले मिळवून स्वराज्याची घडी नीट बसवे पर्यंत महाराजांना मोगलांचे अंकित असल्याचे नाटक वठवायचे होते. तरीही ती आज्ञा दुर्लक्षीत करून महाराजांनी वेढा अजून बळकट केला. महाराजांनी फत्तेखानाची झालेली कोंडी ओळखली होती, त्यांचा मुक्काम पेण जवळ होता (नोव्हेंबर १६६९). त्यांनी फत्तेखानाला सन्मानाने कळविले की, जंजिरा आमच्या स्वाधीन करा त्या बदल्यात आम्ही तुम्हाला भरपाई म्हणून मोठी रक्कम देऊ व स्वराज्यात योग्य असा मान देखील बहाल करू. जर्जर सिद्दी ह्यास कबूल झाला पण इतर सेनानी हे पाहून उसळले. त्यांनि फत्तेखानाला तुरुंगात डांबले व जंजिरा ताब्यात घेतला. सिद्दी संबूल हा जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी झाला व सिद्दी कासिम आणि सिद्दी खैर्यत हे अनुक्रमे जंजिऱ्याचे किल्लेदार व हवालदार बनले. विजापूरच्या दरबाराचे अंकित झुगारून त्यांनी औरंगजेबाकडे अर्ज केला. औरंगजेबाची आरमारी ताकद ह्या मुळे वाढली, त्याने सिद्दीच्या गादीला असलेला ‘वजीर’ हा किताब रद्द करून नवीन ‘याकूतखान’ हा किताब दिला व तिघांनाही मनसब, जहागीरदारी आणि सुरतेहून गलबतांचा काफिला दिला (डिसेंबर १६६९).

२२ एकर जागेमध्ये बांधलेल्या जंजीऱयाचे बांधकाम दगड, शिसं आणि चुना वापरून केलेले आहे. याचा मुख्य दरवाजा अतिशय भव्य आहे. या दरवाज्यावर हत्तींच्या पाठीवर पंजे रोवून असणाऱ्या सिंहाचे चिन्ह आहे. यातून आपण आत प्रवेश करताना आपल्याला किल्ल्याच्या मजबुतीचा कल्पना येऊ शकते. मुख्य दरवाजावर समुद्राच्या भरतीच्या खुणा पाहिल्या तर पाणी कुठपर्यंत येते हे सहज कळते. या किल्लाच्या सुरूवातीलाच एक कबर असून ती पहिल्या सिद्दीची आहे असं सांगण्यात येतं. या किल्ल्याला एकुण १९ बुरूज असून हे बुरूज अजुनही सुस्थितीत आहेत. प्रत्येक बुरूज तोफांनी सुसज्ज असे. किल्ल्याच्या खालच्या भागात असणाऱया खिडक्यांतून समुद्रावर नजर ठेवली जाई. याच ठिकाणी दारूगोळा भरून ठेवलेला असे. या किल्ल्यावर सिद्दींच्या प्रसिद्ध अशा तीन तोफा आहेत. एक म्हणजे कलाल बांगडी, दुसरी चावरी आणि तिसरी म्हणजे लांडा कासम.

या किल्ल्यावर गोड्या पाण्याचा एक मोठा तलाव आहे. तसेच शत्रुचा न झेलता येणारा हल्ला झाला तर सुरक्षित निसटता यावे यासाठी राजापुरी पर्यंत भुयारी मार्ग हा काढला होता. हा मार्ग अर्थातच आता बंद आहे. या किल्ल्यावर पुर्वी सर्व सोयी उपलब्ध होत्या. याचा दुसरा दरवाजा समुद्राच्या बाजूने उघडतो ज्याला दर्या दरवाजा असं नाव आहे.

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी तब्बल आठ वेळा प्रयत्न करूनही हा किल्ला त्यांना जिंकता आला नाही. संभाजी महाराजांनी तर किल्ल्यापर्यंत मार्ग बांधण्याचा पण प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना किल्ला जिंकण्यात अपयश आले. हा किल्ला अजिंक्य राहण्याचे एक कारण असे सांगितले जाते की ह्या किल्ल्याची पायाभरणी अतिशय शुभ मुहुर्तावर केली गेली होती. जंजीऱ्याला शह देण्यासाठी त्यापासून थोड्या दुर समुद्रात छत्रपतींनी नंतर पद्मदुर्ग हा जलदुर्ग बांधला. जंजीऱयाच्या बुरूजावरून आपण तो पाहू शकतो. जंजीऱयाजवळच गावामध्ये सिद्दीच्या नबाबांचा राजवाडा आहे. मात्र आत जाण्याची परवानगी नाही.

जंजिर्‍यावरील १६६९ च्या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता. १६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.

जंजिऱ्या च्या पलीकडे असलेल्या बेटावर महाराजांनी पद्मदुर्ग वसविण्याचे दिव्य सुरु केले, किल्ल्याचा बांधकामात मोठा अडसर होता तो जंजिऱ्या वरून होणाऱ्या तोफेच्या वर्षावाचा. तरीही नेटाने काम चालू होते. दरम्यान महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम चालू केली, आरमाराचे बळ वाढविले. सिद्दीने वेंगुर्ल्यावर स्वारी करून वेंगुर्ले जाळले. मराठी आरमाराने राजापुराहून व विजयदुर्गापासून सिद्दीचा पाठलाग केला पण तो निसटून जंजिऱ्यास पोहोचला. जंजिऱ्याला मराठी आरमाराचा वेढा पडला, जंजिऱ्याच्या तटावर मराठी तोफा आग ओकू लागल्या. मोठमोठ्या तरफांवर तोफा चढवलेल्या होत्या आणि त्या तराफा जंजिऱ्याच्या सभोवती तरंगत तरत्या तोफखान्याचे काम करत होत्या. सिद्दि संबूळ जो ह्या वेढाच्या वेळेस वेंगुर्ल्याच्या बाजूस गेला होता तो आपल्या आरमारासह परतला पण मुसंडी देऊन त्याने हा वेढा मोडून काढला.

ऑगस्ट १६७६, मोरोपंत यांनी जंजिऱ्याची मोहीम आखली. ह्या वेळी सिद्दी कासीम हा सुरतेहून जंजिऱ्याकडे आरमारासह परतत होता. जंजिऱ्यावर मराठ्यांच्या तोफा पुन्हा कडाडू लागल्या. होड्या-मचव्यावर बांधलेल्या तोफांचा गराडा जंजिऱ्याला पडला. जंजिऱ्याचा तट अजस्र होता, तोफ गोळ्यांचा काही एक परिणाम होत नव्हता. मोरोपंत प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला, जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून चढायचे व सिद्दीची फौज कापावी. विचार अगदी घातकी होता पण अजून उपाय तरी काय होता. तरीही बरेच प्रश्न पुढ्यात होते. तटावर शिड्या कश्या लावायच्या? कुणी लावायच्या? तटाखालच्या समुद्राचे काय? तटावरच्या बंदोबस्तात शिड्या आणि माणसे कसे पोहोचवायचे? लाय पाटील ह्याने हा मनसुबा,ही जबाबदारी स्वतः वर घेतली. लाय पाटील ह्याने तटावर शिड्या लावून द्यायच्या व मोरोपंतांनी हजार बाराशेची फौज तटावर चढवायची अशी योजना होती. मध्यरात्री नंतर लाय पाटील आपल्या साथीदारां बरोबर लहान होड्यां मधून शिड्या घेऊन गेला. तटावरच्या पहारेकऱ्यांना चुकवत अलगद जंजिऱ्याच्या तटाजवळ ते पोहोचले. अंधारात आवाज होता तो केवळ तटाला भिडणाऱ्या समुद्राच्या लाटांचा. लाय पाटील अत्यंत अधीरतेने वाट पाहत होता मोरोपंतांच्या तुकडीचा. वेळ भरभर पळत होता आणि इथे मोरोपंतांचा पत्ता नव्हता. कधी तटावरील गस्तकऱ्यांना चाहूल लागेल आणि फटाफट गोळ्या सुटतील ह्याचा नेम नव्हता. अशक्य कोटीतली कामगिरी तर लाय पाटलाने निभावली होती, पण पंतांचा पत्ता नव्हता. पहाटेची वेळ आली, शिड्यांची चाहूल लागली असती तर गस्तकरी सावध झाले असतेच पण हा बेत परत कधीही यशस्वी झाला नसता. हताश होत लाय पाटील आणि त्याचे साथीदार शिड्या काढून झपाट्याने परत निघून आला. नेमका काय घोटाळा झाला? कोणाची चूक होती? हे केवळ इतिहासालाच माहीत. मोरोपंतांनी ह्या मोहिमेच्या अपयश स्वतः स्वीकारले. महाराजांना ही घटना कळताच त्यांनी लाय पाटलाचा सन्मान करण्यास त्याला बोलावले व त्यास पालखीचा बहुमान देऊ केला. पण त्या स्वराज्याच्या इमानी सेवकाने नम्रपणे तो बहुमान नाकारला. हे पाहून कौतुकाने महाराजांनी लाय पाटलासाठी गलबत बांधण्याचे फर्मान सोडले व त्यास “पालखी” असे नाव दिले. एका दर्यावीराचा यथोचित सत्कार महाराजांनीच करावा. थोरल्या महाराजांनंतर शंभू महाराजांनी देखिल १६८२ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता.

असा हा अजेय जंजिरा, सिद्दि मुहमंदखान हा शेवटच्या सिद्दी असताना २० सिद्दी सत्ताधीश व त्याच्या राज्याच्या ३३० वर्षांनी ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.