‘पद्मदुर्ग माहीत आहे का ??’
‘नाही’
‘जंजिरा ??’
‘हो तर.. अजिंक्य राहीलेला किल्ला ना.. शिवाजी राजेंना पण तो किल्ला जिंकता आला नव्हता..’
‘गेला आहेस कधी ?’
‘हो’
‘मग त्या किल्ल्यावरुन समुद्रात दुर बेटावर अजुन एक किल्ला दिसतो तो पद्मदुर्ग’ Padmadurg fort
‘ अरे हा.. तो छोटा किल्ला… आलं लक्षात.. पण तिथे तर पाहण्यासारख काहीच नाहीये अस गाइड सांगत होता..!!’
‘तो कोणी बांधला आहे माहित आहे का ?’
‘नाही.. पण जंजिरा सिद्दीने बांधलाय हे नक्की’
आणि अश्या प्रकारे अजिंक्य अशी ओळख असलेला ‘जंजिरा’ अजुनही अजिंक्यच राहीलाय.. अलिबागला कुठला किल्ला तर सगळ्यांना ‘जंजिरा’ हे नाव परिचित.. पण खुद्द शिवाजी महाराजांनी बांधलेला ‘पद्मदुर्ग’ मात्र दुर्लक्षित.. ! अजिंक्य अश्या “जंजिऱ्या” शेजारी किल्ला बांधणे हा विचारच किती मोठा आणि धाडसी आहे.
मुरुडचा ‘जंजिरा’ हा सुट्टीमध्ये पर्यटकांची प्रचंड वर्दळ असणारा किल्ला.. या किल्ल्यावर गाईडची देखील सोय केली जाते नि मग या अवाढव्य किल्ल्यापैंकी मोजकाच भाग दाखवणार्या गाईडचे शब्द अंतिम मानून तो जे काय म्हणेल ते सत्य समजायचे.. ! त्या काळात सिद्दीने इंग्रजांच्या मदतीवर समुद्रात स्वतःची हद्द बनवून घेतलेली..आता तीच परंपरा हे गाईड फक्त जंजिर्याचे गोडवे गाउन चालू ठेवतात… मग पर्यटकदेखील हाच तो मराठ्यांना अगदी शिवाजी महाराजांना जिंकता न आलेला ‘जंजिरा’ पाहिल्याचा अभिमान बाळगतात.. !! पण याच जंजिर्याच्या सिद्दीला वचक बसावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात बांधलेल्या कांसा म्हणजेच पद्मदुर्गाकडे Padmadurg fort मात्र आपण सर्रास दुर्लक्ष करतो. आज त्याच किल्ल्याविषयी माहिती…
रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कांसा ऊर्फ पद्मदुर्ग हा सागरी दुर्ग राजपुरी खाडीच्या मुखाजवळ जंजि-यापासून तीन कि.मी. वायव्येस आहे. मुरूड येथील जंजिरा किल्ल्यावर सतत नजर ठेवता यावी या हेतूने जंजि-याच्या पश्चिमेस ऐन समुद्रात एका लहानग्या बेटावर शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग उभारला. उत्फुल्ल कमळासारखा आकार असल्यामुळे शिवरायांनी या दुर्गाचे नाव ‘पद्मदुर्ग’ असे ठेवले. Padmadurg fort
जंजि-याचे सीदी अत्यंत क्रूर व धर्माध होते. ते हिंदू जनतेवर सर्वच प्रकारचे अत्याचार करीत. इ.स. १६५५ नंतर अधिकारावर आलेल्या फतहखानाच्या कारकिर्दीत कांसा किल्ल्यावर मोरोबा सबनीस नावाचा गृहस्थ राहात होता. श्रावण महिन्यात जीवतीचे चित्र आणून पूजेसाठी भिंतीवर चिकटविले. सीदीस कोणीतरी कळविले की, सबनीस पिवळा कागद चिकटवून तुमच्या वाईटासाठी चेटूक करतो आहे. सीदीने सबनीसाला पकडून आणले आणि तोफेच्या तोंडी दिले. यावरून सीदी मंत्र-यंत्र राज्याभिषेकानंतर (इ.स. १६७४) चेटूक यावर किती विश्वास ठेवत होता हे दिसून येते. सीदीची राजधानी जंजि-याजवळ, त्यामुळे समुद्रात मराठय़ांचा किल्ला असणे सीदीस मानवणारे नव्हते, म्हणून तो या किल्ल्याच्या बांधकामात वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या या मा-यात आणि अडथळ्यांमध्येही किल्ल्याचे बांधकाम सुरूच होते. हे काम सोपे नव्हते म्हणून शिवाजी महाराजांनी कांसा किल्ल्याच्या संरक्षणासाठी दर्यासारंग इब्राहिमखान व दौलतखान यांना त्वरित हुकूम पाठविले की, ‘आरमार घेऊन त्वरित कांसा बेटावरील लोकांना संरक्षण द्यावे.’
बेटाभोवती समुद्रात आरमार ठेवायचे म्हणजे मोठी रसद, अन्नधान्य, दारूगोळा व पैसा आवश्यक असल्याने महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळ्याने प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारासाठी लागणारी खर्चाची रक्कम व धान्याचा पुरवठा करण्याचा हुकूम दिला. जिवाजी विनायककडून आज्ञापालनात कुचराई झाल्याने दर्यासारंगास रसद न मिळाल्याने ही गोष्ट त्यांनी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचविली. त्यामुळे महाराजांनी दि. १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायकचे कानउघाडणी करणारे पत्र लिहिले. जिवाजी विनायकला दर्यासारंगास पैसा व रसद उपलब्ध करून देणे भाग पडले व पुढे पद्मदुर्ग किल्ला उभा राहिला. या सर्व बाबीत शिवाजी महाराजांची कर्तव्यदक्षता व उद्दिष्टांची चांगली कल्पना येते.
बरीच वर्षे खपून महत्प्रयासाने बांधलेल्या या किल्ल्याचा पहिला हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते याची निवड केली. इ.स. १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळेच्या नेतृत्वाखाली १०,००० फौज देऊन महाराजांनी जंजिरा किल्ला घेण्याची मोहीम आखली. लढाऊ नौकांनी जंजि-यावर लहान तोफांनी मारा केला, पण उपयोग झाला नाही. तेव्हा मोरोपंताने हवालदार सुभानजी मोहिते, सरनोबत सुभानजी खराडे व कारकून मल्हार नारायण सबनीस यांच्या करवी अष्टागरातील कोळीवाडीचा प्रमुख लाय पाटील व त्याच्या पद्मदुर्गावर चाकरी करणा-या काही शूर सोनकोळ्यांना पद्मदुर्गावर बोलावून जंजिरा घेण्याची मोहीम सांगितली.
शूर लाय पाटलाने ८-१० सहका-यांसह रात्री दोरखंडाच्या शिडय़ा बांधून जंजिरा तटावर प्रवेश मिळविला. हबशांना त्याचा पत्ताही लागला नाही. मोरोपंताच्या सैन्याच्या तुकडीची लाय पाटील आणि त्याचे सहकारी पहाट फुटायच्या वेळेपर्यंत वाट पाहून थकले. सैन्य आले नाही म्हणून निराश होऊन दोराच्या शिडय़ा कापून त्यांनी माघार घेतली. शिवरायांना ही बातमी समजली तेव्हा पालखीचा मान म्हणून एक बोट लाय पाटलास बांधून दिली व तिचे नाव पालखी असे ठेवले. बोटीबरोबरच लाय पाटलास छत्री, निशाण, वस्त्रे व दर्याकिना-यांची सरपाटीलकी मोठय़ा सन्मानपूर्वक बहार केली.
दि. २८ एप्रिल १७०४ मधील पद्मदुर्गविषयी एक पत्र आहे, त्यानुसार मोरोपंत पिंगळे यांचा मुलगा नीळकंठ पिंगळे व परशुराम त्रिंबक यांनी बहिरो पंडित यांच्या वंशजांना पत्र लिहून कळविले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरे पद्मदुर्ग किल्ल्याच्या खर्चासाठी व देखभालीसाठी बहिरोपंडित प्रधान यांना दोन गावे नेमून दिली होती. कराराप्रमाणे ती गावे आता पद्मदुर्ग किल्ल्याच्या कारकुनाच्या स्वाधीन करावी आणि यात कोणतीही अफरातफर करू नये. यावरून दिसून येते की, महाराजांनी नुसता किल्ला बांधला नाही तर त्याच्या देखभालीचीसुद्धा व्यवस्था लावून दिली होती. नंतर हा किल्ला सीदीच्या ताब्यात गेला त्याआधी पद्मदुर्गचा हवालदार जनाजी पवार व मुजूमदार मल्हार नारायण चेऊलकर होता.
इ.स. १७३२ मध्ये पेशव्याने मुरूडला वेढा घातला त्यावेळी सीदी व पेशवा यांच्यात तह होऊन जंजिरा, पद्मदुर्ग हे किल्ले आणि मांडले, नांदगाव, दिवे, श्रीवर्धन ही गावे सीदीकडे राहिली आणि पेशव्याकडे बिरवाडी, तळे घोसाळे हे किल्ले व निजामपूर, गोरगाव ही गावे राहिली. इ.स. १७०७ मध्ये पद्मदुर्गचा किल्लेदार सिरुरखान हा होता. त्यावर्षी सीदी कासीम मरण पावल्यावर तो जंजि-याचा अधिपती झाला. रघुजी आंगरेने दि. २१ फेब्रुवारी १७५९ रोजी हा किल्ला जिंकून घेतला.
किल्ल्यावर ठिकठिकाणी कोरलेली कमळं, लपवलेलं प्रवेशद्वार (म्हणजे जवळ जाईपर्यंत न दिसणारं) या वैशिष्टय़ांबरोबर आणखी एक गोष्ट येथे प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे बांधकाम साहित्यात वापरलेला चुना. दोन घडीव दगड एकमेकांवर ठेवताना खालच्या व बाजूच्या दरवाजांमध्ये वापरलेलं हे ‘सिमेंटिंग मटेरियल’ इतकं भक्कम आहे की सुमारे १६७० च्या आसपास म्हणजे ३२५-३५० वर्षापूर्वी काळ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याचे दगड समुद्र लाटा, पाऊस व ऊन यामुळे सुमारे १० सें.मी. (४ इंच) झिजलेत, पण चुना तसाच राहिल्याने चुन्याच्या पट्टय़ा वर आलेल्या दिसतात.या किल्ल्यावर चौकोनी खोडाच्या खांडवेल ही औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणावर आढळते. किल्ल्यात अनेक उद्ध्वस्त अवशेष व पाण्याचे हौद आहेत. दरवाजाच्या तटाला लागून असलेल्या जिन्याचे तटावर चढल्यावर चारही बाजूंचे भक्कम तट व सहा बुरूज दिसतात. बुरुजांवर ४०-५० तोफा आहेत. त्यातील चार तोफा खाली खडकावर पडल्या आहेत. बुरुजांच्या दगडी कप-यांनी बांधलेल्या छोटय़ा कमानी, तोफांचे झरोके व तटभिंतीतील जंग्या लक्ष वेधतात.
पद्मदुर्ग.. ! खर तर दुर्गात प्रवेश करताच याची भव्यता कळून येते.. मजबूत तटबंदी.. आतून तटबंदीवर घेऊन जाणाऱ्या पायऱ्या.. तटबंदीला असणारे झरोखे..नि त्यातून बाहेर डोकावणाऱ्या तोफा.. अजूनही अगदी मजबूत स्थितीत असलेले बांधकाम पाहून थक्क व्हायला होते… किल्ल्याच्या आत नव्याने बांधकाम झालेले दिसते ते कस्टम ने मधल्या काळात राहण्यासाठी खोल्या वगैरे बांधलेल्या.. हे मधलं सिमेंटच बांधकाम सोडलं तर बाकी किल्ला देखणीय ठरतो.. तटावर नेणार्या पायर्या, रुंद अशा तटावर बांधलेल्या खोल्या, फुलाच शिल्प असलेले झरोखे, ..याच किल्ल्याच्या एका बुरुजावरुन पडकोट खूप सुंदर दिसतो..नि पडकोटाच वैशिष्ट्य असे कि कमळाच्या आकाराचा बुरुज.. म्हणूनच कि काय पद्मदुर्ग असे नाव पडले असावे.. आजही हा बुरुज तितकाच भक्कम आहे.. पडकोटावर जाताना मध्ये वाळूची पुळण लागते.. असंख्य शंख- शिंपल्याचा चुराडा पडलेला दिसतो.. त्यातून काही कलात्मक आकार शोधण्यात आगळीच मजा.. पडकोट बघताना साहाजिकच ‘कमळ’बुरुज बोलावून घेतो.. बुरुजाच्या कडांना कमळाच्या पाकळ्यांचा आकार देऊन या बुरुजाला एक वेगळंच वलय निर्माण करून दिलय.. आणि यामुळेच पद्मदुर्ग हे नाव या जलदुर्गाला अगदी शोभून दिसत..इथेच पुढे तटबंदी मध्ये शौचालयची व्यवस्थासुद्धा केलेली दिसते.. पुढे काही कोठार आहे नि काळाच्या ओघात बरंच काही वाळूखाली गेलेलं दिसत.. पडकोटाच्या बाहेरील बाजूने फेरफटका मारला कि लक्षात येते की किती मजबूत चुना वापरून काम केलेय..इथेच त्या बुरुजाच्या बाहेरील बाजूस भिंतीच्या खाचेत तोफगोळे अडकलेले दिसतात..इथून जंजिरा खूपच लांब वाटत असल्याने इतक्या दुरून तोफमारा पोचत असेल ?
सिद्दीच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोठ्या कल्पकतेने बांधलेला हा किल्ला पाहून नक्कीच उर भरून येतो.. जंजिरा हा खाडीच्या तोंडावर व प्रशस्त अशा खडकावरच बांधला आहे तर पद्मदुर्ग, भर समुद्रात बांधावा लागला. त्यामुळे पद्मदुर्गाचं बांधकाम खूपच कठीण व जोखमीचं होतं. तरीही हा प्रकल्प हातीं घेण्याचा निर्णय व व पूर्ण करण्याची जिद्द हें शिवाजी महाराजांच्या सागरी धोरणाचा एक तेजस्वी पैलूच !सिद्दीच्या हल्ल्यांना तोंड देत देत ह्या किल्ल्याचे मोठ्या जबाबदारीने बांधकाम पार पाडणाऱ्या दर्यासारंग व दौलतखानाचे देखील कौतुक वाटून जाते !
Leave a Reply