सुनील गावसकर यांच्यासारख्या रनमशिनच्या काळातही भारताचा सर्वात भरवशाचा आणि सातत्यपूर्ण फलंदाज असा लौकिक कमावलेल्या दिलीप वेंगसरकर dilip vengsarkar यांचा आज (६ एप्रिल) रोजी वाढदिवस आहे. वेंगसरकर यांना ‘लॉर्ड आॕफ दी लॉर्डस्’ आणि ‘कर्नल’ या किताबांनी क्रिकेट जगत ओळखते.
दिलीप वेंगसरकर dilip vengsarkar यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. अतिशय तडाखेदार आणि उत्तम फटके मारणारे फलंदाज म्हणून ते गौरविले गेले होते.
त्यांनी त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द १९७५-७६ साली ऑकलंड येथे न्यूझीलंड विरूद्ध सुरू केली. भारताने हा कसोटी सामना उल्लेखनीय असाच जिकला. ते १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य होते. त्यांनी १९८५ आणि १९८७ च्या दरम्यान धावांचा अक्षरशः पाऊसच पाडला. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या विरूद्ध अनेकवेळा शतके काढली. अनेक सामन्यांमध्ये त्यांना उल्लेखनीय यश मिळाले.
वेंगसरकर यांना त्यांच्या कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर वर्गवारीमध्ये उत्तम फलंदाज म्हणून स्थान मिळाले. ज्यावेळी वेस्ट इंडिजच्या अतिजलद खेळाडूंचं क्रिकेट जगतावर अधिराज्य होतं तेव्हा दिलीप वेंगसरकर हा एकमेव फलंदाज असा होता की ज्याने वेस्ट इंडिज विरूद्ध यश मिळवून मार्शल, होल्डिंग, रॉबर्ट यांच्याविरूद्ध सहा शतके केली.
‘लॉर्ड आॕफ दी लॉर्डस्’ का आणि कशासाठी म्हणतात हे सर्वश्रुत आहे. क्रिकेटची मक्का समजल्या जाणाऱ्या ‘लॉर्डस्’ मैदानावर लागोपाठ तीन कसोटी सामन्यात तीन दमदार शतके झळकावण्यासाठी त्यांना ‘लॉर्ड आॕफ दी लॉर्डस्’ म्हणतात. त्यांच्या या खेळामुळे भारताने इंग्लंडमधील कसोटी सामन्यांची मालिका जिकली व वेंगसरकर यांना मालिकावीर सन्मान मिळाला. भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांपैकी वेंगसरकर हे सरासरी सर्वाधिक धावा करणारे एकमेव फलंदाज होते. १९८७ च्या विश्वचषकानंतर त्यांनी कपिलदेव कडून कर्णधार पदाची सूत्रे हाती घेतली. जरी त्यांनी कर्णधारपदाच्या सुरुवातीच्या सामन्यात दोन शतके झळकवली तरी १९८९ चा वेस्टइंडिज दौरा हा वादग्रस्त ठरला. त्यामुळे कर्णधार पदाच्या जबाबदारीतून ते मोकळे झाले.
पण त्यांना ‘कर्नल’ का म्हणतात याची कहाणी फार जुनी आहे. गंमत म्हणजे वेंगसरकर यांना कर्नल म्हणत असले तरी त्यांना स्वतःला हे बिरुद हे फारसे आवडत नाही अशी माहिती समोर आली आहे. याबाबत स्वतः दिलीप वेंगसरकर यांनीच दिलेल्या माहितीनुसार भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ यांनी त्यांना ही उपाधी दिली होती आणि त्याचे कारण असे की दिलीप वेंगसरकर dilip vengsarkar यांची फलंदाजी शैली ही भारताचे पहिले कर्णधार व फटकेबाज फलंदाज कर्नल सी. के. नायडू यांच्यासारखीच आहे असे त्यांना वाटायचे. कर्नल नायडू हे होळकरांच्या लष्करात कर्नल या पदावर होते. आणि अमरनाथ हे नायडू यांच्यासोबत खेळलेले होते. त्यांनी नायडू यांची फलंदाजी अगदी जवळून बघितलेली होती. त्यामुळे वेंगसरकर यांच्या शैलीत त्यांना नायडू दिसल्याने त्यांनी त्यांना ‘कर्नल’ संबोधले होते.
वेंगसरकर यांनी 1974 मध्ये 19 वर्षे वयात नागपूर येथे इराणी कप स्पर्धेच्या सामन्यात बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना व बी.एस. चंद्रशेखर या महान फिरकी त्रिकुटाची गोलंदाजी झोडपून काढली होती. त्यावेळी शतक झळकावताना त्यांनी सात उत्तुंग षटकार लगावले होते. योगायोगाने या सामन्यासाठी आकाशवाणीकरता समालोचक म्हणून लाला अमरनाथ तेथे होते. ती फलंदाजी पाहूनच लाला अमरनाथ यांनी दिलीप वेंगसरकर dilip vengsarkar यांना पहिल्यांदा कर्नल असे संबोधले होते आणि तेंव्हापासून त्यांच्या नावाशी ही उपाधी जुळली ती कायमचीच.
याबद्दल वेंगसरकर यांचे सहकारी खेळाडू व त्यांचे मित्र संदीप पाटील यांनी एकदा लिहिलेय की, गंमत म्हणजे इराणी कप स्पर्धेच्या या सामन्यानंतर दिलीपचे ते खणखणीत षटकार मारणे बंद झाले आणि तो कर्नल नायडूंसारखा न खेळता विजय हजारेंच्या शैलीने खेळू लागला. वेंगसरकर हे सुरुवातीला यष्टीरक्षणही करायचे असे त्यांनी आपल्या आठवणींमध्ये लिहिले आहे. उत्तम खेळाडू आणि प्रशिक्षक असलेल्या दिलीप वेंगसरकर या अष्टपैलू खेळाडूस जन्मदिनानिमित्त शुभेच्छा!
Leave a Reply