आज २७ ऑक्टोबर जेष्ठ अभिनेते सत्येन_कप्पू satyen kappu यांचा स्मृतिदिन. हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या शोले या चित्रपटातील अनेक कलावंत केवळ त्या चित्रपटातील त्यांच्या अस्तित्वाने लक्षात राहतात. त्यापैकीच एक म्हणजे ठाकूर यांचा वफादार सेवक ज्याला केवळ त्यांच्या इशार्याने त्यांच्या मनातील गोष्ट कळते तो रामलाल म्हणजे सत्येन कप्पू. फारच कमी असलेले संवाद मात्र आपल्या अभिनयाने बरेच काही बोलून जाणारा रामलाल सत्येन कप्पू यांनी हुबेहुब उभा केला होता.
अभिनयाचे अष्टपैलूत्व
ठाकूरच्या हवेलीला पोहचल्यानंतर अमिताभ जेव्हा रामलालला हवेलीबद्दल विचारतो तेव्हा त्याचे विचारणेदेखील केवळ एका नजरेच्या सहाय्याने सहजपणे टाळणारे सत्येन कप्पू. satyen kappu जया भादुडीचे पात्र राधा बिटियाचा हसतमुख भूतकाळ सांगणारा उत्साही रामलाल आणि ठाकूरच्या परिवारातील सर्व सदस्यांची हत्या झाल्यानंतर ठाकूर आल्यावर त्यांच्याकडे जात अचानक रडू फुटलेला रामलाल म्हणजे एक अभिनयाचे अष्टपैलूत्व प्राप्त केलेला कलावंतच करु जाणे. तसे पाहिला गेले तर शोले हा काही त्यांचा पहिला चित्रपट नव्हता. सत्येन कप्पू हिंदी रंगभूीवरील प्रसिध्द कलावंत होते, चित्रपटसृष्टीला त्यांची ओळख फार उशीरा झाली.
रंगभूमीवर सुरुवात
६० च्या दशकात सत्येन satyen kappu मुंबईतील हिंदी रंगभूमीवरील सर्वात व्यस्त असणारे व विमल रॉय यांच्या चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका करणारे कलावंत होते. त्यांची चित्रपटसृष्टीला खरी ओळख झाली ती राजेश खन्ना यांच्या सुपरहिट कटी पतंग या चित्रपटाने. त्यावेळेस त्यांचे वय होते ४० वर्षे. त्यांचा जन्म हरियाणातील पानिपत येथील. पानिपत येथील युध्दभूमी भारतात प्रसिध्द आहे. त्यांचे खरे नाव सत्येन्द्र शर्मा होते मात्र त्यांची आई त्यांना प्रेमाने कप्पू बोलवत असे. या प्रेमाच्या नावालाच त्यांनी आपले कुलनाम केले.
बालपण
लहान असतांनाच त्यांनी आपल्या आईवडीलांचे छत्र गमावले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना पानिपत येथून कुरक्षेत्रच्या गुरुकुलात शिक्षणासाठी पाठविले. पानिपत आणि कुरुक्षेत्र या दोन्ही युध्दक्षेत्रात वाढलेल्या सत्येन satyen kappu यांच्या कुंडलीतच संघर्ष कायम घर करुन राहिला. गुरुकुलातील शिस्तीत शिक्षण होत असतांना तेथील नाट्यचळवळीत त्यांनी सहभागी होणे सुरु केले. पण तिथेही भूमिकेसाठी संघर्ष करावा लागला. नायकाची भूमिका तर मिळणार नव्हतीच. दिसायला सुंदर असल्याने त्यांना रामायणातील सीता बनविले जायचे तर कधी कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाची राधा बनविले जायचे. मात्र यामुळे रंगमंचावर काम करण्याचा आत्मविश्वास वाढत गेला. शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा मोठ्या भावाने मुंबईला बोलावले तेव्हा हा अनुभव कामास आला.
इप्टाचे दिवस
मुंबईत पोहचल्यावर त्यांनी पृथ्वीराज कपूर यांची दीवार आणि पठाण ही नाटके पाहिले आणि नाटकात काम करायच्या ओढीने ते इंडियन पीपल्स थिएटर (इप्टा) चे सदस्य झाले. ते दिवस इप्टाचे सुवर्णमयी दिवस होते. इप्टामध्ये बिमल रॉय, बलराज साहनी, कवी शैलेंद्र, संजीवकुमार, ए.के.हंगल यांच्यासारखे प्रतिष्ठीत कलावंत काम करीत असत. इप्टाच्या बाबू या नाटकात ए.के. हंगल यांच्यासोबत सत्येन यांना काम करण्यास मिळाले, त्यानंतर चेखोव लिखीत वॉर्ड नंबर सिक्स या नाटकातही ते होते. विश्वामित्र अदील यांच्या इलेक्शन तिकीट या नाटकातील काम पाहून बिमल रॉय यांनी त्यांना नौकरी या चित्रपटात दूधवाल्याचे काम करण्याचा एक प्रसंग दिला.
चित्रपटातील कारकिर्दीची सुरुवात
इथून चित्रपटसृष्टीतील कारकिर्द सुरु झाली. चित्रपट अभिनय क्षेत्रातील ही त्यांची पहिली संधी होती. त्यानंतर अपराधी कौन, काबुलीवाला या चित्रपटात काम केल्यानंतर ते पुन्हा रंगभूमीकडे वळाले. मात्र रंगभूमीवर मनाची शांतता मिळत असली तरी पोटाची भूक मिटवू शकत नव्हती. मुंबईसारख्या शहरात जगण्यासाठी आर्थिक उत्पन्न मिळणे गरजेचे होते. त्यामुळे सत्येन यांनी हिंदी टाइपिंगची कामे करणे सुरु केले.
उदरनिर्वाहासाठी टायपिंगचे काम
विश्वामित्र अदील यांच्या संहिता, गुलजार यांच्या कविता टायपिंगचे कामही त्यांना लगेच मिळाले. अनेक निर्मात्यांना जेव्हा त्यांच्या संहिता सेन्सॉर बोर्डला द्यायच्या असत तेव्हा ते त्याच्या टायपिंगचे काम सत्येन यांना देवू लागले. काही कालावधीसाठी त्यांनी ब्लीट्ज या मासिकातदेखील टायपिस्टचे काम केले. असा संघर्ष करीत असताना नाटकात काम सुरु होते. कुरुक्षेत्र आणि पानिपत या युध्दक्षेत्रातील संघर्ष सत्येन यांच्या नशिबी लिहिलाच होता म्हणा ना.
संघर्षाला यश
या संघर्षाला यश मिळाले ते ७० च्या दशकात. यावर्षी आलेल्या कटी पतंग या चित्रपटातील डॉक्टर आणि खिलौना चित्रपटातील वकील या दोन भूमिकांनी हिंदी चित्रपटसृष्टीला युवा चरित्र अभिनेता दिला, तो म्हणजेच सत्येन कप्पू. या चित्रपटांची जादू चालल्यानंतर सत्येन यांना लगेचच अमरप्रेम, रखवाला, सीता और गीता, जाने अनजाने, लाल पत्थर हे चित्रपट मिळाले. जया भादुरी आणि रणधीर कपूर यांच्या जवानी दिवानी या चित्रपटातील मामाजी या भूमिकेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले. या चित्रपटात सत्येन जेव्हा रणधीरचे नकली पिताजी बनून जी धमाल उडवितात की, प्रेक्षक एकदम खूश. या भूमिकेनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत सत्येन यांची मागणी अचानकरित्या वाढली. त्यांच्याकडे भूमिकांचा पूर ओसंडून वाहू लागला.
अभिनयाने प्रेक्षकांना जिंकले
प्रत्येक सुपरहिट चित्रपटात सत्येन कप्पू दिसू लागले. अनुराग, यादों की बारात, अपना देश, हसते जख्म, अनहोनी, हिंदुस्थान की कसम, किमत, खोटे सिक्के, आपकी कसम, कसोटी, दोस्त, हाथ की सफाई या चित्रपटातून ते वेगवेगळ्या भूमिकातून दिसले. दिवारमध्ये अमिताभच्या वडिलांच्या भूमिकेत केवळ काही दृश्यांमध्ये असतांनाही आपल्या अभिनयाने ते प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. शोलेमध्ये रामलाल झाले. अमिताभ, राजेश खन्ना, धमेंद्र, जितेंद्र या त्या काळातील सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत चित्रपटांमध्ये पोलीस, डॉक्टर, वकील, काका, वडील किंवा मोठ्या भावाच्या भूमिकांमध्ये निर्मात्यांना सत्येन कप्पू दिसायला लागले. त्या काळातील मजबूर, बेनाम, अविष्कार, प्रतिज्ञा, कर्तव्य, रेड रोज, द बर्निंग ट्रेन, ज्योती बने ज्वाला या चित्रपटात ते होते.
१९८० च्या दशकातही नसीब, कुदरत, लावारिस, एक दुजे के लिए, नमक हलाल, खुद्दार, पुकार, सौतन, कुली, कयामत, शराबी, इन्कलाब, बाजी, खुदगर्ज, इमानदार, खतरों के खिलाडी, हत्या, बीबी हो तो ऐसी, जख्मी औरत, जोशीले, जादुगर, कानून अपना अपना या चित्रपटात ते दिसले. तत्कालीन काळातील प्रत्येक छोट्या मोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटात त्यांच्या भूमिका होत्याच.
भूमिकांचे वैविध्य
सत्येन केवळ चरित्र भूमिकांपुरते मर्यादित नव्हते, त्यांनी काही चित्रपटात खलनायकही साकारला. ८० च्या दशकात त्यांच्या चित्रपटांची संख्या पाहता ते किती व्यस्त कलाकार होते याचा अंदाज येतो. १९८१ मध्ये त्यांचे १२ चित्रपट आले, ८३ मध्ये १६, ८८ मध्ये १८ आणि १९८५ साली तर २० चित्रपटात सत्येन कप्पू होते. पण ९० च्या दशकात हीच संख्या रोडावली. या दरम्यान त्यांचे दिल, बेटा, खेल, हमदोनो, हकीकत, राजा या चित्रपटातील अभिनय लक्षात राहिला.
निधन
वाढत्या वयानुसार चार मुलींचा पिता असलेल्या सत्येन यांनी चित्रपटातून कामे कमी केलीत. २००० मध्ये ते एक वयोवृध्द चरित्र अभिनेता झाले. पण अखेरपर्यंत मिळालेल्या भूमिका करत असतांनाच २००७ मध्ये २७ ऑक्टोबरला वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पण आपल्या अनेक चित्रपटातील अविस्मरणीय अभिनयाने ते हिंदी चित्रपटांच्या रजतपटावर कायम जिवंत असतील.
Leave a Reply