घोसाळगड उर्फ विरगड Virgad Fort हा किल्ला एका छोट्याशा टेकडीवर रेवदंडा व साळवे ह्या दोन खाड्यांच्यामधे चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांनी वेढलेला असुन मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर व पायथ्यापासून साधारण २०० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो. पायथ्याशी घोसाळे नावाचे गाव आहे ज्यावरून ह्याला घोसाळगड हे नाव पडले. उत्तर दक्षिण पसरलेला हा गड घोसाळे गावाच्या पश्चिमेकडे आहे.
हा गड नक्की कधी बांधला गेला ते पुराव्याअभावी सांगता येत नाही पण शिवपूर्वकाळात अस्तित्वात असलेला हा किल्ला ताम्हण घाटमार्गे होणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. जंजिरा, तळगड, घोसाळगड, ताम्हणघाट, घनगड असा तो व्यापारी मार्ग होता. या मार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे. Virgad Fort
१६व्या शतकात हा किल्ला आदिलशाही व निजामशाहच्या ताब्यात होता. सोडवलेकर व कोडवलेकर या दोघांची आदिलशहाने तळे व घोसाळे गडाचे गडकरी म्हणून नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस कळविले की, आम्हास हबशांच्या ताबेदारीचा वीट आला आहे. आपण इकडे आल्यास आम्ही तळे व घोसाळे गडांचा ताबा देतो. अशी अनुकूलता पाहून शिवरायाने हे दोन्ही गड इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला.
‘‘रघुनाथ बल्लाळ (कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर जंजि-यावर स्वारी करण्यास पाठविल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात शिवाजी राजांनी तळेगडावर येऊन सुरगड, भौरप (सुधागड), कांगोरी हे किल्ले ताब्यात घेऊन घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ आणि रायरीवरील जावळीच्या मो-यांचा प्रचंड खजिना मिळाल्यामुळे शिवरायांनी तळेगड व घोसाळेगड मजबूत करण्याची व्यवस्था केली असा उल्लेख सभासद बखरीत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतल्यावर त्याचे नाव बदलून ‘वीरगड’ असे ठेवले. तळे व घोसाळे परगण्याच्या देशमुखांनी खूप मदत केली. तळेगड ताब्यात घेतल्यामुळे शहाजीराजांच्या ताब्यात असलेल्या जहागिरीत वनराईने व्यापलेला, गनिमीकाव्यात सोयीचा असा कोकण, शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी निवडला. तेथे जीवाला जीव देणारी निष्ठावान माणसे मिळविली. तळे-घोसाळे गड हे मजबूत व नैसर्गिक संरक्षण असलेले गड शिवरायांच्या ताब्यात आल्यामुळे त्यांनी पुढील सात वर्षात कोकणच्या आरमारासाठी पायाभूत जमवाजमव केली आणि कल्याण सुभा ताब्यात आल्यानंतर तेथे आरमार स्थापन केले. भवानी या कुलदेवतेचे एक स्थान घोसाळेगड वर असल्यामुळे त्यांनी या देवळास सुरू केलेल्या सनदा अजूनही चालू आहेत. इ.स १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर्यायच्या सिद्धीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. ह्याचे स्थान लक्षात घेता जंजी-याच्या सिद्दीने हा गड त्याच्या ताब्यात ठेवण्याचा बराच यत्न केलेला दिसतो. पुरंदर तहात शिवाजी राजेंनी दूरदृष्टी ठेवून जे १२ गड आपल्या ताब्यात ठेवले त्यात तळेगड व घोसाळेगड होते. या गडांच्या आधारे साम्राज्य पुन्हा निर्माण करता येईल, अशी महाराजांची धारणा होती. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर केलेल्या तहाप्रमाणे शिवरायांनी जे १२ किल्ले स्वत:कडे ठेवले त्यात ‘ घोसाळगड’ हा किल्ला होता.
या १२ गडांच्या स्थलसीमा मुख्यत: कोकण व कोणघाटमाथापर्यंत मर्यादित होत्या. तहाद्वारे खालील किल्ले शिवरायांकडे राहिले. १) राजगड, २) रायरू, ३) तळे, ४) घोसाळे, ५) भोरप (पाली), ६) तोरणा, ७) अलवारी, ८) पाल, ९) लिंगणगड, १०) महाडगड, ११) उदयदुर्ग. त्यावरुन या गडाचे तत्कालीन महत्व लक्षात येते. शिवाजीराजाच्या मृत्यूनंतर कधीतरी हा किल्ला सिद्दीकडे गेला. त्यानंतर सन १७३५ मधे बाजीरावाने हा जिंकून पुन्हा मराठ्यांकडे आणला
पेशव्यांनी नारो त्र्यंबक सोमण यांना राजपुरी सुभ्याच्या मामलतदाराची सनद १७४०मध्ये दिली. त्यांना वसुली व्यवस्थेबरोबरच लष्कर अधिकारीही मिळाले. वार्षिक वेतन, पालखी, दिवटय़ा यांचा मोबदला असे. सोमणांच्या ताब्यात तळेगड, मानगड, घोसाळगड व विश्रामगड हे चार किल्ले होते. तळेगडाच्या भोवतालची १०४ गावे मिळून तळे महाल बनविला होता . सन १८१८ मधे शेवटच्या इंग्रज-मराठा युद्धात कर्नल प्रॉथरने रायगड घेण्याआधी हा किल्ला. इंद्रापूर मार्गे १७ एप्रिल १८१८ या दिवशी आला.लेप्टनंट बेलासीसच्या नेतृत्वाखाली एक तुकडी घोसाळगडाकडे पाठविली आणि हा किल्ला काबीज केला.
घोसाळे गावातूनच गडावर जाणारा रस्ता आहे. रस्ता संपल्यावर पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे.पायऱ्यांच्या मार्गावर भवानी मातेचे मंदिर असून त्यात भवानी मातेची पुरातन मुर्ती आहे.त्यापुढे गणपतीची स्वयंभु गणेशमुर्ती असणारे प्रशस्त मंदिर आहे. येथुन पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीजवळ येवून पोहोचतो. समोरच कातळात कोरलेल्या दहाबारा पायऱ्या दिसतात. यातील काही पायऱ्या तोफांच्या मार्या्मुळे उध्वस्त झालेल्या आहेत. या पायऱ्यांवरुन वर पोहोचल्यावर मधेच काही चांगल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या आपल्याला दरवाजा पर्यंत घेऊन जातात. मात्र येथिल प्रवेशव्दार पुर्णत: नष्ट झालेले आहे.
तटातून आत गेल्यावर डावीकडे एक पाण्याचे टाकं दिसते. तिथेच खालच्या बाजूस तटातून खाली उतरण्यासाठी ‘‘चोर दरवाजा’’ आहे. तटावरुन किल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी मुख्य दरवाजाचे ढासळलेले चिरे दिसतात. दोन दगडांवर शरभमूर्ती कोरलेल्या दिसतात. वर पोहचल्यावर आपला थेट घोसाळगड माचीवर प्रवेश होतो. येथून पुढे गेल्यावर गडाचे दोन भाग पडतात. उजवीकडे किल्ल्याची माची तर दुसरा बालेकिल्ल्याकडील. अरुंद असलेल्या डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या तटबंदीमधे त्याकाळातील शौचकूप पहायला मिळतात.शेवटच्या टोकाला बुरुज आहे, इथून घोसाळगड बालेकिल्ल्याचे दर्शन होते, माची पाहून पडझड झालेल्या दरवाजापाशी परतायचे आणि डावीकडची बालेकिल्ल्याची वाट धरायची. थोडासा उंचवटा पार केला की आपण बालेकिल्ल्याच्या कड्यापाशी पोहचतो. येथून थोडे वर दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे. पण वर जाणारी मुख्य वाट मागच्या बाजूने आहे. तत्पूर्वी डावीकडे काही जमिनीत खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. या बाजूने बालेकिल्ल्याच्या डोंगराला वळसा देखील घेता येतो. उजवीकडच्या वाटेवर देखिल खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके आहे.
वाटेत कड्यात खोदलेल्या काही गुहा आढळतात.या गुहांच्यासमोरच एका दगडावर कोरलेले शिवलिंग आहे.बाजुला एके ठिकाणी दरीमध्ये एक खांबटाके खोदलेले आहे. यासाठी थोडे खाली उतरुन जावे लागते. ते पाहून पुन्हा मुख्य वाटेला लागायचे. थोड्याच वेळात आपण बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस पोहोचतो. इथेच एक तोफ उघड्यावर पडलेली दिसते. या तोफेच्या समोरुन एक वाट बालेकिल्ल्यावर जाते. वाट निसरडी असल्याने जरा जपूनच जावे लागते. बालेकिल्ल्याच्या उंचवटय़ावर पाण्याच्या कोरीव टाक्या, घरांचे अवशेष, माथ्यावर किल्लेदाराचा वाडा असल्याच्या खुणा आढळतात. बालेकिल्ल्या वरुन संपूर्ण परिसर नजरेस पडतो. गडाच्या माथ्यावरून तळागडाचे दर्शन होते. कुडे मांदाडच्या खाडीचे द्रश्य आपल्याला खिळवून ठेवते. बालेकिल्ल्याला घोसाळगड माचीवरुन प्रदक्षिणा देखील मारता येते. संपुर्ण गड फिरण्यास तीन तास लागतात. असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षीत आहे.
मुंबई-पुणे या महानगरांशी रोहे हे गाडीमार्गाने जोडले गेले आहे. शिवकालापासून प्रसिध्द असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. मुंबई – पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील नागोठेणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत. तसेच रोहे हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानकही आहे. रोहे येथून मुरुड या सागरकिनार्यावरील गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक चणेरे – बिरवाडी कडून कुंडलिका नदीच्या किनार्याने जातो. तसेच दुसरा मार्ग घोसाळगडाकडून भालगाव मार्गे जातो. याच मार्गावर घोसाळगडाचा किल्ला आहे. चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांच्या मधे घोसाळगड विराजमान झालेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो. रोहे एस.टी. स्थानकावरून घोसाळगडाला जाण्यासाठी एस.टी.बसेसची सोय आहे. साधारण तासाभरात आपण घोसाळगड गावात पोहोचतो.
Leave a Reply