आज ७ एप्रिल. चारचाकी गाडी मध्यमवर्गींयांच्या आवाक्यात यावी यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करणारा मोटार उद्योगाचा बादशहा हेन्री फोर्ड Henry Ford यांचा ७ एप्रिल स्मृतिदिवस.
३० जुलै १८६३ रोजी अमेरिकन उद्योगपती, फोर्ड गाडय़ांचा निर्माता हेन्री फोर्ड यांचा जन्म झाला.हेन्री फोर्डच्या उद्योगीपणाचा अनुभव त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना त्याच्या लहानपणा पासूनच येऊ लागला होता. त्याच्या वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला एक पॉकेट वॉच आणून दिले होते. त्यात तो रमला. इतका की तो पंधरा वर्षाचा होई पर्यंत त्याने आपले शेजारी आणि मित्र यांची घडय़ाळे शंभरदा उघडली आणि पुन्हा त्यांची जुळवणी केली. तो तेरा वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरपले आणि तो जवळपास मानसिकरीत्या उध्वस्त झाला. त्याचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते.
समजू लागले त्या वयापासूनच यंत्राशी त्यांची मैत्री झाली , या यंत्रांच्या ओढीनेच ‘अश्वहीन रथ’ म्हणजेच मोटरगाडी बनविण्याचे त्यांना पडलेले स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या साथीने केलेले कठोर परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. घोडय़ाशिवाय कधी रथ चालतो काय, अशी चेष्टा लोक करीत. शेवटी अनेक दुरुस्त्या करीत १८९३ मध्ये त्याने आपली गाडी रस्त्यावर आणलीच. मात्र पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले, या गाडीच्या आवाजाने घोडे उधळतात,गाई दूध देत नाहीत, कोंबडय़ा अंडी घालत नाहीत, रस्ते खराब होतात, अशा तक्रारी लोक करीत होते. आज हे वाचताना गंमत वाटते.अशा तक्रारी लोक करू लागले. शेवटी डेट्रॉइटच्या नगरपालांकडून हेन्री फोर्ड यांनी गाडी चालविण्याचा परवाना काढला. अमेरिकेतला हा पहिला परवाना आहे.
“मला सर्वांना वापरता येईल अशी मोटार बनवायची आहे.” ३० वर्षांचा फोर्ड सर्वांसमोर आपल्या नवीन तयार केलेल्या मोटारीचे डिझाईन पेश करत होता. “हि फोर्ड मोटार दणकट, वजनाला हलकी फक्त १००० पौंड वजनाची आहे. ४ सिलिंडर इंजिनाची हि गाडी ताशी ४५ मैल वेगाने धावू शकते. सध्या हिची किंमत फक्त $९०० आहे. हिच्या बरोबरीच्या गाड्या साधारणपणे $१५०० ला विकल्या जातात. आणि यामुळेच हि गाडी सर्वांना परवडणारी जगातील पहिली गाडी असेल.” असे म्हणून त्याने सर्वांच्या पुढे आपल्या गाडीचे एक चित्र सरकवले.
ज्या देशात आज मोटारीला विरोध होतो त्याच देशात मी मोटारींची रेलचेल करीन, अशा निर्धाराने फोर्ड यांनी १९०३ मध्ये फोर्ड मोटर कंपनी स्थापली. त्या कंपनीने आपल्या पहिल्याच `मॉडेल’ने इतिहास घडविला. हे मॉडेल होते `मॉडेल टी’. १९०८ मध्ये ही गाडी बाजारात आली. या गाडय़ांचे स्टिरिंग व्हील डावीकडे होते. गाडी चालवायला सोपी होती आणि दुरुस्ती करायची तर सहजपणा होता . मुख्य म्हणजे गाडीची किंमत कमी होती. पहिल्या वर्षी कंपनीने १७०८ गाडय़ा विकल्या. गाडीची किंमत होती ९०० डॉलर. आज फोर्ड यांचे स्वप्न अमेरिकेपुरतेच नव्हे जगभर अक्षरश: खरे ठरले आहे.
ज्या मोटारींना एकेकाळी लोक विरोध करीत होते तिच्याशिवाय आजच्या जगण्याला गती नाही! घाऊक उत्पादनामुळे गाडय़ा केवळ श्रीमंती हौस राहिल्या नाहीत तर त्या मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आल्या . १९१८ पर्यंत अशी स्थिती होती की अमेरिकेतील अर्ध्याअधिक गाडय़ा या फोर्ड कंपनीने उत्पादन केलेल्या होत्या.
१९२४ मध्ये हेन्री फोर्ड हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे एक प्रमुख उमेदवार मानले जात होते. आपल्या प्रचारासाठी त्यांनी आकाशवाणीचा उपयोग केला होता, ज्याचे अनुकरण दहा वर्षांनी अध्यक्ष रूझवेल्ट यांनी केले.चारचाकी गाडय़ांचा तो जनक नव्हे परंतु गाडी हा श्रीमंती थाट न राहता हे वाहन मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातील व्हावे यासाठी त्याने अथक प्रयत्न केले.फोर्ड सतत वाहनांची किंमत कमी व्हावी यासाठी झटला. १६१ पेटंट फोर्डच्या नावावर जमा आहेत हे त्याचेच लक्षण. ७ एप्रिल १९४७ ला हेन्री फोर्ड यांनी अखेरचा श्वास घेतला.
- © योगेश शुक्ल ९६५७७०१७९२
Leave a Reply