सुप्रसिद्ध लेखिका व अभिनयपटू प्रिया तेंडुलकर Priya Tendulkar यांचा १९ सप्टेंबर हा स्मृतिदिन. विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर. आपकी अदालत, प्रिया तेंडूलकर टॉक शो या कार्यक्रमांद्वारे दूरचित्रवाणीच्या छोटया पडद्यावर आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी रजनी आणि मराठी साहित्यविश्वात कथांनी आपली स्वतंत्र मोहर उमटवणारी बंडखोर लेखिका प्रिया. प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांची कन्या. वडिलांतील बंडखोरपणाबरोबरच सर्जनशीलता व लेखनगुणांचा वारसाही घेऊन जन्माला आली.
एका प्रसिद्ध व्यक्तीच्या सहवासात दुसरी व्यक्ती तितकी मोठी होत नाही, तिची वाढ खुंटते, असे म्हणतात; पण या मुलीच्या बाबतीत हा समज पूर्णपणे खोटा ठरला. वडिलांपेक्षा जास्त प्रसिद्धी तिने मिळवली आणि आपल्या कर्तृत्वाने वडिलांना अभिमान वाटेल असे काम करून ठेवले. एकावेळी अनेक आघाड्यांवर लढणारी ही तरुणी नियतीच्या खेळाची मात्र अचानक शिकार झाली. वयाची पन्नाशी पूर्ण करण्याच्या आतच तिने अर्थात प्रिया तेंडुलकर Priya Tendulkar हिने जगाचा निरोप घेतला.
लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. पण त्याच प्रिया तेंडुलकरने नंतर बँक कर्मचारी, पंचतारांकित हॉटेलात स्वागतिका, मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, चित्रवाणी मालिकांतील यशस्वी सूत्रसंचालिका – अशा निरनिराळया भूमिका जीवनात यशस्वीपणे वठवल्या.
वडिलांबरोबर त्या नाटयसृष्टीत आल्या पण नंतर तेथे त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. ‘तो राजहंस एक’ हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी ‘बेबी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘सखाराम बाईंडर’, ‘कन्यादान’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘फुलराणी’ आदी नाटकांत भूमिका केल्या. शिरिष पै यांच्या ‘कळी एक फुलत होती’ या नाटकात वयाच्या अठराव्या वर्षी काम करण्याची संधी त्यांना लाभली.
मनोरंजनाच्या क्षेत्रात दूरचित्रवाणीवरील छोटा पडदा म्हणजे दूरदर्शनची तेव्हा मक्तेदारी होती. त्या वेळी आजच्यासारखी इतकी चॅनेल्सची प्रचंड अशी गर्दी झालेली नव्हती. भारतीय प्रेक्षकांना तेव्हा मनोरंजनासाठी तेच एक माध्यम होतं. या माध्यमात सिरिअल्सची आजच्यासारखी रेलचेलही नव्हती. थोड्या मालिका असत आणि त्यांचे एपिसोडही आजच्यासारखे वर्षानुवर्षे चालत नसत. आशयघन मालिका आणि लिमिटेड एपिसोड असा मामला होता. त्या काळात रविवारची सकाळ संपूर्ण देशभर नऊच्या सुमारास राखून ठेवली जात होती.
खूप जुना काळ नाही. 32 वर्षांपूर्वी म्हणजे 1985 मधील ही बाब आहे. बासू चटर्जी दिग्दर्शित आणि निर्मित “रजनी’ या लोकप्रिय मालिकेची ही कथा. रामायण आणि महाभारत या मालिकांची लोकप्रियता व त्यांच्या दंतकथा तयार व्हायच्या आधी “रजनी’ या मालिकेने दूरचित्रवाणीच्या इतिहासात आपला असा विक्रम केला होता. रजनी ही मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री होती प्रिया तेंडुलकर. Priya Tendulkar देशातील मध्यमवर्गीय घराघरांत अन्यायाने गांजलेल्या, पिचलेल्या गृहिणींचा ती आवाज बनली होती.
ग्राहक चळवळ आणि ग्राहकांचे हक्क हे शब्दही जेव्हा कुणाच्या अंगवळणी पडले नव्हते, तेव्हा रजनीने आपला चमत्कार केला होता. सगळ्या गृहिणींना आणि अन्यायाने गांजलेल्या वर्गाला ती आधार वाटत होती. कल्पित कथानक; पण लोकांच्या प्रश्नांशी निगडित अशा दैनंदिन अडचणींच्या प्रश्नांवर तोडगा काढणारी ही रजनी अनेक महिलांना आपलीशी वाटत होती. मालिकेतील रजनी लोकांना पटेल अशी सादर करायचे कौशल्य होते अर्थातच प्रिया तेंडुलकर हिचे. विजय तेंडुलकर यांची ही कन्या; पण कधीच तिने वडिलांची ओळख सांगून आपल्याला काम मिळावे यासाठी प्रयत्न केले नाहीत.
शालेय वयापासून नाटकांत काम करायला लागलेल्या प्रियाने चक्क “इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकात काम केलं होतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने तिने व्यावसायिक रंगभूमीवर काम केलं ते “हयवदन’ या नाटकात. या नाटकात तिच्याबरोबर अमोल पालेकर, अमरिश पुरी, कल्पना लाजमी अशी दिग्गज मंडळी होती. या नाटकाचे देशभर प्रयोग झाले. दिल्लीतील प्रयोगाला त्या वेळी इंदिरा गांधी आल्या होत्या, त्यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं.
प्रिया तेंडुलकरची सुरवातच अशी खणखणीत आणि दिग्गज मंडळींबरोबर झाली होती. त्यानंतर तिने “कळी एकदा फुलली होती’ या नाटकात दत्ता भट यांच्यासारख्या नटश्रेष्ठांबरोबर काम केलं होतं. शिरीष पै यांनी हे नाटक लिहिलं होतं. या नाटकाचे काही प्रयोग झाल्यावर मात्र प्रियाने दौऱ्यावर जावं लागत असल्याने हे नाटक सोडलं. त्यानंतर तिने श्याम बेनेगल यांच्या “अंकुर’ या चित्रपटात काम केलं. हे करत असतानाच तिने “अशी पाखरे’ या नाटकाचं कन्नड रूपांतर झालं होतं, त्यात काम केलं. त्या नाटकातील काम बघून तिला अनंत नाग या कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध हिरोबरोबर काम करण्याची संधी एका चित्रपटात मिळाली. कन्नडमध्ये तो चित्रपट गाजलाही, पण प्रियाला कन्नड चित्रपट करण्यात स्वारस्य नसल्याने तिने त्या चित्रसृष्टीत आलेल्या ऑफर नाकारल्या.
प्रिया तेंडुलकर हिने मराठीतील पहिला चित्रपट केला तो “गोंधळात गोंधळ’. व्ही. के. नाईक यांच्या या चित्रपटानंतर प्रियाची मराठी चित्रपटसृष्टीत खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली. मराठीत जवळजवळ चाळीस चित्रपट केलेल्या प्रियाने हिंदीतही अनेक चित्रपट केले; पण हिंदीतली तिची वाटचाल फारशी यशस्वी ठरली नाही. हिंदीत तिने “गुप्त’मध्ये बॉबी देओलच्या सावत्र आईची भूमिका केली ती बहुधा शेवटची. प्रियाने जसं कन्नडमध्ये काम केलं, तसंच गुजरातीतही केलं होतं. गुजराती चित्रपटासाठी तिला तीन वेळा तेथील सरकारचं पारितोषिक मिळालं होतं. मराठीतही तिने महाराष्ट्र सरकारचं पारितोषिक मिळवलं होतं.
प्रिया मनस्वी कलावंत होती, त्यामुळे ती सतत नावीन्याच्या शोधात होती. सतत नवीन काही तरी करून पाहायला तिला आवडायचं. त्यामुळेच तिने रजनी मालिकेनंतर अनेक वर्षांनी जेव्हा ती विविध चॅनेलकडे वळली तेव्हा “प्रिया तेंडुलकर टॉक शो’सारखा वेगळा कार्यक्रम आखला आणि यशस्वीही करून दाखवला. एकदा एखादी गोष्ट मनात घेतली की ती करणारच, हा खाक्या असलेल्या प्रियाने “ती फुलराणी’मधली भक्ती बर्वेने साकारलेली भूमिका करून सगळ्यांनाच चकित केलं होतं.
कलाकार असतानाही तिने आपल्यातली लेखिका जपली होती. सदरलेखन, कथा आणि अन्य लेखनातून तिच्यातील साहित्यिका दिसायची. राज्य शासनाचे सलग तीन वर्षे तिच्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले होते. एक लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती, अभिनेत्री, पटकथा लेखिका अशी तिची बहुविध रूपं होती. त्या प्रत्येक रूपाला तिने न्याय द्यायचा प्रयत्न केला. पण… नियतीने तिच्यावर अचानक घाव घालून अन्याय केला हेच खरं.
योगेश शुक्ल 9657701792
Leave a Reply