आज ७ एप्रिल भारताचे एडिसन म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक डॉ शंकर आबाजी भिसे Shankar Abaji Bhise यांचा स्मृतिदिन.दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे पेटंट घेणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या,तिरस्कार व्यक्त करणार्या अमेरिकेन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणार्या डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म २९ एप्रिल १८६७ रोजी मुंबईमध्ये एका मॅजिस्ट्रेटच्या घरात झाला.
’आयुष्यात भाकरीची भ्रांत सुटायची असेल तर त्यासाठी सरकारी नोकरी हा एक चांगला पर्याय आहे,’असा विचार असलेल्या कुटुंबात जन्माला आलेला हा शंकर पुढे महान शास्त्रज्ञ होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण शाळेत असताना एकदा त्यांच्या वाचनात युरोपीयन शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांबद्दल केलेलं विधान आलं. त्यात युरोपीय शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांवर अत्यंत हीन शब्दांत ताशेरे ओढले होते. ”संशोधन करून एखादं नवं यंत्र तयार करण्याचं तंत्र भारतीय शास्त्रज्ञांकडे नाही. फार तर ते यंत्र चालवू शकतील,फारच झालं तर त्या यंत्राची नक्कल करतील. यापलीकडे भारतीय शास्त्रज्ञांची झेप नाही.” असा उल्लेख त्यात होता. भारतीय शास्त्रज्ञांबद्दल युरोपीय शास्त्रज्ञांनी केलेलं इतकं हीन दर्जाचं विधान अवघ्या शाळेत शिकत असलेल्या त्या चिमुरडय़ा मुलाच्या मनाला खूप लागलं आणि युरोपीयांचं हे विधान त्यांच्याच धरतीवर जाऊन त्यांनाच पुसायला लावीन, असा निर्धार केला.
लहानपणी एकदा भिसे Shankar Abaji Bhise साखर आणायला वाण्याकडे गेले. त्यावेळी वाण्याने लबाडी करून कमी वजनाची साखर दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याबाबत त्यांनी व्यापाऱ्याला विचारलं असता, ”तुला जर माझ्या वजनाच्या काटय़ावर विश्वास नसेल तर आपोआप वजन करणारं यंत्र शोधून काढ.” असं त्या वाण्याने त्यांना खोचकपणे म्हटलं. त्यावेळी ‘एक ना एक दिवस तुला असे यंत्र देईन,’ असं ठामपणे आपले छोटे शंकरराव त्याला म्हणाले. याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७ मध्ये ‘इन्व्हेन्टर रिव्ह्यू अँड सायंटिफिक रेकॉर्ड’ या मासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाईकाला हवं तेवढं वजन करून देणारं यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. तयार केलेले हे यंत्र त्यांनी त्या वाण्याला आवर्जून दाखवले. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला.
छपाईतंत्राचा शोध चीनमध्ये चार शतकांपुर्वी लागला असला तरी छपाईसाठी लागणार्या अक्षरांचे खिळे पाडणारी आणि त्यांची जुळणी करणारी यंत्रं दीडशे वर्षांपुर्वीपर्यंतही फारच संथगतीने काम करीत असत. एका मिनीटाला फक्त दीडशे अक्षरांची जुळणी व्हायची. जगामधील अनेक वैज्ञानिक व संशोधन क्षेत्रांमध्ये नाव कमावलेल्या संस्थांनी या यंत्राच्या आधुनिकीकरणासाठी जातीने प्रयत्न केले पण मनाजोगते यश कुणालाही मिळत नव्हते. शेवटी मराठमोळ्या अशा शंकर भिसे यांनी आपले सारे लक्ष, शक्ती व जगावेगळी घडण असलेले त्यांचे तल्लख व चपळ डोके या संशोधनकार्यासाठी पणाला लावले. काही वर्षांतच त्यांनी मिनीटाला बाराशे अक्षरांची जुळणी सहजगत्या करू शकणार छपाईयंत्र बनवण्याची किमया केली. हेच ते प्रसिद्ध असे बाराशे अक्षरं छापणारं ‘गुणित मातृका’ यंत्र… हे यंत्र भिसेनी तयार केलं आणि १९१६ मध्ये ते विक्रीला आणलं. हे यंत्र गतिमानतेबरोबरच गुणवत्ता व अचुकता यांचा सुवर्णमध्य गाठणारं असल्यामुळेच त्याची दखल परदेशातही घेतली गेली.
१९१०मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातलं एक भारतीय औषध फार गुणकारी ठरलं. या औषधाचं रासायनिक पृथ:करण त्यांनी करवून घेतलं आणि त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे, हे जाणलं. १९१४ साली भिसेंनी Shankar Abaji Bhise स्वतच एक नवीन औषध तयार करून त्याला ‘बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरलं. पहिल्या महायुद्धात या औषधाचा अमेरिकन लष्कराने मोठय़ा प्रमाणावर वापर केला.
समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातले विविध वायू वेगळे करणारं यंत्र, जाहिराती दाखविणारं यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन वितरण आणि नोंदणी करणारं यंत्र, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी विजेच्या सहाय्याने छायाचित्रे पाठविणारं यंत्र अशा अनेक यंत्रांचे शोध त्यांनी लावले.१९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने त्यांना डी. एस. सी. ही पदवी दिली. भिसे यांनी विद्युत शास्त्रातही बरंच प्रयोगात्मक संशोधन केलं. त्यांनी तयार केलेल्या ‘स्वयंचलित आगामी स्थानदर्शक’ यंत्रामुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आपोआप कळणार होतं. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरायला नकार दिला.
डब्यात लोंबकळणारे प्रवासी खाली पडतात व मरतात. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली, पण आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे Shankar Abaji Bhise यांनी १८९८ मध्ये लावला होता. त्या काळात आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशाप्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही.
सौर ऊर्जेवर चालणार्या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या सौरऊर्जेवर चालू शकतील अशा मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांचीच आहे हे आपाणा प्रत्येक भारतीयाने आवर्जून लक्षात ठेवायला हवे. डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत. बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले.
२९ एप्रिल १९२७ रोजी- भिसे यांच्या ६० व्या वाढदिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ‘अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. खरं तर १९०८ सालीच युरोपीय व अमेरिकन नियतकालिकांनी भिसे यांना ‘इंडियन एडिसन’ हे बिरुद बहाल केलं होतं. जागतिक दर्जाच्या ‘हु इज हु’ या संदर्भग्रंथात ‘भारताचे एडिसन’ असे म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. त्यावेळी २३ डिसेंबर १९३० रोजी भिसे Shankar Abaji Bhise यांनी आपले आदर्श असलेल्या थॉमस अल्वा एडिसन यांची त्यांच्या प्रयोगशाळेत भेट घेतली. अमेरिकेतल्या ‘हुज हू’मध्ये समावेश झालेले भिसे हे पहिलेच भारतीय.इतकंच नाही तर त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला. शिकागो विद्यापीठाने त्यांना सायको-अॅनालिसिसमधील डॉक्टरेट बहाल केली, तर माऊंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व दिले.
विज्ञान व संशोधनातले नोबेल प्राईज मिळावे अशा तोडीचा हा माणूस होता. तो महाराष्ट्रात जन्माला आला. देशभरात गाजला. एखाद्या व्यक्तीवर टपाल तिकीट निघणे ही आजही सन्मानाची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांत अशा टपाल तिकिटांचा सुकाळ झाला. पण हिंदुस्थानचे ‘एडिसन’ म्हणून ज्यांची ख्याती झाली.भिसे हे खर्या अर्थाने आपले ‘एडिसन’ होते, पण स्वातंत्र्यानंतर हा एडिसन उपेक्षित राहिला. या मराठी शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.
- © योगेश शुक्ल ९६५७७०१७९२
Leave a Reply