Avchitgad Fort

Avchitgad Fort – निसर्गरम्य वातावरणातील मुलखावेगळा अवचितगड

सह्याद्रीतल्या अवशेषांनी युक्त आणि निसर्गाने परिपूर्ण अशा किल्ल्यांची यादी काढली तर त्यात रायगड जिल्ह्यातल्या अवचितगडाचा क्रमांक अग्रणी असेल. रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्याच्या शहरापासून फक्त सात किलोमीटर्स अंतरावर असणारा अवचितगड Avchitgad Fort हा अवशेषांनी समृद्ध आणि सर्वागसुंदर गिरिदुर्ग वर्षभरात कधीही भेट देण्यासारखा आहे. कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला किल्ला म्हणजे अवचितगड. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फ़ूट आहे. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.

अवचितगड हा कोकण आणि देशपठार यांच्यामधोमध असल्यामुळे संदेशवहन व हेरगिरी यांच्यासाठी उपयुक्त किल्ला मानला जाई. नागोठणे बंदर, रोहे बंदर, तळा, घोसाळा या परिसरातील धारा-वसुलीचे काम अवचितगडावरून Avchitgad Fort होत असे. मौर्य, सातवाहन, शक, क्षत्रप, अभीर, त्रैकुटक, वाकाटक, अश्मक, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी कदंब, शिलाहार, यादव, मोगल, मराठे, पेशवे या निरनिराळ्या राजवटींमध्ये किल्ल्यांची वहिवाट होती. इसवी सनपूर्व पाचशेच्या आसपास सुरू झालेली किल्लेसंस्कृती पुढे उत्तरोत्तर प्रगत होत गेली ती सतराव्या शतकापर्यंत. जवळपास दोन-अडीच हजार वर्षांचा हा इतिहास आहे.

अवचितगडावर जाण्यासाठी चार-पाच वाटा आहेत. पण मुख्य वाटा दोन. त्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जातात. ते पूर्वाभिमुख असून त्याच बाजूला गडाचा डोंगर आणि गडाच्या पूर्वेकडील डोंगररांग यांना जोडणारी खिंड आहे. खिंडीत येण्यासाठी मेढा किंवा पिंगळसई या गावांतून रस्ता आहे. मेढा हे गडाच्या उत्तर बुरूजाखाली तर पिंगळसई हे गडाच्या दक्षिणेकडे असलेले गाव आहे. त्याच बरोबर गडावर येण्यासाठी मेढ्यातून उत्तर बुरूजाच्या डोंगरधारेवरून येणारी वाट आहे. दक्षिणेला असलेल्या डोंगरावरून अवचितगडावर येता येते. या चार वाटा साधारण वहिवाटीच्या आहेत. पाचवी वाट ही निडी गावातून गडाच्या पश्चिम बाजूने वर येते. ती अवघड व विशेष वहिवाट नसलेली आहे. निरनिराळ्या राजघराण्यांच्या काळात निरनिराळ्या ठिकाणी नवनवीन नागरी वस्त्या निर्माण होत गेल्या. त्यांच्या संरक्षणाच्या गरजेतून गडकिल्ल्यांचा उदय होत गेला. ज्या परिसरात वस्ती असेल तेथील भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून किल्लेबांधणीचे तंत्र विकसित केले गेले. त्यातून किल्ल्यांचे प्रकार पडले. प्रामुख्याने थळदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग असे तीन प्रकार आहेत. सपाट भूप्रदेशातील थळदुर्ग, दर्‍याडोंगरातील गिरिशिखरांवरील गिरिदुर्ग आणि समुद्रातील बेटांवर उभारलेले जलदुर्ग, बांधणीची शैली, गडाचा आकार यांच्यावरून अनेक किल्ल्यांचे उपप्रकारही केले जातात. कर्नल प्रॉथर या इंग्रज अधिका-याने १८१८ च्या आसपास महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले तोफांचा भडिमार करून उध्वस्त केले.

गडावर पोचण्यासाठी रोह्यातून पिंगळसईमार्गे साधारणपणे दोन ते अडीच तास लागतात. त्यातील अर्धा-पाऊण तास रोह्यातून पिंगळसईत जाण्यास लागतो. पुढे दीड ते दोन तास गडावर चढण्यासाठी लागतात. त्या मार्गे शारीरिक श्रम जास्त लागतात. त्या मानाने मेढामार्गे गेल्यास श्रम व वेळ, दोन्हीची बचत होते. गडावर दरवर्षी काही गोष्टी नेमाने होतात. मेढा ग्रामपंचायतीतर्फे १५ ऑगस्टला व २६ जानेवारीला झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो. गडावर असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी काही भाविक मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी येतात. गडावर येणा-यांची विशेष वर्दळ असते मकर संक्रांतीच्या दिवशी. पिंगळसई, मेढा, निडी, पडम, खारापटी या गावांतील रहिवासी मोठ्या संख्येने गडावर येतात.

किल्ले अवचितगडाच्या मुख्य प्रवेश दरवाजातून डाव्या हातास “शरभ” हे शिल्प दिसेल. हे शिल्प सातवाहन किंवा शिलाहारांच्या काळातले, म्हणजे इसवी सनापूर्वीच्या ८०० ते १००० वर्षे इतके जुने असू शकते. यावरून या “किल्ले अवचितगड”चा भूतपूर्व इतिहास किती जुना आहे हे समजते. गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : “श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा.” दुसऱ्या दरवाज्यात पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उध्वस्त वाडा आहे. वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरूज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत.

गडाचे प्रवेशद्वार, बालेकिल्ल्याच्या कमानी या काळ्या पाषाणातील असून सुबक व मापात दगड तासून, भार देऊन एकमेकांवर बसवलेले आहेत. बांधकामात फार थोड्या ठिकाणी, विशेषत: उत्तर बुरुजाच्या बांधणीत चुनखडीचा वापर सांधे भरण्यासाठी केलेला आहे. गडावरील तटबंदी, पाण्याची टाकी, मंदिर, वाडे हे सर्व बांधकाम ज्या पाषाणात केले आहे तो गडावरचाच आहे. गडावरील सात टाकी समूह व द्वादशकोनी तलाव यांच्या खोदाईमधून निघालेले चिरे बांधकामासाठी वापरले गेले आहेत. उत्तर बुरूज, दक्षिण बुरूज, बालेकिल्ला व प्रवेशद्वार यांच्या कमानी द्वादशकोनी, तलाव-वाड्यांचे चौथरे यांच्यासाठी वापरले गेलेले चिरे हे सुबक आकारातले व सफाईदारपणे तासलेले आहेत. इतर तटबंदीसाठी मात्र चिरे विशेष तासकाम न करता वापरले गेले आहेत. तटबंदीच्या चि-यांमधील सांधे भरण्यासाठी बारीक बारीक दगडी कपच्या वापरलेल्या आहेत. एकूण गडाची बांधकामशैली ही गरजेपुरते काम या तत्त्वाची आहे. कमीत कमी वेळ आणि पैसा खर्च करून उभारणी झालेला किल्ला याचे उत्तम उदाहरण म्हणजे अवचितगड.

अवचितगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वृषभ शिल्प आहे. शिलाहारांचे ते प्रतीक म्हणजे साधारण त्या काळापासून गडावर वहिवाट असल्याचा तो पुरावा मानतात. अवचितगडाच्या इतिहासात मात्र सतराव्या शतकापासूनचे उल्लेख सापडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत गड नगरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांच्या सैन्याने तो १६५८ साली आदिलशहाकडून जिंकून घेतला. चौल-रेवदंड्याचे पोर्तुगीज; तसेच तळे-घोसाळ्यापासून नागोठणे खाडीपर्यंतच्या परिसरावर ठेवता येणारे लक्ष या बाबी नजरेत घेऊन महंमद शेख या स्थपतीच्या देखरेखीखाली गडाची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यानंतर किल्ला कायम मराठ्यांकडे राहिला. त्याच काळात किल्ल्याची पुन्हा डागडुजी झाली असावी (दक्षिण बुरुजावरील शिलालेख). गड आडवाटेवर व आकारमानाने छोटा असल्यामुळे शत्रूचे त्‍याकडे विशेष लक्ष गेले नाही.दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. त्याची लांबी-रुंदी अनुक्रमे ९०० फूट आणि ३०० फूट आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी आहेत. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे.

गडावर बाजी पासलकर नावाच्या सरदाराची वहिवाट होती. गडावरील सात टाक्यांच्या समुहाजवळ एका स्तंभावर वीरासन घातलेल्या, हातात तलवार व ढाल घेतलेल्या पुरुषाचे शिल्प आहे. तो बाजी पासलकरांचा स्तंभ म्हणून ओळखला जातो. काही लोक त्याला म्हसोबाचे ठिकाणही म्हणतात. शेणवई, धाटाव या गावांमधील पाशीलकर मंडळी बाजी पासलकरांचे वंशज असल्याचे मानले जाते. पुढे पेशव्यांच्या काळात गडावर पुन्हा बांधकाम झाले. तसा शिलालेख गडाच्या दक्षिण बुरूजावर आहे. पुढे, महाराष्ट्राच्या इतिहासाची अधोगती झाली.

मराठेशाहीपाठोपाठ पेशवाई अस्ताला गेली. इंग्रजांचे प्राबल्य वाढले. नवोदित ब्रिटिश सत्ता, कुलाबकर आंग्रे व भोरचे संस्थानिक यांच्याकडील गावांची १८१८ ते १८४० दरम्यान वरच्यावर देवाणघेवाण झाली. ब्रिटिश राजवटीपूर्वी परिसर भोर संस्थानचे पंत सचिव व आंग्रे यांच्यामधे विभागला गेला होता. नागोठणे भागातील खेडी पंत सचिव व आंग्रे यांच्या मालकीची होती. तर अवचितगडमधील खेडी आंग्रे आणि पेशव्यांचे प्रतिनिधी असलेल्या ब्रिटिशांमध्ये विभागली गेली होती. भोर पंत सचिवाने १८३० मध्ये नागोठण्यामधील अर्धा भाग ब्रिटिशांना देऊन ब्रिटिशांनी आंग्रे यांच्याकडून नागोठणा भाग घेतला व त्याबदली अवचितगडाचा निम्मा भाग आंग्रे यांना दिला. देवाणघेवाणीच्या त्या कालखंडात प्रशासनाचा बोजवारा उडाला होता. महसूल-वसुली वंशपरंपरेने आलेली घराणी करत होती. ती घराणी पुढे त्या त्या गावची खोत मंडळी झाली. त्या काळात अवचितगड परिसराच्या महसूल-वसुलीचे काम त्या उपविभागातील दोन प्रभू कुटुंबे पाहात होती असा उल्लेख सापडतो.

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे, मेढा गावातील बाजूने गडावर येण्यास सुरुवात केल्यावर गडाच्या पायथ्याजवळ मोठी विहीर आहे. ती कलावंतिणीची विहीर म्हणून ओळखली जाते. खिंडीत अनेक युद्धशिल्पे आहेत. त्यांना वीरगळ म्हणतात. ते युद्धात कामी आलेल्या शिपायांच्या स्मृतीनिमित्त उभारले जातात. खिंडीच्या पश्चिमेकडे डोंगरावर मुख्य किल्ला आहे. गडावर जाण्यास नागमोडी वळणाची पायवाट आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी पडिक अवस्थेत तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. त्यास मधला मोर्चा म्हणून ओळखले जाते. गडावर हल्ला करणा-या शत्रूला प्रथम खिंडीत गाठले जायचे. तेथून शत्रू गडावर येऊ लागल्यास त्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी, मधल्या मोर्चावर अटीतटीची झुंज द्यावी लागत असे. मधला मोर्चा ओलांडून पुढे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. ते पूर्वाभिमुख व गोमुख पद्धतीचे आहे.

गडाचे प्रवेशद्वार दगडी बांधकामाचे असून प्रवेशद्वाराची कमान सुबक आहे. त्या ठिकाणी भक्कम लाकडी दरवाजा होता. तो बंद केल्यावर सहज उघडू नये म्हणून अडता टाकण्यासाठी बुरूजांमध्येच अडता शिरण्यासाठी दगड कोरलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या समोर डाव्या हाताच्या बुरुजाखाली चौकोनी दगडावर शिल्प कोरलेले आहे. ते वृषभशिल्प म्हणून ओळखले जाते. ते प्रवेशद्वारावर कमानीच्या वर मधोमध लावलेले असते. परंतु कमानीच्या वरचा भाग कोसळलेला असल्यामुळे शिल्पदेखील खाली पडलेले आहे. वृषभाचे शिल्प समुद्र आणि कोकणावर राज्य करणा-या शिलाहारांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर वाड्यांचे चौथरे नजरेस पडतात. गडावरील मुख्य कामकाज त्याच जागी होत असावे, कारण एवढा मोठा चौथरा गडावर इतरत्र आढळत नाही. ऐतिहासिक भाषेत त्या वास्तूस गडाची मुख्य सदर म्हणून ओळखले जाते. प्रवेशद्वारातून चौथरे ओलांडून पुढे आल्यास बालेकिल्ला नजरेस येतो. गडावरील उंच भागास बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मुख्य किल्ला हा तटबंदीने संरक्षित केलेला असतो; तरीही अधिक सुरक्षिततेसाठी बालकिल्ल्याच्या भोवतीही तटबंदी असते. तशी तटबंदी अवचितगड बालेकिल्ल्यास आहे.

त्यात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. पैकी मुख्य प्रवेशद्वारातून आत चौथ-यावरून पुढे आल्यास समोर येणारी बालेकिल्ल्याची कमान उध्वस्त झालेली आहे. तिचे चिरे इतस्तत: विखुरलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या हातास दुसरी कमान आहे. दक्षिणेच्या तटबंदीखाली सहा टाक्यांच्या समुहाजवळ तिसरी कमान आहे. पुढच्या दोन्ही कमानी शाबूत आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आढळणा-या तलावांमध्ये अवचितगडावरील तलाव त्याच्या बांधकामशैलीमुळे चटकन नजरेत भरतो. सुबक पद्धतीने बांधलेला बारा कोनांचा तलाव गडाच्या मानाने खूप मोठा आहे. तलावात उतरण्यासाठी रेखीव पाय-या आहेत. तलावाच्या दोन बाजूंमधील अंतर पन्नास-साठ फुटांच्या आसपास आहे. पाण्याचा उपसा नसल्यामुळे तलावातील पाणी खराब झालेले असून ते पिण्यायोग्य राहिलेले नाही. द्वादशकोनी तलावावरून पुढे शिवमंदिर आहे. मंदिराचा फक्त चौथरा शिल्लक आहे. गाभा-याच्या भिंती दोन फूट उंचीपर्यंत शाबूत आहेत. गाभारा पाच फूट लांबीरुंदीचा असून आतील शंकराची पिंड म्हणजे सुबक कारागिरीचा नमुना आहे. समोर नंदी आहे. उजव्या हातास विष्णूची व देवीची तर डाव्या हातास गणपतीची मूर्ती आहे. मंदिराच्या पाठीमागे खालच्या बाजूस पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. एकूण सात छोटीमोठी पाण्याची टाकी आहेत. पाणी वापरण्यायोग्य आहे. सात टाक्यांच्या समुहाच्या जवळ पिंगळसई देवीची घुमटी आहे. स्तंभ सात टाक्यांच्या जवळ आहे. परंतु त्यातील फक्त तीन फूट उंचीचा चौथरा शाबूत आहे. त्याच्या एका बाजूवर श्री गणेशाय नम: शके १६२३ माघ अशी अस्पष्ट अक्षरे दिसतात. चौथ-याच्या दुस-या बाजूस हाती ढालतलवार घेऊन वीरासन घेतलेल्या पुरुषाचे शिल्प आहे. शिलालेखावरील साल इसवी सन १७०१ दर्शवते. हा चौथरा बाजी पासलकराचा स्मृतिस्तंभ म्हणून ओळखला जातो.

सात टाक्यांच्या समूहाला लागून असलेल्या बालेकिल्ल्यांच्या तटबंदीमधील कमानीखालून जाणारी वाट गडाच्या दक्षिण बुरुजाकडे जाते. दक्षिणेची बाजू तटबंदी बांधून भक्कम केली आहे व त्यावर टेहळणीसाठी बुरूज बांधलेला आहे. तोच दक्षिण बुरूज म्हणून ओळखला जातो. बुरूजावर जाण्यासाठी तटबंदीला लागून वर जाणा-या पाय-या आहेत. तसेच, तटबंदीवरही पाय-या बांधलेल्या आहेत. बुरुजाच्या पूर्वेकडील तटबंदी मात्र पूर्णपणे कोसळली आहे. दक्षिण बुरूजावर येण्यासाठी पायर्‍या चढून वर आल्यावर वेधून घेतो तो बुरूजावरील शिलालेख. तो एक चौरस फूट आकाराचा आहे. गडाच्या दक्षिण बाजूकडून गडाबाहेर जाण्यासाठी तटबंदीमध्ये कमानीचे द्वार आहे, त्यातून बाहेर पडल्यास गडाचे दक्षिण टोक लागते. गडाचे दक्षिण टोक व त्यापुढे असलेला डोंगर यांच्यामध्ये खंदक आहे. खंदकापलीकडचा डोंगर पुढे पडम गावापर्यंत उतरत गेलेला आहे. डोंगरावरून शत्रू गडावर येऊ नये म्हणून त्या दोन डोंगरांमधील भाग खणून खंदक तयार करण्यात आला आहे. दक्षिण बुरूजावरून पूर्वेकडील तटबंदीच्या बाजूने येणारी वाट पुन्हा मुख्य द्वाराकडे येते. त्या वाटेवर प्रवेशद्वाराच्या आधी एक तोफ आहे. तीमध्ये तोफगोळा अडकलेला आहे. दुसरी तोफ गडाच्या उत्तर बुरूजाकडील पूर्व बाजूच्या तटबंदीजवळ आहे. तटबंदी कोसळल्यामुळे दरीत कोसळलेली हीच ती तोफ. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून उत्तरेकडे जाताना छोटीशी टेकडी आहे. त्यावर काही बांधकाम ढासळलेल्या अवस्थेत आहे. तो गडावरील टेहळणी बुरूज. टेहळणी बुरूजावरून पुढे उत्तर बुरूजावर जाता येते. उत्तर बुरुजाच्या पूर्व तटाजवळ छोटा खळगा आहे. तेथून तटाबाहेर पडण्यासाठी चोरवाट आहे. परंतु ती मातीचा भराव होऊन बुजली गेली आहे.

पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे, इ. प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगड, धनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इ. परिसर न्याहळता येतो.