माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माणसांच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला विसरू नये. एरवीदेखील एका दिवसाच्या ट्रेकसाठी ‘पेब’ सारखी जवळची आणि निसर्गरम्य जागा शोधून सापडणार नाही. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट ,वरील गुहेची रचना ,गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड ‘गोरखगडाशी’ साधर्म्य साधतो. मात्र त्यामानाने हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड Fort Vikatgad असे देखील नाव आहे.
पनवेलच्या ईशान्येला मुंबई पुणे लोहमार्गावरील नेरळपासून पश्चिमेला चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला आहे. या किल्ल्याचे पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड Fort Vikatgad असे देखील नाव आहे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता असा ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ माथेरान या ठिकाणांहून वाटा आहेत. माथेरान-नेरळ रस्त्यावर आणि रेल्वे मार्गावर वाटर पाईप स्टेशननंतर रेल्वे लाईन रस्त्याला आडवी जाते तिथे “पेब/प्रती गिरनार” जाण्याचा मार्ग असा बोर्ड लावलेला आहे. येथवर एसटी किंवा खाजगी वाहनाने पोहोचता येते. या ठिकाणाहून रेल्वे मार्गाने चालायला सूरुवात करावी. पुढे वळसा घेऊन रेल्वे लाईन एका खिंडीत पोहोचते. या खिंडीतून समोरच्या डोंगरावर गेलेल्या तारा दिसतात. तारा समोर ज्या डोंगरावर गेल्या आहेत तो डोंगर म्हणजेच विकटगड.
ही खिंड पार केल्यावर रेल्वे रुळालगतच उजव्या बाजूला लोखंडाची भगव्या रंगाची कमान दिसते. त्यावर छोटी घंटी लावलेली असुन खाली उतरण्यासाठी लोखंडी शिडी आहे. रस्त्यापासून या कमानीपर्यंत येण्यास पाऊण तास लागतो. समोरच पेबचा किल्ला व किल्ल्याची तटबंदी दिसते पण तेथे जाण्यासाठी खाली दरीत उतरावे लागते. या वाटेवर ठिकठिकाणी झाडांच्या खोडांवर पेब किल्ल्यावर जाण्याचा मार्गदर्शक फलक लावलेला आहे. इथून काही अंतर पार केल्यावर दुसरी शिडी लागते. हि शिडी उतरल्यावर दरीत उतरून पुन्हा पेबच्या किल्ल्याचा डोंगर चढून डाव्या हाताच्या कातळाचा आधार घेत वाट डोंगराच्या कडेकडेने पेब व माथेरानचा डोंगर यामधील खिंडीत येते. येथून समोर गडावरील एकमेव बुरुज दिसतो. या वाटेने पुढे सरकल्यावर डोंगराला उभी करून ठेवलेल्या दोन शिड्या दिसतात. शिडी अभावी गडावर जाणे मुष्कील आहे. Fort Vikatgad
या शिडीजवळ कातळभिंतीत एक नेढ आहे. ही शिडी चढल्यावर आपण महादेवाचे मंदिराजवळील पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचतो. गडावर जाताच डाव्या हाताला पेब किल्ल्याची उद्ध्वस्त तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. आजमितीस गडावर असणा-या तटबंदीचे हे शेवटचे अवशेष होय. या मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यास २ तास लागतात. आता गडावर जाण्याचा दुसरा मार्ग. नेरळ स्टेशनवर उतरल्यावर स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. डोंगराच्या दिशेने जाताना उजवीकडची वाट पकडून समोर दिसणा-या विजेच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने निघावे. पुढे सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर आल्यावर तेथून पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. हा धबधबा हे या वाटेवरील एक मोठे आकर्षण आहे. या धबधब्याजवळ तीन वाटा आहेत. यातील मधली रुळलेली वाट किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेते. या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढावे आणि खिंडीच्या दिशेने वाटचाल करावी. खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे. पुढे थोडयाच अंतरावर गुहा लागते. प्रथमच या गडावर जाणा-यांनी वाटाडया घेणे हिताचे आहे. या वाटेने किल्ला चढण्यास अडीच तास लागतात.
पेबचा किल्ला या मार्गे चढून आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक प्रचंड गुहा दिसते. या गुहेत ५० जणांची राहण्याची सोय होते. या गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गुहेच्या बाजूला चौकोनी तोंड असलेल्या गुहा आहेत. या गुहांमध्ये रांगत जाता येते. यातील एका गुहेच्या आत खालच्या बाजूला चार पाच माणसे मावतील इतकी मोठी खोली आहे तर एका गुहेच्या आत टोकाला पाण्याच टाक आहे. या गुहांमध्ये जाण्यासाठी विजेरी आवश्यकता आहे. या गुहा पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या भिंतीचे अवशेष दिसतात. त्यावर चढून जाण्यासाठी एक शिडी आहे. या शिडीवर न चढता खालच्या बाजूस गेल्यावर कातळात खोदलेली २ पाण्याची टाक पाहायला मिळतात. पुन्हा शिडीजवळ येऊन शिडी चढून गेल्यावर उजव्या हाताला पाण्याचे कातळात खोदलेले टाक आहे. त्याच्या बाजूलाच हनुमानाची मुर्ती आहे. येथून वर जाण्यासाठी डोंगरात पाय-या खोदून कोरलेली पायवाट आहे. या वाटेवरून जाताना उजव्या हाताला उद्ध्वस्त घरांचे व वाड्याच्या जोत्याचे अवशेष आहेत. तिथून पुढे गेल्यावर आपण एका आश्रमाजवळ पोहोचतो. येथे राहण्याची व चहाची व्यवस्था होऊ शकते. या मंदिराच्या बाजूने किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्याची वाट आहे. या वाटेवर एक शिडी आहे.
ही शिडी चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. येथे दत्ताच्या पादुका आहेत. येथून पूर्वेकडे नेरळ व उल्हास नदी पश्चिमेकडे गाडेश्वर तलाव, पनवेल, उरण, उत्तरेकडे म्हैसमाळ ,चंदेरी, ताहूली ही डोंगररांग व दूरवर मलंगगडाचे सुळके दिसतात. दक्षिणेकडे माथेरनचा डोंगर व प्रबळगड दिसतो. पादुकांचे दर्शन घेऊन परत दत्तमंदिरा जवळ येऊन गडाच्या दक्षिण टोकाकडे जावे. येथे गडावरील एकमेव बुरुज आहे. गडावर येण्यासाठी सांगितलेली पहिली वाट या बुरुजाखालूनच गडावर येते. बुरुज पाहून परत आश्रमाजवळ येउन खालच्या बाजूला गेल्यावर कड्याजवळ पाण्याच्या दोन टाकं आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याच्या पुढे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर पेबी देवीची मुर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या बाजूला थंडगार पाण्याचे टाक आहे. या टाक्याच्या भिंतीवर यक्ष प्रतिमा कोरलेली आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. येथून आल्या मार्गाने किल्ला उतरुन नेरळला किंवा बुरुजाखालच्या वाटेने माथेरान – नेरळ रस्त्यावर पोहोचून नेरळला जाता येते.
Leave a Reply