RamGopal Varma

नवीन चेहर्‍यांना संधी देणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा RamGopal Varma

आज ७ एप्रिल हिंदी चित्रपटसृष्टीत गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड व भूत चित्रपटांची लाट आणणारे प्रयोगशील व कायम नवीन चेहर्‍यांना संधी देणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा वाढदिवस. #RamGopalVarma

रामगोपाल वर्मा यांचा जन्म 7 एप्रिल 1962 ला आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे झाला. रामगोपाल वर्मा यांना लहानपणापासूनच चित्रपटाचे वेड. चित्रपटात दिग्दर्शकाच्या ठिकाणी आपले नाव यावे असे त्यांना फार वाटायचे. चित्रपटाविषयी त्यांच्या कल्पना फार लहानपणीच स्पष्ट झाल्या होत्या. प्राथमिक व अभियांत्रिकी शिक्षण विजयवाडा येथे घेत असतांनाच अचानकपणे अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून एक व्हिडीओ पार्लर सुरु केले. त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील फिल्मसिटीत प्रवेश मिळविला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम करायला सुरवात केली. RamGopal Varma
याच काळात त्यांनी शिवा हा चित्रपट बनविला. कथा, पटकथा व दिग्दर्शन त्याचेच होते. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय बनविलेल्या या चित्रपटात महाविद्यालयीन गुंडागिरीचा विषय होता. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. रामू रात्रीत प्रसिध्दीच्या झोतात आला. त्यानंतर त्यांनी काही तमिळ चित्रपट काढले. पुढे त्यांनी स्वत:ची निर्मिती संस्था स्थापन केली. दक्षिणेत यश मिळविल्यानंतर रामगोपाल वर्मा यांनी बॉलिवूडकडे मोर्चा वळविला.

‘रंगीला’ हा त्यांचा पहिला यशस्वी व्यावसायिक चित्रपट. उर्मिला मातोंडकरला नायिका म्हणून प्रस्थापित करणारा हा चित्रपट खूप गाजला. नंतर राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकरला रंगीला, मस्त, कौन, सत्या आणि भूत यासारख्या सिनेमात काम दिलं होतं सत्यामध्ये मुंबईतील गुन्हेगारी विश्व त्यांनी पहि्ल्यांदाच तपशीलवार दाखवून दिले. गुंडांचे परस्पर व्यवहार, त्यांचे आयुष्य हेही त्यांनी दाखविले. हा चित्रपटही खूप गाजला. विशेष म्हणजे यात कुणीही मोठा कलाकार नव्हता.
यानंतर रामूच्या चित्रपटांची फॅक्टरी सुरू झाली. सत्यानंतर उच्च वतुर्ळातील गुन्हेगारी विश्वाचे दर्शन घडविणारा कंपनी हा चित्रपट आणला. पण त्याला मर्यादीत यश मिळाले. त्यानंतर मग त्याच्या चित्रपटांची रांगच लागली. दौड, प्यार तूने क्या किया, मस्त, रोड, जंगल, नाच. यातील दौड, रोड फारसे चालले नाहीत. त्यांनी अमिताभ बच्चन यांना घेऊन सरकार काढला. हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला. त्यात अमिताभचे पात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतल्याने त्याला प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीही बरीच मिळाली. सरकार हा २००५ साली प्रदर्शित झालेला राम गोपाल वर्माचे दिग्दर्शन असलेला सरकार हा चित्रपट द गॉडफादर ह्या हॉलिवूड चित्रपटावरून प्रेरित आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व के के मेनन ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सरकारमध्ये सुभाष नागरे नावाच्या मुंबईमधील एका बलाढ्य व लोकप्रिय व्यक्तीची व त्याच्या कुटुंबाची कथा रेखाटली आहे. तिकीट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या सरकारचा दुसरा भाग सरकार राज २००८ साली प्रदर्शित करण्यात आला. सरकार प्रमाणेच सरकार राज देखील तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला. २०१७ मध्ये आलेला सरकार ३ ने या सरकार ट्रॉयोलॉजीची सांगता झाली.

पण आजही राम गोपाल वर्माचा RamGopal Varma मास्टरपीस चित्रपट ‘सत्या’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम गँगस्टर चित्रपट म्हणता येईल. कामाच्या शोधात मुंबईत आलेल्या सत्याची कथा आहे. परिस्थिती त्याला गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डच्या जगात घेऊन जाते. ‘सत्या’ चित्रपटात मनोज बाजपेयी मुख्य अभिनेता नव्हता, पण या चित्रपटातील भिकू म्हात्रे या त्याच्या भूमिकेने त्याला स्टार बनवले. उर्मिलाचा साधेपणा हृदयाला भावणारा होता आणि जेडीच्या निरागस डोळ्यांनी लोकांना संमोहित केले.
उर्मिला मातोंडकर, मनोज बाजपेयी आणि सुशांत सिंग अभिनीत हा रहस्यमय-थ्रिलर चित्रपट अंगावर अक्षरशः शहारे आणणारा चित्रपट कौन? हा आहे. चेंबर फिल्म मेकिंगचे हे एक अद्भुत उदाहरण राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटसृष्टीला दिले आहे, कारण संपूर्ण चित्रपट एकाच ठिकाणी शूट केला गेला आहे. या चित्रपटात फक्त तीनच पात्रे आहेत. घरी एकटीॉ असणारी तरुणी टीव्हीवर सिरीयल किलरची बातमी पाहते आणि मग एक अज्ञात व्यक्ती दारावरची बेल वाजवते. राम गोपाल वर्मा यांनी हा चित्रपट इतका सुंदरपणे साकारला आहे की, पाहणाऱ्याची नजर जराही हटत नाही.

राम गोपाल वर्मा RamGopal Varma यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘कंपनी’ हा एक अप्रतिम क्राईम-ड्रामा चित्रपट आहे.’सत्या’ या चित्रपटाचा हा सिक्वेल असून, त्याचा तिसरा भाग रणदीप हुड्डा आणि यशपाल शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘डी’ चित्रपट आहे, असे म्हटले जाते. ‘रक्त चरित्र’ हा चित्रपट दोन भागात बनवण्यात आला होता. याने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही, पण हा एक उत्तम चित्रपट आहे. हा राजकीय-ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून, आंध्र प्रदेशातील दिग्गज राजकारणी परितला रवींद्र यांच्या जीवनावर आधारित आहे.
साठीतला पुरूष व अगदी तरूण स्त्री यांच्यातील प्रेमावर आधारीत निशब्द हा त्याचा चित्रपट गाजला नाही. अमिताभ बच्चन यांची भूमिका असूनही चित्रपट अयशस्वी ठरला. रामूला भय या भावनेविषयी खूप आस्था असल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांनी याविषयावर बरेच चित्रपट काढले. सुरवातीला त्याचा रात हा चित्रपट असाच. नंतर त्यांनी भूत, डरना मना है, डरना जरुरी है हे चित्रपटही दिले. यातील भूतला बरे यश मिळाले. वास्तूशास्त्र पडला. डरनाचे दोन्ही भाग बऱ्यापैकी चालले. त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्टय म्हणजे ते खूप कमी बजेटचे असतात.
त्यांनी त्याच्या कंपनीच्या माध्यमातून अनेक नव्या दिग्दर्शकांना संधी दिली आहे. या सर्व चित्रपटांवरील रामूचा ठसा चटकन लक्षात येतो. त्यांच्या चित्रपटातील रंग, कॅमेऱ्याची हाताळणी हे सारे काही इतरांच्या तुलनेत वेगळे असतात. ‘गन्स अँड थाईज’ हे राम गोपाल वर्मा यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. वर्मा यांनी ना इश्म नावाची एक आत्मकथा लिहिली आहे. ना इश्म चे प्रकाशन डिसेंबर 2010 ला ताज बंजारा हैद्राबाद येथे झाले. कवी, लेखक श्रीराम यांनी रामगोपाल वर्मा यांच्या वेगवेगळ्या प्रसंगी घेतलेल्या भेटी आणि मुलाखतींवर आधारित वोदका विथ वर्मा हे पुस्तक लिहिले आहे. 2015 मध्ये वर्मांनी लिहिलेले गन्स अ‍ॅण्ड थाईज – द स्टोरी ऑफ माय लाइफ हे पुस्तक ब्रूस ली, उर्मिला मातोंडकर, अमिताभ बच्चन, टोरी ब्लॅक आणि काही गुन्हेगारांना समर्पित केले आहे. रामगोपाल वर्मा हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात.
चित्रपटाव्यतिरिक्‍त रामगोपाल वर्मा यांनी रामयूवाद ह्या टॉक शो ची निर्मिती केली आहे. या शो टॉलीवूड चॅनलनर सप्टेंबर 2014 पासून सुरु आहे. या शोमध्ये शिक्षण, धर्म, पौराणिक कथा, लहान मुले, गुन्हे, मृत्यू, महिला, सिनेमा या विषयांवरील रामगोपाल यांचे विचार तथ्यांवर आधारित आहे. या शो चे सूत्रसंचालन साक्षी टी.व्ही.च्या प्रबंध संपादक स्वप्ना करतात.

रामगोपाल वर्मा RamGopal Varma यांना आजवर शूल या चित्रपटासाठी एक राष्ट्रीय पुरस्कार, 1989 ला शिवा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा नंदी पुरस्कार, 1991 ला क्षण क्षणम् साठी सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट पटकथा नंदी पुरस्कार, 1993 ला मनी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट नंदी पुरस्कार, 1999 ला प्रेमकथा या चित्रपटासाटी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नंदी पुरस्कार, 1995 ला रंगीलासाठी फिल्मफेअर बेस्ट स्टोरी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, 1998 सत्या साठी क्रिटीक्स अ‍ॅवार्ड, सर्वोत्कृष्ट चित्रपट फिल्मफेअर, 2003 कंपनी करिता सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक फिल्मफेअर, 2004 भूत व 2006 सरकार चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे फिल्मफेअर मिळाले आहे. तसेच 1999 ला सत्या चित्रपटाकरिता बिमल रॉय मेमोरियल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राम गोपाल वर्मा यांनीही उडी घेतली असून, साऊथ सुपरस्टार पवन कल्याण यांच्याविरोधात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आंध्र प्रदेशच्या पीठापुरमधून निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *