सतारवादनाच्या रूपाने अखिल विश्वाला भारतीय शास्त्रीय संगीताची मोहिनी घालणाऱ्या पंडीत रविशंकर Ravishankar यांची ७ एप्रिल जयंती.
रवीन्द्र शंकर यांचे मूळ गाव बांग्लादेशाच्या नडाईल जिल्ह्याच्या कालिया तालुक्यात आहे. त्यांचा जन्म भारतातील काशी शहरात झाला. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. रविशंकर Ravishankar यांचे मुळ आडनाव ‘चटोपाध्याय’ असं होतं. परंतु ब्रिटिशांना ते उच्चारणं कठीण जात असे, म्हणून ‘चटोपाध्याय’चे चौधरी झाले. आणि नंतर त्यातील ‘चौधरी’ही गळून पडलं. त्यांचे वडील श्याम शंकर हे संस्कृत पंडित तर होतेच, परंतु त्याशिवाय ते कायदेतज्ञही होते. कलकत्ता विद्यापिठाची एम.ए. पदवी आणि लंडनच्या मिड्ल टेम्पलची बार ऍट लॉ पदवीही त्यांनी घेतली होती. गौतम बुद्धावर आणि ‘विट अँड विस्डम ऑफ इंडिया’ अशी पुस्तकंही त्यांनी लिहिली होती. रविशंकरांना मात्र पित्याचा सहवास आणि प्रेम फारसं लाभलं नाही. एकदा रविशंकर रवीन्द्रनाथांना भेटायला आणि त्यांच्या पाया पडायला गेले होते. त्यावेळी ‘वडिलांसारखा मोठा हो’ असा आशीर्वाद गुरुदेव टागोरांनी त्यांना दिला होता.
रविशंकरांच्या Ravishankar वडिलांची, ते लंडनमध्ये एका खटल्यासाठी कार्यरत असताना हत्या झाली. वडिलांची हत्या झाली, तेव्हा रविशंकर आपल्या भावाच्या नृत्य मंडळीबरोबर पूर्वेकडील देशांच्या दौ-यावर होते. ते हिन्दुस्थानात परतले. मात्र त्यांच्या वडील बंधूंना पुन्हा युरोपच्या दौ-यावर जायचं होतं. त्यावेळी मुख्य संगीतकार या नात्याने अल्लाऊद्दीन बाबा दौऱ्यावर असणार होते. आईने रविशंकरांना अल्लाऊद्दीन बाबांच्या पदरात सोपवलं. अल्लाऊद्दीन बाबांच्या छत्राखाली पुढली दहा वर्षं रविशंकरांनी काढली. सख्त तालीम आणि त्यांचा दांडगा अभ्यास यांच्या मुशीतून रविशंकर घडले. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडील शिक्षण १९४४ पर्यंत चालले.
रविशंकर Ravishankar यांचे संगीत व्यक्तिमत्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्त्य संगीतकार जॉर्ज हॅरिसन यांच्या सोबत जाझ संगीताचे कार्यक्रम केले. अभिजात पाश्चात्त्य संगीत व भारतीय लोकसंगीत अशा विविध प्रवाहांवर त्यांनी काम केले.
रविशंकर यांनी १९३९ साली अहमदाबाद शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच त्यांच्या सांगीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट,धरती के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहॉंसे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले.इ.स. १९४९ साली रविशंकर दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. इ.स. १९५० ते इ.स. १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपू त्रयी – (पथेर पांचाली, अपराजित व अपूर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले. पंडित रविशंकर यांनी मुंबईत इ.स. १९६२ साली व लॉस ॲन्जेलिस येथे १९६७ साली किन्नर स्कूल ऑफ म्युझिकची स्थापन केली.
इ.स. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर इ.स. १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत अनेक कार्यक्रम केले. यांत एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे. इ.स. १९६५ साली बीटल्सपैकी एक, जॉर्ज हॅरिसन यांनी सतार शिकण्यास सुरुवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थापित झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढण्यास मदतरूप ठरले. जॉर्ज हॅरिसन हे रवि शंकरांचे पॉप जगतातील “मेन्टर” (पालक) मानले जातात. या काळात रविशंकरांनी कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, आणि १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यांत भाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत.
इ.स. १९७१ सालच्या बांग्लादेश मुक्तिसंग्रामास पाठिंबा दर्शविणाऱ्या जॉर्ज हॅरिसन आयोजित न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध कन्सर्ट फॉर बांग्लादेश या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली. पाश्चात्त्य संगीतविश्वातील विख्यात असामी व व्हायोलिनवादक यहुदी मेनुहिन यांच्या सोबत केलेले सतार-व्हायोलिन कॉंपोझिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी नेऊन ठेवले. त्यांचे आणखी एक विख्यात कॉंपोझिशन म्हणजे जपानी बासरी साकुहाचीचे प्रसिद्ध वादक ज्यॅं पियेरे रामपाल, गुरू होसान यामामाटो व कोटो (पारंपरिक जपानी तंतुवाद्य – कोटो)चे गुरू मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे कॉंपोझिशन. १९९० सालचे विख्यात संगीतज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना पॅसेजेस ही त्यांची आणखी एक उल्लेखनीय रचना. २००४ साली पंडित रविशंकर Ravishankar हे फिलिप ग्रासच्या ओरायन रचनेत सतारवादक म्हणून सहभागी झाले होते.
रविशंकरांनी ज्या-ज्या क्षेत्राला स्पर्श केला, त्याचे सोने केले. त्यांनी ‘सिंहेन्द्रमध्यम’, ‘अभोगी’, ‘जनसंमोहिनी’सारखे दाक्षिणात्य संगीतातले राग हिन्दुस्थानी वाद्यसंगीताच्या कक्षेत आणले. Ravishankar ‘तिलकश्यामं’, ‘बैरागी भैरव’, ‘नटभैरव’, ‘चारुकंस’, ‘जोगेश्वरी’ वगैरे रागांची निमिर्ती केली. त्यांच्यातील रचनाकार सदैव जागा आणि दक्ष असे. चित्रपट संगीताच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी केवळ स्तिमित करणारी आहे. १९५०च्या पूर्वी ‘धरती के लाल’ आणि ‘नीचानगर’ या ‘इप्टा’च्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. सत्यजित राय यांच्या ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसारं’ या अजरामर चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत तर केवळ अविस्मरणीय होतं. ‘अनुराधा’ चित्रपटासाठी त्यांनी रचलेल्या ‘जाने कैसे सपनेमें’, ‘कैसे दिन बीते’, ‘हाय रे वो दिन क्यों ना आये’ या गीतांच्या चाली गानरसिकांना आजही भुरळ घालत आहेत. ‘गोदान’मधील ‘पिपराके पतवासरीख डोले मनवा’ किंवा गुलजारच्या ‘मीरा’मधील ‘बाला मैं बैरागन’ या लोकधुनांवर आधारलेल्या गीतांची गोडी तर अवीटच आहे. अवघ्या जगतात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या ‘चार्ली’ आणि रिचर्ड अॅटेनबरोचा ‘गांधी’ या चित्रपटांचं संगीत दिग्दर्शनही रविशंकरांचंच होते.
रविशंकर यांचे पहिले लग्न त्यांचे संगीत गुरू अलाउद्दीन खान यांची मुलगी अन्नपूर्णा देवी यांच्या सोबत इ.स. १९४१ मध्ये झाले आणि इ.स. मध्ये शुभेन्द्र उर्फ शुभो शंकर चा जन्म झाला. इ.स. १९६२ मध्ये रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्यात घटस्फोट झाला. इ.स. १९४० साली त्यांचे संबंध एक नर्तकी असलेल्या कमला शास्त्री सोबत होते, ते इथून पुढे सुरू झाले. न्यूयॉर्क संगीत समारोहाच्या निर्माती स्यू जोन्सशी झालेल्या अफेअरमुळे इ.स. १९७९ मध्ये गायिका नोरा जोन्सचा जन्म झाला. यामुळे रविशंकर आणि कमला शास्त्री इ.स. १९८१ मध्ये विभक्त झाले. त्यानंतर इ.स. १९८६ पर्यंत रविशंकर स्यू जोन्स बरोबर राहिले. इ.स. १९७० पासून परिचित असलेल्या सुकन्या राजन यांच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून त्यांची मुलगी अनुष्का शंकर यांचा जन्म इ.स. १९८१ मध्ये झाला. त्यामुळे इ.स. १९८९ मध्ये त्यांनी हैदराबादच्या चिलकूर मंदिरात सुकन्या राजनशी लग्न केले.
पंडीत रविशंकर Ravishankar यांना १९६२ साली भारतीय कलेचे सर्वोच्च सन्मान पदक राष्ट्रपती पदक, १९८१ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण, १९८६ साली भारताच्या राज्यसभेचे सदस्यत्व, १९९१ साली फुकोदा एशियन कल्चरल प्राइझेस, १९९८ साली स्वीडनचा पोलर म्युझिक प्राइज (रे चार्ल्स सोबत), भारत सरकारकडून पद्मविभूषण, भारत सरकारकडून देशिकोत्तम, १९९९ साली भारत सरकारकडून भारतरत्न, २००० साली फ्रेन्च सर्वोच्च नागरी सन्मान लिजियन ऑफ अनार, २००१ साली राणी दुसरी एलिजाबेथ यांच्याकडून ऑनररी नाईटहूड, २००२ साली भारतीय चेंबर ऑफ कॉमर्सचे लाइफ टाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड, २००२ चे २ ग्रॅमी पुरस्कार, २००३ साली आय.ई.एस.पी.ए. डिस्टिंगविश्ड आर्टिस्ट ॲवार्ड, लंडन, २००६ साली फाउंडिंग ॲम्बॅसेडर फॉर ग्लोबल एमिटि ॲवॉर्ड, स्यान डियेगो स्टेट विद्यापीठ, एकूण १४ सन्माननीय डी.लिट्. पदव्या, मॅगसेसे पुरस्कार, मनिला, फिलिपाइन्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून ग्लोबल ॲम्बॅसेडर ही उपाधी आदी पुरस्कार मिळाले आहेत.
पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगाला आपल्या स्वर्गीय संगीताच्या सेतूने जोडणारे पंडित रविशंकर Ravishankar यांचे दि. ११ डिसेंबर २०१२ ला वयाच्या ९२ व्या वर्षी अमेरिकेतील रुग्णालयात वद्धापकाळ तसेच आजारपणाने निधन झाले. भारतीय शास्त्रीय संगीताची पताका पाश्चिमात्य जगात डौलाने फडकविणाऱ्या या अवलिया संगीतकारास भावपूर्ण आदरांजली!
- © योगेश शुक्ल ९६५७७०१७९२
Leave a Reply