ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक किल्यांपैकी एक, स्वराज्याची पहिली राजधानी आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला गडांचा राजा राजगड. Rajgad Fort आज एवढ्या वर्षानी फार कमी देखरेखीत असला तरीही भक्कम उभा आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी भेट द्यावा आणि ती दिल्यावर पुन्हा पुन्हा भेट द्यायला लावेल असा हा राजगड.
इसवी सन १६४८ ते १६७२ तब्बल पंचवीस वर्षे महाराजांनी इथे वास्तव्य केले. शिवरायांच्या सहवासाचे सर्वाधिक भाग्य जिजाबाईंच्या खालोखाल राजगडालाच Rajgad Fort मिळाले असेल. अनेकदा वाटते, महाराजांचे हे वास्तव्य राजगडाच्या अभेद्यपणातून होते, की त्याच्यावरील प्रेमातून!..त्यांच्या या वास्तव्यात या गडाने छत्रपती राजारामांचा जन्म अनुभवला, तसाच सईबाईंचा मृत्यूही सोसला. अफझलखानाच्या वधासाठी महाराज याच गडावरून बाहेर पडले आणि आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी पहिले पाऊलही राजगडावरच टाकले. ..स्वराज्याचे पहिले पाऊल ते हिंदवी सत्तेचा तो उत्कर्ष, सारे, सारे या गडाने पाहिले. घरातील एखाद्या बुजुर्गाच्या नात्याने, शिवरायांवर सतत आशीर्वादाचा, मायेचा हात ठेवत! असा हा राजांचा गड आणि गडांचा राजा- राजगड! शरीराने आता थकला आहे, मनाने भागला आहे.पण अभेद्य उभा आहे.
‘राजगड Rajgad Fort हा अतिशय उंच आहे. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ आहे. त्याचा घेर बारा कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगरदऱ्यांतून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे कुणीही फिरकू शकत नाही..’ स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाबरोबरच्या साकी मुस्तैदखान याने शिवरायांच्या राजगडाबद्दल ‘मासिरे आलमगिरी’ या ग्रंथात केलेले हे वर्णन! स्वकीयांनी केलेल्या कौतुकापेक्षा शत्रूने व्यक्त केलेले हे भयच राजगडची खरी ओळख करून देते. हीच ओळख ठेवून कानंदी अन् गुंजवणीच्या खोऱ्यात उतरावे आणि या गडाचे भारदस्त, पुरुषी, रांगडे रूप डोळय़ांत सामावून घ्यावे! खरेतर राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. पण त्यातूनही वर्षां ऋतूने श्रावण-भाद्रपदात प्रवेश केला, पाऊस, ढग-धुके आणि हिरवाई-रानफुलांच्या सहवासात या राजगडाचा प्रत्येक कोन, दृश्य बदलून जातो. वास्तूंचे रूप खुलते.
चौदाशे मीटर उंचीचा हा डोंगर मुरुंबदेवाचा म्हणून मुळात ओळखला जाई. हा मुरुंबदेव बहुधा ब्रह्मदेवाचा अपभ्रंश! यासाठी दाखला म्हणून गडावरील ब्रह्मर्षीचे मंदिर दाखवले जाते. पण अनेकदा अपभ्रंश उच्चारातही एक ग्रामीण लडिवाळ वाटतो. ब्रह्मदेवापेक्षाही ‘मुरुंबदेवा’चेही असेच काही! सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वीपासून हा डोंगर प्रसिद्ध आहे, असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून वाटते. एका ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.
इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला, निजामशाहीकडून आदिलशाही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिळीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखानाकडे दिला. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिळीमकरांचा नंतर सन्मानही केला.
महाराजांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, ‘महाराजांनी शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.’ सभासद बखर म्हणते की, ‘मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. बखरकार सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणले आहे.’ मात्र महाराजांनी तोरण्यापाठोपाठ हा डॊंगर जिंकून घेतला, हे नक्की. डॊंगरावर किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाट्याने केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यांसही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले.
इसवी सन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवाजीच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मॊगलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे’सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली. वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे, निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.’
शिवाजी महाराज आग्ऱ्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरूप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरूनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले आणि राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलविली.
३ एप्रिल १६८० रोजी महाराजांचे निधन झाल्यावर मराठी राज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारले यानंतर मोगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मोगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने ‘कानद खोऱ्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मोगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ‘ असा आदेश दिला होता. पुढे ११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही.
राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून जावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच; त्याच उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडिमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड’असे ठेवले. २९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला.
पुणे-बंगलोर महामार्गावर पुणे जिल्हय़ातील नसरापूरहून एक फाटा वेल्हय़ाकडे वळतो. या मार्गावरच मार्गासनी हे गाव लागते. या गावातून साखर, गुंजवणे, वाजेघर, पाली आणि भूतोंडे गावाकडे एक वाट जाते. या सर्व गावांच्या बरोबर मध्यभागी, डोईवरच साऱ्या मुलखावर नजर ठेवून राजगड कधीचा ठाण मांडून बसला आहे. गुंजवण्यातून गुंजण दरवाजाने, साखरमधून चोरदिंडीने, वाजेघर-पालीतून पाली दरवाजाने आणि भूतोंडेतून अळू दरवाजाने राजगडात शिरता येते. पालीकडून येणारा गडाचा राजमार्ग! पायथ्याच्या पाल ऊर्फ पाली गावातही राजवाडा होता. त्याचे अवशेष आजही दिसतात. या गावातच गडाचे मुख्य हवालदार भोसले कुटुंबीयांचे वंशज आजही राहतात. या पाली मार्गाने गडावर निघालो, की तासादोन तासांत आपण पाली दरवाजात हजर होतो.
गडाच्या मध्यावरच्या सपाटी आणि हाराकिरीच्या जागेला तटबंदीचे शेलापागोटे चढवले की ती होते माची. अनेक गडांना ही माची दिसते. राजगडाचे नशीब या बाबतीत थोडे थोर; ज्यातून या गडाला पद्मावती, संजीवनी आणि सुवेळासारख्या तीन लढाऊ माच्या मिळाल्या. जणू स्वराज्यासाठी लढणाऱ्या या महिषासुरमर्दिनी, दुर्गा आणि कालीच!
स्वराज्याच्या राजधानीचे हे जणू बलदंड बाहू. मुघलांच्या आक्रमणावेळी या माच्यांनीच अगोदर हा गड लढवला. याबाबत मुस्तैदखान म्हणतो, ‘राजगडाभोवतीच्या या माच्या म्हणजे तीन स्वतंत्र किल्ले आहेत. त्यांच्या भक्कम तटबंदीमुळे हा किल्ला जिंकणे अशक्य आहे. तटाच्या खाली भयंकर दऱ्या आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्या वाटा अतिशय अवघड आहेत.’
राजगडाची इतिहासातील ही अशी वर्णने वाचावीत आणि त्याचे दडपण घेतच गडावर दाखल व्हावे. गडावर येणाऱ्या बहुतेक वाटा यातील पद्मावती माचीवर दाखल होतात. यातल्याच पालीमार्गे महादरवाजात यावे. पाली दरवाजा! एकाखाली एक दोन कमानी असलेले हे गडाचे महाद्वार. अन्यत्र असणाऱ्या चौक्या-पहारे असे सारेकाही या बांधकामात, पण त्याहीपेक्षा गडाचा दरवाजा पर्वताला समांतर बांधत दडवून ठेवण्याचे ‘गोमुखी’ शिवदुर्गविज्ञानही इथे आहे.
पद्मावती माचीवर बऱ्यापैकी सपाटी असल्याने शिवकाळात इथे मोठी वहिवाट होती. राजांचा राहता वाडा, हवालदार-किल्लेदाराचे वाडे, शिबंदीची घरे, रत्नशाळा, सदर, पद्मावती-रामेश्वराचे मंदिर, सईबाईंची समाधी, पद्मावती तलाव व अन्य तळी, धान्याची- दारूगोळय़ाची कोठारे, चोरदिंडी, गुंजण दरवाजा या साऱ्यांमधून ही माची बराच इतिहास सांगते-दाखवते!
पश्चिमेकडील तीन टप्प्यांत उतरणारी संजीवनी माची तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब पसरलेली आहे. या दरम्यानच्या तटात तब्बल १९ बुरूज येतात. सामान्यत: कुठल्याही गडकोटांना तटबंदीचा एकच पदर असतो. पण राजगडावरील सुवेळा आणि संजीवनीच्या या तटास बाहेरून आणखी एक चिलखत चढवले आहे. या एकात एक असलेल्या बुरुजांमध्ये ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग ठेवलेले आहेत. माचीच्या आतील मोकळय़ा जागेत घरांचे काही अवशेष दिसतात. त्यांच्यासाठी टाक्या खोदत पाण्याचीही जागोजागी सोय केलेली आहे. वर-खाली, सर्पाकार होत धावणारी दुहेरी तटबंदीची ही माची दूरवरून एखादी सळसळती नागीणच वाटते. गडकोटांचे हेच गूढ घेऊन या माचीवर उतरावे, दुहेरी तटांमधील नाळेतून भय घेत फिरावे.. बुरुजांमध्ये उतरणारे दिंडी दरवाजे, तोफेच्या कमानी, माऱ्याच्या जंग्या आणि वन्यप्राण्यांची शिल्पे हे सारे आपल्याकडे रोखून पाहात असतात.. संजीवनीचे हे अद्भुत दर्शन अंगी शिवकाळाचा ज्वर चढवते. तो अंगी घ्यायचा आणि पूर्वेच्या सुवेळा माचीवर उतरायचे.
गडाची ही धाकटी माची. पूर्वेकडे तोंड केलेली, ‘सु’वेळी खुलणारी म्हणून सुवेळा! तिच्यात पोहोचण्यापूर्वीच एका डुब्यावर तानाजी मालुसरे, येसाजी कंक आणि शिळीमकर या सरदारांची उद्ध्वस्त घरटी त्यांच्या कथा ऐकवतात. यांच्यापुढे मजबूत बांध्याचा झुंजार बुरूज लागतो. तो पाहात लगतच्या एका दिंडीदरवाजाने सुवेळावर उतरायचे. इथे तटातच एका घुमटीतील गणेश कैक सालापासून या परिसरावर श्रद्धा ठेवून आहे.
सुवेळाच्या मधोमध एक कातळ उभा ठाकला आहे. समोरून त्याचा आकार एखाद्या हत्तीसारखा वाटतो. या कातळाच्या पोटात शे-पन्नास माणूस बसू शकेल असे आरपार पडलेले छिद्र आहे. या भौगोलिक आविष्कारास कोणी ‘नेढे’ म्हणतात, तर कोणी ‘वाघाचा डोळा’! नाव काही का असेना, पण याची नजर एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे दहा-पंधरा किलोमीटरच्या परिघात सर्वत्र फिरत असते. हे नेढे आणि पुढची सुवेळा फिरायची आणि मग बालेकिल्ल्याची वाट धरायची.
चिलखती बांधणीच्या माच्यांप्रमाणेच अभेद्य बालेकिल्ला हेही राजगडाचे वैभव! सात-आठशे फूट उंच, चहूबाजूंनी तुटलेले कडे अशा या बालेकिल्ल्याबद्दल पं. महादेवशास्त्री जोशी लिहितात- ‘..साडेचार हजार फूट उंचीला भिडणारा हा खडक म्हणजे ‘शुद्ध दगड’ आहे. मेघ शिळधारी वर्षतात, पण तिथे तृणबीजही उगवत नाही, मग झाडे-झुडपे कुठली! तो पावसात भिजतो, वाऱ्यावर सुकतो आणि उन्हात तापतो, जणू युगायुगांचा उभा अनिकेत तपस्वीच!’
सुवेळा आणि पद्मावतीच्या मधूनच या बालेकिल्ल्यावर वाट निघते. निघते म्हणजे, कडय़ावर चढते. खोबण्या तयार करत केलेल्या या वाटेवर पाय रोवत आणि शरीर वर सरकवत चढावे लागते. पण एवढे कष्ट करत वर आलो, की दिसणारे महाद्वार सारे कष्ट तिथल्या तिथे फेडून टाकते. दरवाजाचे हे शिल्प म्हणजे उभ्या कातळातील एक सुरेख कोंदण!
वर आलो, की चहू दिशा उजळतात. सिंहगड, पुरंदर-वज्रगड, रोहिडा, रायरेश्वर-कोळेश्वरचे पठार, त्यामागचा कमळगड, पाचगणी-महाबळेश्वर, प्रतापगड-मकरंदगड, पश्चिम अंगाचा लिंगाणा, त्यामागचा रायगड आणि अगदी हातावरचा राजगडाचा धाकटा भाऊ तोरणा असे बरेच मोठे ‘स्वराज्य’ दिसू लागते. खुद्द बालेकिल्ल्यावर जननी, ब्रह्मर्षीचे मंदिर, राजांचा राहता वाडा, अंबरखाना, तळी अन्य घरांचे अवशेष दिसतात. हा सारा परिसर आणि हे अवशेष पाहिले, की शिवकाळाची गुंगी चढते.
प्रत्येक वास्तूच नाहीतर सगळा राजगडच खरेतर शिवरायांचा पदस्पर्श-सहवास अनुभवलेला, त्यामुळे इथला दगड ना दगड देवघरातील एखादा टाक वाटावा असा! जागोजागी शिवाजीमहाराजांचे पुतळे उभे करण्यापेक्षा या खऱ्याखुऱ्या शिवसृष्टीचे जतन करणे गरजेचे आहे. पण आमच्या नतद्रष्टेपणामुळे आम्ही आहे, त्या वास्तूंची देखील वाट लावली आहे. इथल्या सदरेचेच एक उदाहरण पाहूयात. भोर संस्थानच्या ताब्यातून भारत सरकारकडे हस्तांतर होताना ही सदर छतासह सुस्थितीत होती. या वास्तूत छत्रपती शिवराय जिथे बसत त्या जागी संस्थानच्या काळात शेवटच्या दिवसापर्यंत लोड-तक्के ठेवून पूजा करत रोजचा कारभार केला जाई.
स्वातंत्र्यवर्षांच्या या कालखंडातच ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ग. ह. खरे यांनी लिहिलेल्या ‘स्वराज्यातील तीन दुर्ग’ या पुस्तकात सुरुदार नक्षीचे खांब, भिंती, कोनाडे असलेल्या या सदरेचे एक दुर्मिळ छायाचित्र प्रसिद्ध झालेले आहे. खरेतर त्याचवेळी या सदरेची काळजी घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. पुढे १९६०च्या दशकात ज्येष्ठ दुर्गअभ्यासक आणि साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी राजगडाच्या काढलेल्या छायाचित्रांत या सदरेच्या जागी सुरुदार नक्षीचा केवळ एक खांब उभा असलेला दिसत आहे. दहा-वीस वर्षांत सारी इमारत नष्ट झाली. गोनीदांच्याच छायाचित्रसंग्रहात या सदरेपुढे एक बांधीव ओटाही दिसत आहे. पण पुढील दहा-वीस वर्षांत हा खांब आणि ओटाही गायब झाला. यानंतर पुढील अनेक वर्षे या सदरेच्या जोत्याचे तळखडे दिसत होते. पण आता गेल्या पाच-दहा वर्षांत जीर्णोद्धाराच्या नावाखाली या सदरेचे हे सारे ऐतिहासिक दृश्यच पार पुसून टाकले आहे. १९५०-६०पर्यंत निसर्गाच्या असंख्य तडाख्यांना तोंड देत अडीचशे वर्षे टिकलेली वास्तू पुढे स्वातंत्र्यानंतर केवळ साठ वर्षांत पार नाहीशी झाली. काय म्हणायचे याला? ऐतिहासिक वास्तूंच्या या नामशेषास निसर्ग किती आणि आमचे करंटे हात किती जबाबदार?
कर्जत, पाली, पुणे, गुंजवणे या बसस्थानकांवरून जाणाऱ्या महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या एस्टी गाड्या किंवा खाजगी वाहने. गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. १.गुप्त दरवाज्याने राजगड : पुणे – राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. त्यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात. २.पाली दरवाज्याने राजगड : पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे खरीव या गावी उतरुन कानंद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा.ही वाट पायऱ्याची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात ३.गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे-वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये.
४.आळू दरवाज्याने राजगड : भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो. ५.गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची : गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते. आजही गडावर १५० ते २०० माणसांना राहण्याची, जेवणाची सोय गावकरी बारा महिने करतात (हॉटेल नाहीत). राहण्यासाठी पद्मावती देवीचे देऊळ, भक्त निवास आणि शासकीय विश्रामगृह आहेत तसेच पिण्याच्या पाण्याच्या २ विहिरी असून त्यांना १२ महिने पाणी असते.
Leave a Reply