केलॉग कॉर्नफ्लेक्स कंपनीचा संस्थापक विली किथ केलॉगचा आज ७ एप्रिल जन्मदिन.
सकाळी उठल्यानंतर आपली सर्वात पहिली गरज असते ती नाश्त्याची. आज नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येक गृहिणीला दररोज पडणारा प्रश्न. आपल्याकडे अनेक पारंपरिक पदार्थ नाश्त्याला खाल्ले जातात. अगदी शिरा-कांदेपोहे पासून बाहेरुन आलेले ब्रेड जॅम, टोस्ट या आधुनिक पदार्थांचे पर्याय आपल्यासमोर असतात.मात्र हे पारंपरिक पदार्थ मागे पडून आता वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश आपल्या नाश्त्यात झाला आहे. सध्या डायेटचे मोठे फॅड आलेले आहे तसेच लो-कॅलरी फूडचेही फॅड आलेले आहे. यातले बरेचसे खाद्यपदार्थ पाश्चिमात्य देशाकडून आलेले आहेत.
लहान मुलांमध्ये एक असा खाद्यपदार्थ सध्या प्रचंड लोकप्रिय झाला आहे जो पौष्टिक आहे पण चवदारही आहे आणि तरीही जंक-फुडमध्ये मोडत नाही. विविध धान्यांपासून तयार केलेल्या फ्लेक्सची निर्मिती करणाऱ्या विशेषतः मक्यापासून निर्मित झालेल्या फ्लेक्सचा विषय निघाला म्हणजे आठवते एकच नाव केलॉग. Kellogg
केलॉगचा संस्थापक विली किथ केलॉग याच्या आयुष्यात ७ हा आकडा महत्वाचा ठरला. त्याचा जन्म ७ तारखेचा, आठवड्यातील ७व्या दिवसाचा. त्याच्या वडिलांचाही तो ७वा मुलगा, तसेच त्याचे वडीलही त्याच्या आजोबांचे ७वेच सुपुत्र होते. शिवाय Kellogg या त्याच्या आडनावातसुद्धा बरोबर ७च अक्षरे होती. म्हणूनच आयुष्यभर तो ७ आकड्याशी प्रामाणिक राहिला. स्वतःच्या मोटारीचा नंबरसुद्धा ७ आकडा पाहूनच घेई, कोणत्याही हॉटेलमध्ये रूमचा नंबरसुद्धा ७ च असला पाहिजे असा त्याचा आग्रह असे, त्याशिवाय तो त्या हॉटेलमध्ये थांबत नसे.
विलीचे आई वडील खूपच धार्मिक आणि शुद्ध शाकाहारी होते. लहानपणापासूनच कष्टाची कामे केल्यामुळे विलीच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला होता. त्याचे बरेचसे दातही पडायला लागले होते. शेवटी तो त्याच्या मोठ्या भावासोबत, जॉनसोबत काम करू लागला. हेच दोघे केलॉग बंधू पुढे व्यवसायात क्रांती घडवून आणणार होते. जॉन एक सर्जन, आहारतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याने एक स्पा काढला होता, त्याला तो सॅन असं म्हणे. आपल्याकडील निसर्गोपचार केंद्रासारखं ते होतं. बऱ्याच दूरवरून अनेक मोठी आजारी मंडळी त्या सॅनमध्ये विश्रांती करण्यासाठी यायची. तो सॅन इतका प्रसिद्ध झाला होता की तिथे हेन्री फोर्डसारखे मोठे उद्योगपतीही यायचे. या डॉ केलॉगच्या सॅनमध्ये शुद्ध ताजी हवा, फळं, सकस धान्यांचा आहार सारं मिळायचं. Kellogg
याच सॅनमध्ये येणाऱ्या लोकांसाठी जॉन आणि विली यांनी धान्यापासून बनवलेल्या विविध खायच्या वस्तू बनवायचे प्रयत्न सुरू केले. त्यातील अनेक प्रयत्न फसले, मात्र एका प्रयोगानंतर धान्य कुटून केलेल्या लगद्याचा ट्रे रात्रभर तसाच राहिल्याने सकाळपर्यंत वाळून गेला. याचेच पुढे फ्लेक्स बनवता येतील असे त्यांना वाटले. जॉनच्या दृष्टीने हे फ्लेक्स किंवा सिरियल्स म्हणजे फक्त सॅनमधील लोकांचा आहार एवढेच होते पण याचा मोठा उद्योग उभा राहील अस मात्र त्याला अजिबात वाटलं नव्हतं. विलीला मात्र त्यात प्रचंड मोठा बिजनेस दिसला. यातूनच सकाळी न्याहारीला घेण्याचे फ्लेक्स बनवले, पण हेच प्रयत्न इतर ४२ कंपन्यांनीही केले होते. त्यातले काहीजण खरच संशोधक होते तर काहीजण भामटेही होते. यातील एकजण तर जॉन-विलीच्या सॅनमध्ये उपचार घेतलेला एक रुग्ण होता, चार्ल्स विल्यम पोस्ट त्याचं नाव.
काय गंमत आहे, ज्याने केलॉग Kellogg बंधूंच्या सॅन मध्ये धान्यापासून बनवलेली सिरियल्स प्रथम खाल्ली होती, त्यानंच ती कशी बनवतात हे चोरून पाहिलं होतं आणि त्याचा कारखाना काढला होता. काही वर्षातच तो कारखानाही भरपूर वाढला. केलॉगच्या बाजूलाच त्याचा कारखाना होता. पण नियतीचा खेळ पहा, श्रीमंत झाल्यावर चार्ल्सने त्याच्या बायकोलाही सोडून दिलं, आणि त्याच्या सेक्रेटरीशी लग्न केलं. पण एके दिवशी पडलेल्या भयानक स्वप्नामुळे चार्ल्सने स्वतःच्या रायफलने स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली.
इकडे जॉन आणि विलीमध्येही प्रचंड मतभेद झाल्याने दोघांनी आपापल्या कंपन्या काढल्या आणि एकमेकांनाच शह देऊ लागल्या. विलीची कंपनी भराभर वाढत होती, परदेशातही तिच्या अनेक शाखा बनल्या. विलीने नंतर त्याच्या जुन्या सॅनच्या बाजूलाच एक मोठा महाल बांधला आणि जॉनने त्याचा सॅन वाढवण्यासाठी १४ मजली इमारत उभी केली पण १९२८-२९ च्या सुमारास आलेल्या मंदीमुळे त्याच्या इमारतीत कोणीच जाईना. १५०० लोकांची सोय असलेल्या इमारतीत जेमतेम १५० लोकच असत.
पण विलीचा बिजनेस मात्र जोरात सुरू होता. केलॉगची Kellogg उत्पादने नाशवंत असल्याने त्यांचा खप लवकर होणे गरजेचे होते. कधी कधी ते शक्य न झाल्यामुळे कंपनीला नुकसानही सहन करावे लागले. त्यामुळे अल्युमिनियम फॉईलमध्ये उत्पादने पॅक करून हा प्रश्न काही प्रमाणात सोडवला होता. तसच काही संशोधकांनी चौकोनी भरीव आकाराच्या वेष्टनांमध्ये सिरियल्स आणि कॉर्नफ्लेक्स विकायची आयडिया दिली. यातून उत्पादने बराच काळ टिकू लागली आणि कंपनीचा फायदाही प्रचंड वाढला.
१९८० च्या दशकात केलॉगचे Kellogg खाद्यपदार्थ फक्त म्हातारे लोकच खात असल्याचे कंपनीला जाणवले. त्यावर उपाय म्हणून कंपनीने आपलं लक्ष २० ते ४९ वर्ष वयाच्या लोकांवर केंद्रित केले आणि “ऍप्पल रेझीन क्रिस्प” सारखे पदार्थ बाजारात आणून या लोकांनाही आपलेसे केले. काही काळाने अमेरिकेतील लोकांना कॉर्नफ्लेक्स खायला फारसे आवडत नाही हे लक्षात आल्यावर कंपनीने हार न मानता आपलं लक्ष इतर उत्पादनांवर केंद्रित केलं आणि बिस्कीटसारख्या उत्पादनात उतरून कंपनीचा फायदा वाढवला.
नियतीचा दुसरा खेळ पहा, आयुष्याच्या शेवटच्या काळात विली केलॉग अबोल झाला होता. आयुष्याची शेवटची १० वर्षे आंधळा झाला होता, कधीच हसत नव्हता. आपण कुठे आहोत, काय करतोय याचीही त्याला जाणीव होत नव्हती, आणि दैवदुर्विलास म्हणजे त्याचा जुना विरोधक असलेल्या चार्ल्सची बायको लीला मॉँटगोमेरी हिने देणगी दिलेल्या एका इस्पितळात दि. ६ ऑक्टोबर १९५१ ला तो मरण पावला.
लोक कॉर्नफ्लेक्सला आरोग्यदायी अन्नपदार्थ समजत असले तरी गंमत म्हणजे बटाट्याच्या चिप्सच्या एका बाऊलमध्ये जितके मीठ असते त्यापेक्षा जास्त मीठ एक बाऊल कॉर्नफ्लेक्समध्ये असत हे फार कमी लोकांना माहीत असेल. आज केलॉग Kellogg म्हणजे एक मोठं साम्राज्य उभं राहिलं आहे. पण आज हे वाचल्यावर कॉर्नफ्लेक्स खाताना कुठेतरी ही सगळी दुर्दैवी आयुष्ये आणि तो सॅन एकदा तरी मनात आल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की. केलॉग्सनंतर बर्याच कंपन्यांनी हे फ्लेक्स बनवायला सुरुवात केली मात्र आजही आपण मॉलमध्ये कॉर्नफ्लेक्स विकत घेतो ते केलॉग्स या नावानेच. त्याच नावाने आज हा खाद्यपदार्थ जागतिक बाजारात विकला जात आहे आणि संपूर्ण जगात लहानथोरांच्या आवडीचा पदार्थ बनला आहे.
- © योगेश शुक्ल ९६५७७०१७९२
Leave a Reply